पिंपरी : श्री संत ज्ञानेश्वर महाराजांचा ७५० वा जन्मोत्सव आणि जगद्गुरू श्री संत तुकाराम महाराजांचा ३७५ वा वैकुंठगमन सोहळ्याचे औचित्य साधून संत तुकाराम महाराजांची पालखी परतीच्या प्रवासात आळंदीत मुक्कामी जाणार आहे. २००८ नंतर १७ वर्षांनी जगद्गुरू संत तुकाराम महाराजांची पालखी येत्या रविवारी (२० जुलै) आळंदीत संत ज्ञानेश्वर माऊलींच्या भेटीला येणार आहे. हा साेहळा अद्वितीय हाेण्यासाठी श्री संत ज्ञानेश्वर महाराज संस्थान कमिटीकडून जय्यत तयारी सुरू आहे.
जगद्गुरू संत तुकाराम महाराज यांचे धाकटे चिरंजीव तपोनिधी नारायण महाराज यांनी १६८५ मध्ये पालखी साेहळा सुरू केला. तुकाेबांचा पालखी साेहळा आळंदीमार्गेच प्रवास करीत होता. १६८५ ते १८३१ पर्यंत तुकाेबांची पालखी आंळदी मार्गे मार्गस्थ हाेत हाेती. ही परंपरा खंडित झाल्यावर गुरु हैबतबाबा आरफळकर यांनी १८३२ मध्ये स्वतंत्रपणे संत ज्ञानेश्वर महाराजांचा पालखी सोहळा सुरू केला. त्यानंतर दोन्ही संतांच्या पालखीचे मार्ग बदलले. दोन्ही पालखी सोहळ्यात लाखोंच्या संख्येने भाविक सहभागी होत आहेत. २८ जुलै २००८ मध्ये संत तुकाराम महाराजांच्या ४०० व्या जन्मोत्सवावेळी दाेन्ही पालख्यांची भेट झाली हाेती. तुकाेबांची पालखी आळंदी मुक्कामी गेली हाेती.
यंदा संत ज्ञानेश्वर महाराजांचा ७५० वा जन्मोत्सव आणि संत तुकाराम महाराजांचा ३७५ वा वैकुंठगमन सोहळा आहे. यानिमित्त या दोन पालख्यांची भेट होण्यासाठी यावर्षी सोहळा आळंदीला आणण्याची मागणी आळंदी देवस्थानने देहू देवस्थानला केली होती. याबाबतचे पत्र आळंदी देवस्थानचे सोहळा प्रमुख डॉ. भावार्थ देखणे आणि विश्वस्त चैतन्य महाराज कबीर यांनी देहू देवस्थानचे अध्यक्ष जालिंदर महाराज मोरे यांना दिले होते. या निमंत्रणाचा देहू संस्थानने स्वीकार केला. माउलींची पालखी रविवारी आळंदीत दाखल होणार आहे. त्याच दिवशी संत तुकाराम महाराजांचा पालखी सोहळा आळंदीत मुक्कामी येणार आहे. संत ज्ञानेश्वर महाराज आणि संत तुकाराम महाराज या दोन पालख्यांच्या भेटीचा अनुपम सोहळा हजारो वारकऱ्यांना अनुभवता येणार आहे.
तुकोबांच्या पालखीचा पुण्यातील एक मुक्कम रद्द
तुकाराम महाराजांचा परतीचा पालखी साेहळा शुक्रवारी (१८ जुलै) राेजी पुण्यात दाखल होणार आहे. १८ आणि १९ जुलै असे दाेन दिवस पालखी पुण्यात मुक्कामी राहणार हाेती. आता १९ जुलै रोजी सकाळीच पालखी साेहळा पिंपरी-चिंचवड शहरात येणार असून पिंपरीत मुक्काम असणार आहे. २० जुलै राेजी चिंचवड, आकुर्डी, भाेसरी मार्गे पालखी साेहळा आळंदीत मुक्कामासाठी दाखल हाेईल. २१ तारखेला चिखली टाळगाव, तळवडे मार्गे पालखी साेहळा देहूला पाेहचेल.
आळंदी देवस्थानचे निमंत्रण स्वीकारले आहे. ज्ञानेश्वर महाराजांचा ७५० वा जन्मोत्सव आणि तुकाराम महाराजांचा ३७५ वा वैकुंठगमन सोहळ्यानिमित्त दोन्ही संतांची भेट होणार आहे. – जालिंदर महाराज माेरे, अध्यक्ष, श्री संत तुकाराम महाराज संस्थान, देहू.
This quiz is AI-generated and for edutainment purposes only.
ज्ञानाेबा-तुकाेबांचा संबंध या भेटीमुळे जपला जाईल. वारकरी परंपरेनुसार स्वागत हाेईल. हा साेहळा अद्वितीय करण्यासाठी तयारी सुरू झाली आहे. आळंदीकरांसाेबत बैठक हाेणार आहे. – याेगी निरंजन नाथ, मुख्य विश्वस्त, श्री ज्ञानेश्वर महाराज संस्थान कमिटी, आळंदी.