तांब्याला ठोके देऊन सुबक आकाराची भांडी घडविणाऱ्या त्वष्टा कासार म्हणजेच तांबट समाजाच्या श्री कालिकामाता देवीची मूर्ती सुबक तर आहेच. पण, ती वैशिष्ट्यपूर्णदेखील आहे. संस्थेच्या पेशवेकालीन श्री महाकालिका मंदिरामध्ये नवरात्रोत्सवानिमित्त धार्मिक कार्यक्रम, सांस्कृतिक आणि सामाजिक उपक्रम आयोजित करण्यात आले आहेत. विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कार्य केलेल्या महिलांच्या हस्ते देवीची आरती आणि मान्यवरांचा सन्मान सोहळा होणार आहे.

श्री कालिकामाता ही त्वष्टा कासार म्हणजेच तांबट समाजाची कुलदेवी. पेशवेकालीन कौलारू वास्तूमध्ये या मंदिराची उभारणी आहे. नारायणराव रामराव पिंपळे यांनी मंदिराचे बांधकाम केल्याची नोंद आहे. १९६१ च्या पुरानंतर पडझड झालेल्या मंदिराचा १९८० ते ८६ या कालावधीमध्ये जीर्णोद्धार करण्यात आला. देवीचा गाभारा ग्रॅनाइट मार्बल आणि संगमरवराचा आहे. सभामंडप स्वतंत्र असून, सभा मंडपात १५ ताशीव सागवानाच्या लाकडी खांबांचा वापर आहे. सभा मंडपाचे प्रांगण आणि पायऱ्या संगमरवरी आहेत. मंदिर दुमजली असून, त्यावरील कळस विलोभनीय आहे.

मंदिराच्या दणकट प्रवेशद्वाराला दिंडी दरवाजा आहे. मंदिरामध्ये सन १९४८ ची मोठी पितळी घंटा आहे. कालिकामातेच्या मूर्तीचे विवेक खटावकर आणि दिलीप साप्ते यांनी वज्रलेपन केल्यानंतर प्रसिद्ध मूर्तिकार अभिजित धोंडफळे यांनी मूर्तीच्या जतनाचे काम केले आहे. त्यामुळे देवीचे मूळ सौंदर्य प्रकट झाले आहे. पूर्वीच्या जुन्या रंगांचे कित्येक वर्षांचे चढलेले थरावर थर कुशलतेने पूर्णपणे काढल्यामुळे सुमारे १०० वर्षांनंतर भाविकांना देवीच्या मूळ स्वरूपाच्या दर्शनाचा लाभ होतो आहे.

मंदिरामध्ये सकाळपासून रात्रीपर्यंत असंख्य भाविक नियमित येतात. दर पौर्णिमेला आणि दररोज रात्री आठ वाजता देवीची आरती होते. नवरात्रोत्सवात देवी दररोज नव्या वाहनावर विराजमान असते. उत्सवातील देवीची फायबरची मूर्ती अनिल वडके यांनी केली आहे. संस्थेचे अध्यक्ष सतीश करडे, कार्यवाह आमोद वडके, उत्सव प्रमुख प्रवीण खरवलीकर आणि सह उत्सव प्रमुख देवेंद्र वडके हे पदाधिकारी नवरात्रोत्सवाची जबाबदारी पार पाडत आहेत.

अशी आहे देवीची मूर्ती

श्री कालिकादेवीची मूर्ती बेसाल्ट जातीच्या पाषाणातील असून, तीन फूट उंचीची आहे. चतुर्भुज देवीच्या एका हातामध्ये द्रोण असून, तीन हातांमध्ये तलवार, त्रिशूल, ढाल ही आयुधे आहेत. देवीच्या गळ्यामध्ये कंठी, दंडावर वाकी, तर पायात तोडे, तसेच पायाच्या बोटात जोडवी दिसतात. देवीच्या मस्तकी करंड मुकुट असे अलंकार आहेत. देवी नऊवारी साडी नेसलेली असून, सव्यललितासनात दगडी चौरंगावर बसलेली आहे. तिच्या चरणाखाली असुर आहे.

(माहिती संदर्भ : डाॅ. गो. बं. देगलूरकर, मूर्तिशास्त्राचे ज्येष्ठ अभ्यासक)