पिंपरी : म्हाळुंगे एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या हद्दीत पुणे-नाशिक महामार्गावरील कुरुळी आणि इंडोरन्स चौक ते निघोजे रस्त्यावर झालेल्या दोन अपघातांमध्ये एकाचा मृत्यू झाला. तर, दोघेजण गंभीर जखमी झाले आहेत.
निघोजे रस्त्यावर झालेल्या अपघातामध्ये संतोष नारायण खैरे (वय ४४, रा. खालुब्रे) यांचा मृत्यू झाला. त्यांचे नातेवाईक राजेंद्र ज्ञानदेव धस (वय ५८, रा. चिंचवड) यांनी फिर्याद दिली आहे. त्यानुसार टँकरचालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गुरुवारी सकाळी खैरे हे दुचाकीवरून कामाला चालले होते. म्हाळुंगे येथे आल्यानंतर पाठीमागून आलेल्या टँकरने त्यांना जोरदार धडक दिली. या अपघातात त्यांचा मृत्यू झाला.
दुसरा अपघात पुणे-नाशिक महामार्गावरील कुरुळी येथे झाला. त्यात प्रशांत गंगाधर तापकीर (वय ३१), स्वप्नील पंडित पांचाळ (वय ३१, दोघे रा. मोशी) हे दोघे गंभीर जखमी झाले आहेत. याप्रकरणी प्रशांत यांचे नातेवाईक विकास शिवाजी खकाळ (वय ३५, रा. चऱ्होली) यांनी फिर्याद दिली आहे. त्यानुसार कंटेनरचालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मंगळवारी सकाळी तापकीर आणि पांचाळ हे दोघेजण दुचाकीवरून घरी परतत होते. कुरुळी गावच्या हद्दीत पुणे-नाशिक रोडवरील चिंबळी फाटा येथे आले असता समोरून आलेल्या कंटेनरने रस्ता दुभाजक ओलांडून तापकीर यांच्या दुचाकीला जोरात धडक दिली. या अपघातात तापकीर आणि पांचाळ दोघे गंभीर जखमी झाल्याचे पोलिसांनी सांगितले.