पुणे : शहरातून तडीपार केलेल्या सराइतांवर पोलिसांनी नजर ठेवली असून, तडीपार करण्याच्या आदेशाचा भंग करून शहरात आलेल्या तळजाई वसाहत परिसरातील दोन सराइतांना सहकारनगर पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.राजू नवनाथ कांबळे (वय २१, रा. तळजाई वसाहत, पद्मावती) असे ताब्यात घेण्यात आलेल्या सराइताचे नाव आहे. त्याच्याविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तळजाई वसाहत परिसरात शनिवारी (३० ऑगस्ट) रात्री साडेआठच्या सुमारास कांबळे आला होता. कांबळे याला पुणे शहर, जिल्ह्यातून तडीपार करण्यात आले आहे. याबाबतची माहिती पोलिसांना समजल्यानंतर त्याला ताब्यात घेण्यात आले.
तळजाई वसाहत परिसरात शनिवारी सायंकाळी सराइत अथर्व रवींद्र अडसूळ (वय २१, रा. तळजाई वसाहत, पद्मावती) याला ताब्यात घेण्यात आले. आदेशाचा भंग केल्याप्रकरणी अडसूळ याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. पोलीस कर्मचारी सुदाम बागलाने यांंनी याबाबत फिर्याद दिली आहे. गंभीर स्वरुपाचे गुन्हे दाखल असलेल्या सराइतांना शहर आणि जिल्ह्यातून तडीपार करण्यात येते. अनेक सराइत तडीपार केल्यानंतर आदेशाचा भंग करुन शहरात येतात. गणेशोत्सवात पोलिसांनी सराइतांच्या हालचालींवर नजर ठेवली आहे. तडीपार गुंड आढळून आल्यास त्वरित नजीकच्या पोलीस ठाणे किंवा पोलीस नियंत्रण कक्ष (क्रमांक – ११२) संपर्क साधावा, असे आवाहन पोलिसांनी केले आहे.
गणेशोत्सवात कायदा आणि सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी पोलिसांकडून सराइतांची झाडाझडती घेण्यास सुरुवात केली आहे. कात्रज, खडकी, औंध, पाषाण, बाणेर, येरवडा, चंदननगर, विमाननगर, खराडी, लोहगाव भागातील २९ गुंडांना शहरातून तडीपार करण्याचे आदेश नुकतेच देण्यात आले.