पिंपरी : गेल्या अनेक वर्षांपासूनची मागणी असलेल्या पुणे ते लोणावळा दरम्यान उपनगरीय रेल्वेच्या तिसऱ्या आणि चौथ्या मार्गिकेला गती मिळणार आहे. या प्रकल्पासाठी राज्य शासनाच्या आर्थिक सहभागाला राज्य मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली. या प्रकल्पाचा खर्च अंदाजे पाच हजार १०० कोटी रुपयांचा असून पाच वर्षांत प्रकल्प पूर्ण केला जाणार आहे.
सध्या पुणे-लोणावळा लोकलच्या दिवसभरात ६०.५९ किलोमीटर अंतर कापत दररोज लाखो प्रवाशांची ने-आण करीत ४४ फेऱ्या होतात. या मार्गावर असणाऱ्या लांब पल्ल्यांच्या गाड्यांचा ताण लक्षात घेता उपनगरीय सेवेसाठी स्वतंत्र मार्गाची अनेक वर्षांपासून मागणी केली जात होती. या नव्या मार्गिकेमुळे गर्दी आणि विलंब कमी होईल. मुंबई रेल्वे विकास महामंडळामार्फत सादर करण्यात आलेल्या पुणे ते लोणावळा दरम्यान उपनगरीय रेल्वेच्या तिसऱ्या आणि चौथ्या मार्गिकेच्या या प्रकल्पाचा एकूण खर्च पाच हजार १०० कोटी रुपये आहे. त्यामध्ये जमीन अधिग्रहण खर्चाचाही समावेश आहे. यातील ५०.५० टक्के आर्थिक सहभागाची जबाबदारी केंद्र सरकार व राज्य शासन उचलणार आहे. राज्य शासनाचा एकूण वाटा दोन हजार ५५० कोटी रुपये इतका निश्चित करण्यात आला आहे.
पुणे, पिंपरी महापालिका, पीएमआरडीएचाही हिस्सा
राज्य शासनाच्या हिश्श्यातील या दोन हजार ५५० कोटींपैकी पुणे महापालिका ५१० कोटी, पिंपरी-चिंचवड महापालिका ५१० कोटी आणि पुणे महानगर क्षेत्र विकास प्राधिकरण (पीएमआरडीए) ७६५ कोटी रुपयांचा हिस्सा असणार आहे. उर्वरित ७६ कोटींची रक्कम राज्य शासन देणार आहे.
पुणे-लोणावळा दरम्यान १७ रेल्वे स्थानके
पुणे, शिवाजीनगर, खडकी, दापोडी, कासारवाडी, पिंपरी, चिंचवड, आकुर्डी, देहूरोड, बेगडेवाडी, घोरावाडी, तळेगाव, वडगाव, कान्हे, कामशेत, मळवली, लोणावळा अशी ६०.५९ किलोमीटर अंतरावर १७ स्थानके आहेत.
पुणे-लोणावळा तिसऱ्या आणि चौथ्या मार्गिकेमुळे रेल्वे प्रवाशांचा वाढता ताण कमी होऊन उपनगरीय रेल्वे सेवांची क्षमता मोठ्या प्रमाणात वाढणार आहे. पुणे-मुंबई या दोन महानगरांतील दळणवळण अधिक सुलभ आणि वेगवान होण्यास मोठा हातभार लागणार आहे.-अजित पवार, उपमुख्यमंत्री
वर्षानुवर्षे गर्दी आणि विलंबामुळे प्रवासी त्रस्त होते. नव्या मार्गिकेमुळे लोकल सेवा सुधारेल आणि मुंबई-पुणे प्रवास सुलभ होईल. मार्गिकेच्या कामाला लवकर सुरुवात करावी.-इक्बाल मुलाणीअध्यक्ष, प्रवासी संघटना