पुणे : भरधाव कंटेनरने दुचाकीस्वाराला धडक दिली. कंटनेरच्या धडकेत रस्त्यावर पडलेल्या दुचाकीस्वाराचा पाठीमागून येणाऱ्या ट्रॅक्टरच्या चाकाखाली सापडून मृत्यू झाला. लोणीकंदमधील फुलगाव ते आळंदी रस्त्यावर ही घटना घडली. याप्रकरणी कंटनेर चालकासह ट्रॅक्टर चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.

राजेंद्र चंद्रकांत चव्हाण (वय ५३, रा. चव्हाणनगर, देहूगाव, ता. हवेली) असे मृत्युमुखी पडलेल्या दुचाकीस्वाराचे नाव आहे. याबाबत चव्हाण यांचा भाऊ संजय (वय ५१) यांनी लोणीकंद पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, कंटेनर चालकासह ट्रॅक्टर चालकाविरुद्ध गु्न्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दुचाकीस्वार राजेंद्र चव्हाण हे १६ ऑक्टोबर रोजी सायंकाळी पाचच्या सुमारास लोणीकंद फाटा परिसरातून आळंदी रस्त्याकडे निघाले होते. फुलगावजवळ भरधाव कंटेनरने दुचाकीस्वार चव्हाण यांना धडक दिली. कंटेनरने दुचाकीला धडक दिल्यानंतर ते रस्त्यावर पडले. त्यावेळी पाठीमागून येणाऱ्या ट्रॅक्टरच्या चाकाखाली ते सापडले. अपघातात त्यांचा जागीच मृत्यू झाला. अपघाातानंतर कंटेनर चालक, तसेच ट्रॅक्टर चालक घटनास्थळी न थांबता पसार झाले. पोलीस उपनिरीक्षक चव्हाण तपास करत आहेत.