पिंपरी-चिंचवड: गणेश विसर्जन मिरवणुकीदरम्यान विजेच्या तारेचा धक्का लागल्याने दोन जण गंभीर जखमी झाले आहेत. ही घटना रात्री अकराच्या सुमारास मोहन नगर येथे घडली आहे. प्रवीण राजेंद्र कुटे आणि अमोल सदाशिव चव्हाण अशी जखमी तरुणांची नाव आहेत.

चिंचवड येथील मोहनगरमध्ये गणपती बाप्पांची मोठ्या जल्लोषात विसर्जन मिरवणूक सुरू होती. डिजेवर सर्व गणेश भक्त नाचत होते. भक्तिमय आणि जल्लोषाच वातावरण असताना काली माता मंदिराजवळ डीजेच्या गाडीच्या धक्का विजेच्या खांबाला लागल्याने तार तुटून ती थेट दोघांच्या अंगावर पडली. घटनेत करंट लागून दोघे जण गंभीर जखमी झाले आहेत.

घटनेनंतर प्रवीण आणि अमोल या दोघांना तातडीने जवळच्या खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. दोघांची प्रकृती गंभीर आहे. त्यांच्यावर अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत. पिंपरी पोलिसांनी तातडीने महावितरण भोसरी येथील कर्मचऱ्याना बोलवून तुटलेली तार तुरुस्त केली.

“गणेश वजसर्जन मिरवणुकीदरम्यान विजेचा खांब, वायर, डीपी असलेल्या ठिकाणी गणेश भक्तांनी आपली मिरवणूक शांततेत हाताळावी. डिजेवरील तरुणांनी खाली उतरवून पुढे निघावं.” – अशोक कडलग, वरिष्ठ पोलीस निरीक्षक