मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटातील आमदार, माजी मंत्री उदय सामंत यांच्यावर कात्रज चौकात हल्ला झाल्यानंतर कात्रज चौकातच सामंत यांची जाहीर सभा घेण्याची हालचाल शिंदे गटाकडून सुरू झाली आहे. येत्या काही दिवसांत सभेची तारीख आणि वेळ शिंदे गटाकडून जाहीर केली जाणार आहे. आमदार उदय सामंत यांनीही सभेला होकार दर्शविला आहे.

शहरातील राजकीय ताकद वाढविण्याच्या उद्देशाने या सभेचे आयोजन करण्यात येणार असल्याचा दावा करण्यात आला असला तरी सामंत यांच्यावर झालेल्या हल्ल्याला प्रत्युत्तर देण्यासाठीच सभेचे आयोजन करण्यात आल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे.या सभेच्या निमित्ताने ठाकरे आणि शिंदे गट आमने-सामने येण्याची तसेच या दोन्ही गटातील संघर्षही चिघळण्याची शक्यता आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गेल्या आठवड्यात पुणे दौऱ्यावर आले असताना माजी उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांच्या गाडीवर ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांनी हल्ला केला होता. त्याचे तीव्र पडसाद शहरात उमटले होते. शिवसेना शहर प्रमुखांसह काही पदाधिकाऱ्यांना याप्रकरणी पोलिसांनी अटक केली होती. शिवसेनेचे युवा नेते आदित्य ठाकरे यांच्या सभेनंतर हा हल्ला झाल्यानंतर हल्ला पूर्वनियोजित होता असा आरोप शिंदे गटाकडून करण्यात आला होता. त्यामुळे या हल्लाला प्रत्युत्तर देण्यासाठीच सामंत यांच्या सभेचे आयोजन करण्यात आल्याची चर्चा आहे. महापालिकेच्या आगामी निवडणुकीची पूर्वतयारी आणि शहरातील शिंदे गटाची राजकीय ताकद वाढविण्यासाठी उद्देशाने उदय सामंत यांची कात्रज चौकात मुख्य सभा घेण्यात येणार आहे. सभेच्या आयोजनासंदर्भात सामंत यांच्याशी चर्चाही झाली असून, लवकरच ही सभा होईल, असा दावा शिंदे गटाच्या पदाधिकाऱ्यांकडून करण्यात आला. त्यानुसार येत्या आठवडाभरात सभा आयोजित होईल, अशी शक्यता आहे.