पुणे : अभिव्यक्ती स्वातंत्र्यात छत्रपती शिवाजी महाराज किंवा महापुरुषांचा अवमान करण्याची मुभा आहे का, असा प्रश्न उपस्थित करत महापुरुषांचा अवमान केल्यास राष्ट्रद्रोहाच्या कायद्यानुसार शिक्षा देण्याची मागणी भाजपचे खासदार उदयनराजे भोसले यांनी सोमवारी केली. तसेच शिवाजी महाराजांबाबत झालेल्या अवमानकारक वक्तव्यांबाबत ३ डिसेंबरला रायगडावर समाधीस्थळी जाऊन आक्रोश व्यक्त करणार असून, राष्ट्रपती आणि पंतप्रधानांची भेट घेऊन राज्यपाल भगतसिंह कोश्यारी आणि भाजप प्रवक्ते सुधांशू त्रिवेदी यांच्या हकालपट्टीची मागणी करणार असल्याची माहिती त्यांनी दिली.

काही दिवसांपूर्वी उदयनराजे यांनी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी आणि सुधांशू त्रिवेदी यांच्या हकालपट्टीची मागणी करून २८ नोव्हेंबरला पुढील भूमिका मांडणार असल्याचे स्पष्ट केले होते. या पार्श्वभूमीवर राज्यभरातील प्रमुख शिवप्रेमी संघटनांशी चर्चा केल्यानंतर उदयनराजे यांनी पुण्यात पत्रकार परिषदेत भूमिका मांडली.

उदयनराजे म्हणाले, की छत्रपती शिवाजी महाराजांनी सर्वधर्मसमभावाचे, आदर्शाचे विचार दिले. आज सर्व पक्षांकडून शिवाजी महाराजांना आदर्श मानले जाते. त्यांच्या प्रतिमेचे पूजन, अभिवादन केले जाते. त्यांच्या विचारांनुसार चालत असल्याचे सांगितले जाते. पण विकृत वक्तव्ये, चित्रपटांतून महाराजांची अवहेलना केली जाते तेव्हा राग कसा येत नाही? शिवाजी महाराजांचे विचार हा राजकीय पक्षांचा अजेंडा नसेल तर त्यांचे नाव का घ्यायचे, असे प्रश्न उपस्थित करत शिवाजी महाराजांचा अवमान केलेल्यांवर कारवाई करत नसाल तर शिवाजी महाराजांचे नाव घेण्याचा अधिकार त्यांना नसल्याची भूमिकाही त्यांनी मांडली.

उदयनराजे यांना अश्रू अनावर..

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

पत्रकार परिषदेदरम्यान उदयनराजे यांना अश्रू अनावर झाले. सन्मान ठेवता येत नसेल तर शिवाजी महाराजांचे नाव पुसून टाकू या. कशाला हवे आहे बेगडी प्रेम? कशाला हवे शिवाजी महाराजांचे पुतळे, शिवजयंती, शिवप्रताप दिन? हे दिवस बघण्यापेक्षा मेलो असतो तर बरे झालं असते, असेही त्यांनी सांगितले.