पुणे : राज्यात हिंदी भाषेची सक्ती आणि त्रिभाषा सूत्र लागू करण्याच्या मुद्यांवरून गेल्या काही दिवसांपासून चांगलंच राजकारण तापलं होतं. अखेर हिंदी भाषा सक्तीचा निर्णय राज्य सरकारने रद्द केल्यानंतर जल्लोष करण्यासाठी शिवसेना (ठाकरे) आणि मनसेच्यावतीने शनिवारी मुंबईत विजयी मेळाव्याचं आयोजन केले होते. मुंबईच्या वरळीतील डोम या ठिकाणी ठाकरे बंधूंचा हा मेळावा पार पडला. या मेळाव्यात बोलताना उद्धव ठाकरे यांनी भारतीय जनता पक्षावर जोरदार टीका केली.उद्धव ठाकरे यांनी त्यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या टिकेला प्रत्युत्तर देत थेट इशारा दिला आहे. त्यानंतर सत्ताधारी भाजपकडून ठाकरे बंधूंच्या मेळाव्यावरुन टीका होऊ लागली आहे.
त्याच दरम्यान भाजपचे खासदार निशिकांत दुबे यांनी सोशल मीडियावरील एक्स वर पोस्ट केली आहे. त्यामध्ये निशिकांत दुबे म्हणतात, हिंदी भाषिकांना मुंबईत मारणार्यांनो जर हिंमत असेल तर महाराष्ट्रात उर्दू भाषिकांना मारून दाखवा, आपल्या घरात तर कुत्रा देखील वाघ असतो. कोण कुत्रा आणि कोण वाघ, स्वतःच ठरवा, असं त्या पोस्ट मध्ये निशिकांत दुबे म्हणाले आहेत आणि ती पोस्ट उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांना टॅग केली आहे.त्यावरुन ठाकरे समर्थकांकडून तीव्र प्रतिक्रिया येताना दिसत आहे.
त्यावर ठाकरे गटाचे नेते वसंत मोरे म्हणाले, मी पहिल्यांदा निशिकांत दुबे यांच अभिनंदन करतो की, त्यांनी मराठी भाषेमध्ये पोस्ट केली. तसेच त्यांना मराठी शिकवले,त्याच देखील मी अभिनंदन करतो.त्याच बरोबर निशिकांत दुबे यांनी आपटा आपटीच्या गोष्टी शिवसैनिक आणि मनसैनिक यांना शिकवू नये, आम्ही आपटा आपटी करीत नाही.तर फोडाफोडी करतो. त्यासाठी आम्ही नेहमी तयारीत असतो. त्यामुळे आपटायाच असल्यास मुंबई,पुण्यात या, असा इशारा देखील वसंत मोरे यांनी निशिकांत दुबे यांना त्यांनी दिला.
तसेच ते म्हणाले, निशिकांत दुबे यांनी त्यांच्या मतदारसंघातून एक्सवर पोस्ट केली आहे. मुंबई किंवा पुण्यात येऊन ती पोस्ट केली असती, तर त्यांना नक्कीच समजल असते. किरीट सोमय्या आणि केडीया यांनी काही विधान केली होती. त्यांनी विधान केल्यावर काय होते. याबाबत निशिकांत दुबे यांनी त्या दोघांना एकदा विचाराव, असा सल्ला देखील वसंत मोरे यांनी निशिकांत दुबे यांना दिला.
तसेच ते पुढे म्हणाले,मागील काही महिन्यातील घटना पाहिल्यावर हा प्रांत वाद लावण्याचा प्रयत्न सुरू आहे.यातून दंगली घडवयाच्या, त्यातून स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पुढे ढकलण्याचा प्रयत्न दिसतोय,हे होता कामा नये,मात्र स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीला सामोरे गेल पाहिजे,अशी मागणी त्यांनी केली.
तसेच ते पुढे म्हणाले,उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्या एकाच मेळाव्यानंतर अनेक नेते मंडळी अस्वस्थ झाल्याचे पाहण्यास मिळत आहे.त्या अस्वस्थ झालेल्या नेत्यांपैकी एक निशिकांत दुबे असल्याचे दिसून येत आहे. त्यातूनच त्यांनी असे विधान केले असावे, त्यामुळे भाजप नेतृत्वाने अशा वाचाळ वीराना आवर घालवा, तर दुसर्या बाजूला देवेंद्र फडणवीस म्हणतात आम्ही त्यांना समजून सांगू, पण अशी विधान रोखली पाहिजे, अशा लोकांना वेळीच आवर घालावा, अशी भूमिका मांडत देवेंद्र फडणवीस यांच्यावर त्यांनी टीका केली.
तसेच ते पुढे म्हणाले, उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्या मेळाव्या नंतर एका परप्रांतीय महिलेचा व्हिडिओ व्हायरल होत आहे.त्यामध्ये ती महिला म्हणते की, चार पाच दिवस दुकान बंद ठेवा,करोना सारखी याचे हाल करू, त्यावेळी त्यांना समजेल, ती महिला असे म्हणत आहे. पण मी तर सांगेल महिनाभर दुकान बंद ठेवा, कोणत्याही मराठी माणसाच हाल होणार नाही. जर यांनी दुकान बंद केली तर मराठी माणसाचा जो सुरुवातीचा किराणा मालाचा व्यवसाय आहे.तो चांगल्या प्रकारे सुरू होईल आणि या लोकांनी त्यांच्या राज्यामध्ये जाऊन खुशाल व्यवसाय करावा, असा टोला निशिकांत दुबे यांना लगावला.