देशभरातील शिक्षण संस्थांना आता झाडे लावावी लागणार आहेत. विद्यार्थ्यांमध्ये पर्यावरणाविषयी, झाडांविषयी जागृती करण्यासाठी विद्यापीठ अनुदान आयोगाने (यूजीसी) एक विद्यार्थी, एक झाड ही मोहीम हाती घेतली असून त्या अंतर्गत झाडे लावण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

नवनियुक्त केंद्रीय मनुष्यबळ विकासमंत्री रमेश पोखरियाल निशंक यांनी अलीकडेच विद्यार्थ्यांनी झाडे लावण्याबाबतचा संदेश दिला होता. त्या अनुषंगाने आता यूजीसीनेही देशभरातील शिक्षण संस्थांचे कुलगुरू, संचालकांना पत्र पाठवून या संदर्भात कार्यवाही करण्याचे आवाहन केले आहे. त्या बाबतचे परिपत्रक संकेतस्थळावर देण्यात आले आहे.

‘यूजीसीने ३१ मार्च २०१५ रोजीही ‘एक विद्यार्थी, एक झाड’ संकल्पनेअंतर्गत वृक्षारोपण मोहीम राबवण्याचे आवाहन केले होते. त्या वेळी आपण मोठय़ा प्रमाणात प्रयत्न केले असतील. मात्र, पर्यावरणाच्या संवर्धनासाठी झाडे महत्त्वाची असल्याने ही संकल्पना पुढे सुरू ठेवण्यात आली आहे. त्या अंतर्गत विद्यार्थ्यांना वर्षभरात किमान एक झाड लावण्यासाठी प्रोत्साहित करावे. तसेच पाण्याची बचत करण्याचाही संदेश द्यावा. राबवलेल्या मोहिमेचा छायाचित्रांसह अहवाल पाठवावा,’ असे यूजीसीचे सचिव रजनीश जैन यांनी परिपत्रकात नमूद केले आहे.

२०१५ मधील मोहिमेचे काय?

यूजीसीने २०१५ मध्येच ही मोहीम सुरू केली होती. त्या वेळीही देशभरातील शिक्षण संस्थांना त्यात सहभागी होण्याचे आवाहन केले होते. त्या वेळी किती शिक्षण संस्थांनी सहभाग घेऊन झाडे लावली, झाडे लावली असल्यास त्यांची आज काय स्थिती आहे, याची माहिती यूजीसीने जाहीर करणे आवश्यक आहे.