महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांची पाठ फिरताच शहर मनसेमधील अंतर्गत गटबाजी उफाळून आली. पक्षाच्या कोणत्याही बैठकीला का बोलाविले जात नाही, अशी विचारणा झाल्याने शिवाजीनगर विभाग अध्यक्ष आणि कार्यकर्त्यांमध्ये राडा झाला. वादविवाद टोकाला पोहोचल्याने झटापटीचा प्रसंगही घडला. शिवाजीनगर विभाग अध्यक्ष रणजित शिरोळे आणि विद्यार्थी सेनेचे शैलेश वीटकर यांच्यात मनसे कार्यालयात झालेली बाचाबाची हा चर्चेचा विषय ठरली आहे.

राज ठाकरे यांचा पाच जून रोजी होणारा अयोध्या दैरा आणि पुणे दौऱ्यातील सभेच्या नियोजनासंदर्भात मनसे पदाधिकाऱ्यांची बुधवारी रात्री बैठक सुरू होती. ही बैठक सुरू असतानाच रणजित शिरोळे आणि शैलेश वीटकर यांच्यात वादावादी सुरू झाली. पक्षाच्या कोणत्याही बैठकांना का बोलविले जात नाही, अशी विचारणा वीटकर यांनी थेट बैठकीतच केली. त्यातून हा वाद सुरू झाला. संतप्त कार्यकर्त्यांकडून गोंधळ सुरू झाला. शहराध्यक्ष आणि प्रमुख पदाधिकाऱ्यांसमोर हा वाद रंगला. दरम्यान, राडा झाला नाही. किरकोळ वाद झाल्याचा दावा मनसे पदाधिका-यांकडून करण्यात आला.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

गेल्या काही महिन्यांपासून शहर मनसेतील अंतर्गत गटबाजी सातत्याने चव्हाट्यावर आली आहे. राज ठाकरे यांनी हिंदुत्वाचा मुद्दा हाती घेतल्यानंतर माजी शहराध्यक्ष वसंत मोरे नाराज झाले होते. राज ठाकरे यांच्या आदेशाचे पालन करणार नसल्याचे त्यांनी जाहीर केल्यानंतर शहराध्यक्षपदावरून त्यांची उचलबांगडी झाली होती. साईनाथ बाबर यांच्याकडे शहराध्यक्षपद सोपविण्यात आले होते. शहर पदाधिकारी आपल्याला बाजूला करत असल्याचा आरोपही मोरे यांनी केला होता. राज ठाकरे पक्ष कार्यालयात येत नाहीत तोपर्यंत कार्यालयात जाणार नाही, अशी भूमिकाही मोरे यांनी जाहीर केली होती. निवडणूक आणि अन्य महत्त्वाच्या प्रश्नांवर आयोजित सुकाणू समितीच्या बैठकीतही पक्षातील प्रमुख पदाधिका-यांचे मतभेद पुढे आले होते. शहराध्यक्ष साईनाथ बाबरही हनुमान चालिसा पठणाच्या कार्यक्रमाला अनुपस्थित होते. त्यातच शहर कार्यालयातच झालेली वादावादी चर्चेचा विषय ठरली आहे. यासंदर्भात शहराध्यक्ष साईनाथ बाबर यांच्याशी दूरध्वनीवरून संपर्क साधण्याचा प्रय्तन केला असता त्यांनी प्रतिसाद दिला नाही.