पुणे : अमेरिकेने एच-१ बी व्हिसासाठी अचानक मोठी शुल्कवाढ जाहीर केल्याने हजारो भारतीय आयटी व्यावसायिक व त्यांच्या कुटुंबीयांमध्ये भीतीचे वारे निर्माण झाले आहे. अमेरिकेतील स्थानिक वेळेनुसार २१ सप्टेंबरला मध्यरात्री १२ वाजल्यानंतर नवीन नियम लागू होणार असून, या अंतर्गत एच-१ बी व्हिसाचे शुल्क तब्बल एक लाख अमेरिकी डॉलर होणार आहे.
अमेरिकेत काम करणाऱ्या भारतीयांना अडचणीत आणणारा निर्णय अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी घेतला आहे. भारतीयांकडून मागणी असलेल्या एच-१ बी व्हिसासाठी आता १ लाख डॉलर्स म्हणजेच साधारण ८८ लाख रुपये इतके वार्षिक शुल्क आकारण्याचा निर्णय ट्रम्प यांनी घेतला आहे. यामुळे तीन लाख भारतीयांना शुल्कवाढीचा फटका बसणार आहे. यामुळे सध्या भारतात किंवा अमेरिकेबाहेर असलेल्या आयटी कर्मचाऱ्यांनी नवीन नियम लागू होण्यापूर्वीच अमेरिकेत परतावे. अन्यथा, परतीच्या प्रवासावेळी त्यांना प्रवेश नाकारला जाऊ शकतो अथवा प्रचंड आर्थिक बोजा सहन करावा लागू शकतो, असा इशारा फोरम फॉर आयटी एम्प्लॉईजने दिला आहे
अनेक भारतीय आयटी कर्मचारी आपल्या कौटुंबिक कारणांसाठी किंवा वैद्यकीय उपचारांसाठी भारतात ये-जा करतात. मात्र, या नव्या शुल्कवाढीमुळे त्यांना परत अमेरिकेत जाणे कठीण होईल, अशी भीती त्यांच्या मनात घर करत आहे. अचानक निर्णयामुळे अनेक जण कुटुंबीयांना भेटण्यासाठी भारतात येण्याचे टाळत आहेत, असे आयटी फोरमने स्पष्ट केले आहे.
भारतीय आयटी व्यावसायिकांनी अमेरिकेच्या तंत्रज्ञान क्षेत्राला व अर्थव्यवस्थेला गेल्या काही दशकांत मोठा हातभार लावला आहे. अशा वेळी, त्यांच्या भविष्यासंदर्भात अनिश्चितता व आर्थिक ताण निर्माण होणे अन्यायकारक आहे. या निर्णयाबाबत स्पष्ट मार्गदर्शन व पारदर्शकता आवश्यक असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे. धोरणातील अचानक बदलांमुळे हजारो आयटी कर्मचाऱ्यांच्या कुटुंबीयांवर ही परिणाम होणार आहे. दोन्ही देशांच्या धोरणकर्त्यांनी एकत्र बसून या निर्णयाचा पुनर्विचार करावा व व्यावसायिकांना अडचणीत न आणता न्याय्य तोडगा काढावा, अशी मागणी आयटी फोरमने केली आहे.
पार्श्वभूमी काय?
एच-१ बी व्हिसासाठी १ लाख ७६ हजार ते ५ लाख रुपये शुल्क आतापर्यंत आकारले जात होते. हा व्हिसा तीन वर्षांसाठी वैध असत. आणि त्यानंतर नूतनीकरण होत असे. मात्र, डोनाल्ड ट्रम्प यांच्या निर्णयामुळे आता भारतीयांना मोठा फटका बसणार आहे. १ लाख डॉलर शुल्क आकारण्याच्या निर्णयावर डोनाल्ड ट्रम्प यांनी स्वाक्षरी केली. एच-१ बी व्हिसाचा गैरवापर हा राष्ट्रीय सुरक्षेला धोका आहे, असे डोनाल्ड ट्रम्प यांनी म्हटले आहे. तसेच अनेक एच-१ बी व्हिसाधारक कामासाठी किंवा सुटीच्या निमित्ताने बाहेर गेले आहेत त्यांनी २४ तासांत परतावे असेही सांगण्यात आले आहे. असे न केल्यास २१ सप्टेंबरच्या मध्यरात्री १२ वाजून १ मिनिटापासून लागू होणाऱ्या सरकारी आदेशानुसार त्यांना अमेरिकेत परतण्यास मज्जाव केला जाऊ शकतो.