पुणे : लहान मुले, गरोदर माता, नवजात बालके आणि स्त्रियांमधील कुपोषणावर मात करण्यासाठी हैदराबाद येथील भारतीय भात संशोधन संस्थेने विकसित केलेल्या मूल्यवर्धित (बायोफोर्टिफाईड) जस्त समृद्ध ‘डीआरआर धान-४८’ या भाताच्या वाणांच्या लागवडीचा यशस्वी प्रयोग कोल्हापुरात करण्यात आला. आता पुढील वर्षापासून जस्त समृद्ध भाताचे व्यावसायिक पद्धतीने उत्पादन घेतले जाणार आहे.

प्रयोगशील शेतकरी अभिजित पाटील यांनी २०१९ मध्ये नॅचरल फार्म्स अँड ॲग्रो प्रॉडक्ट प्रोड्यूसर कंपनीची स्थापना केली. या कंपनीने हैदराबाद येथील भारतीय भात संशोधन संस्थेच्या मदतीने जस्त समृद्ध डीआरआर धान -४८, या भाताच्या वाणाची चंदगड, कागल, राधानगरी तालुक्यांत प्रायोगिक तत्त्वावर २०२१ मध्ये पहिल्यांदा १७ गुंठे क्षेत्रावर लागवड केली. तर गेल्या वर्षी ३४ शेतकऱ्यांनी आठ एकर क्षेत्रावर बीजोत्पादनाचा कार्यक्रम हाती घेतला होता. त्यात सरासरी एकरी २२ क्विंटलने एकूण १७६ क्विंटल भात उत्पादन झाले आहे.

जस्त समृद्ध वाण दक्षिण भारतासाठी विकसित करण्यात आले होते. त्यामुळे त्या वाणांची महाराष्ट्रातील लागवड आव्हानात्मक होती. पण, कोल्हापुरात उत्पादित भाताची प्रयोगशाळेत चाचणी करण्यात आली. दक्षिण भारतात उत्पादन केलेल्या जस्त समृद्ध भातामध्ये जस्ताचे प्रमाण २२ पीपीएम आढळते. कोल्हापुरात उत्पादित भातात जस्ताचे प्रमाण २१.७८ पीपीएम इतके आढळून आले आहे. त्यामुळे कोल्हापुरातील लागवड यशस्वी ठरली आहे. आता उत्पादित झालेल्या भाताचे बियाणे पुढील खरीप हंगामात शंभर शेतकऱ्यांना देण्यात येणार आहे.

व्यासायिक उत्पादन सुरू करणार

जस्त समृद्ध डीआरआर धान- ४८, या वाणात जस्ताचे प्रमाण २२ पीपीएमपर्यंत आढळून आले आहे. लहान मुले, गरोदर माता, नवजात बालके आणि स्त्रियांमधील कुपोषणावर मात करण्यासाठी या भाताचा उपयोग केला जातो. विदर्भातील आदिवासी भागातील अनेक सेवाभावी संस्थांकडून आम्हाला विचारणा झाली आहे. पुढील वर्षापासून व्यावसायिक पद्धतीने उत्पादन सुरू करणार आहोत, अशी माहिती नॅचरल फार्म्स अँड ॲग्रो प्रॉडक्ट प्रोड्यूसर कंपनीचे अध्यक्ष अभिजित पाटील यांनी दिली.

हेही वाचा : जागतिक भूक निर्देशांकात भारत १११व्या स्थानी, हा निर्देशांक नेमका काय असतो? कसा मोजला जातो?

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

गरोदर मातांसाठी उपयुक्त

गरोदर माता, नवजात बालके, स्त्रिया आणि आदिवासी भागांतील कुपोषित मुलांना जस्त समृद्ध भात अत्यंत फायदेशीर ठरू शकतो. विशेषत: गरोदर मातांच्या आहारात पोषणमूल्य असलेल्या भाताचा समावेश करणे गरजेचे आहे. अलीकडे शहरी भागातील मुलांमध्येही जस्ताची कमतरता दिसून येत आहे, असे मत आहार सल्लागार सुनीता तांदळे यांनी व्यक्त केले.