Murlidhar Mohol On Ravindra Dhangekar : पुण्यातील जैन बोर्डिंग हाऊस जमिनीच्या व्यवहार प्रकरणावरून माजी आमदार रवींद्र धंगेकर आणि केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांच्यात आरोप-प्रत्यारोपाने चांगलंच राजकारण तापलं आहे. रवींद्र धंगेकर हे मुरलीधर मोहोळ यांच्यावर दररोज गंभीर आरोप करत आहेत. आज धंगेकर यांनी एक पोस्ट शेअर करत मोहोळ यांच्यावर पुन्हा एक आरोप केला. ‘मुरलीधर मोहोळ पुणे महापालिकेचे महापौर असताना बिल्डरची गाडी वापरायचे’ असं धंगेकरांनी म्हटलं. त्यांच्या या आरोपानंतर आता मुरलीधर मोहोळ यांनी स्पष्टीकरण दिलं आहे. ‘मी महापौर असताना अडीच वर्ष स्वत:ची गाडी स्वत:च्या खर्चाने वापरली’, असं मोहोळ यांनी म्हटलं आहे.

मुरलीधर मोहोळ काय म्हणाले?

“दररोज सकाळी ते (रवींद्र धंगेकर) खोटं आणि बोगस ट्विट करतात. तुम्ही देखील त्या बातम्या चालवता. मी त्यांच्या आरोपावर दोनवेळा स्पष्टीकरण दिलं आहे. आज शेवटचं स्पष्टीकरण देतो. मी तुम्हाला सांगतो की प्रत्येक गोष्टीचा पुरावा मागा. आता त्यांनी गाडीचा आरोप केला, मी तुम्हाला सांगतो की पुण्यातला पहिला असा मी महापौर आहे की ज्याने स्वत:च्या खर्चाने अडीच वर्ष गाडी वापरली. महापालिकेची गाडी वापरली नाही”, असं मुरलीधर मोहोळ यांनी म्हटलं.

“आता राहिला विषय बढेकरांच्या नावाच्या गाडीचा. गाडी कुठली आहे बढेकर प्रॉपर्टीज. माझ्या लोकसभा निवडणुकीच्या प्रतिज्ञापत्रात मी स्पष्ट लिहिलं की मी या पार्टनरशिपमध्ये पार्टनर आहे. त्या पार्टनरशिपमधील माझी स्वत:ची गाडी मी वापरली आहे. मी स्वत:चं इंधन वापरलं. आरे बाबा एवढं कृतज्ञ का होताय? पुणेकरांना अभिमान वाटला पाहिजे आणि वाटतोय, की एक महापौर असा मिळाला की ज्याने स्वत:ची गाडी अडीच वर्ष वापरली. पण एक माणूस दररोज काहीतरी बोलतो, आता मला त्यावर पुन्हा स्पष्टीकरण द्यायचं नाही”, असं मुरलीधर मोहोळ म्हणाले आहेत.

‘धंगेकरांवर १० गुन्हे, पण माझ्यावर एक गुन्हा दाखवा…’

“आता त्यांचे (रवींद्र धंगेकर) दररोज अनेक विषय बाहेर येत आहेत. २०११ मध्ये त्यांच्यावर फौजदारी गुन्हा दाखल आहे. कोथरुडमध्ये जमीन बळकावली तर तेथेही जामीन न घेता ते पळाले होते. अशा प्रकारचे गुन्हे त्यांच्यावर (रवींद्र धंगेकर) आहेत. वक्त बोर्डाचा गुन्हा आहे, हा गुन्हा आहे असे १० गुन्हे आहेत. माझ्यावर एक गुन्हा दाखवा”, असं मुरलीधर मोहोळ यांनी म्हटलं आहे.

रवींद्र धंगेकरांनी आज काय आरोप केले?

“पुणे शहराचे खासदार व केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांचा जैन होस्टेल खरेदी प्रकरणात सहभाग असल्याचे अनेक पुरावे पुणेकरांनी गेल्या काही दिवसांत पाहिले आहेत. परंतु तरी देखील ते या सर्व गोष्टी योगायोग असल्याचं ते सांगतात. मी आपणास काही माहिती देऊ इच्छितो, मोहोळ हे खासदार होण्याच्या अगोदर पुण्यनगरीचे महापौर होते. हे महापौर असताना पुणे महानगरपालिकेची अधिकृत शासकीय पाटी लावून महापौर पांढऱ्या रंगाची इनोव्हा क्रिस्टा वापरायचे. त्या गाडीचा नंबर होता Mh12 SW 0909, ही गाडी ना मोहोळ यांची होती, ना पुणे महानगरपालिकेचं शासकीय वाहन. ही गाडी होती कोथरूडच्या बढेकर बिल्डरची”, असा आरोप रवींद्र धंगेकर यांनी केला.

“हे तेच बिल्डर आहे ज्यांनी जैन होस्टेल खरेदी करण्यासाठी दोन नंबरचा लिलाव लावला आणि हे देखील पुन्हा मुरलीधर मोहोळ यांचे पार्टनर. पुणे महानगरपालिकेत महापौर हे संविधानिक पद सांभाळत असताना एका खासगी व्यावसायिकाचं वाहन वापरणं हे महापौरांच्या नीतिमत्तेला धरून आहे का? साडेनऊ हजार कोटींचं बजेट असलेल्या महापालिकेला महापौरांसाठी साधी गाडी घेता नाही आली का? या बिल्डरची गाडी वापरत असताना महापौर पदाचा वापर करून संबंधित बिल्डरला फायदा होतील असे किती प्रकल्प मंजूर करून देण्यात आले? विशेषतः कोथरूड भागात मोठ्या प्रमाणात सोसायटीचे पुनर्विकास प्रकल्प बढेकर बिल्डरला देण्यात आलेले आहेत”, अशी टीका रवींद्र धंगेकर यांनी केली.