पुणे : जमीन खरेदीसाठी माहेरहून दोन कोटी रुपये आणण्यासाठी सुनेचा शारीरिक आणि मानसिक छळ करून तिच्या मृत्यूस कारणीभूत ठरल्याच्या प्रकरणात पसार असलेले राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षाचे मुळशीचे माजी तालुकाध्यक्ष राजेंद्र हगवणे आणि त्यांचे चिरंजीव सुशील हगवणे यांना प्रथम वर्ग न्याय दंडाधिकारी एन. एच. बारी यांनी पाच दिवस पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले.

वैष्णवी यांच्या आत्महत्येनंतर हगवणे पिता-पुत्र पसार झाले होते. पिंपरी-चिंचवड पोलिसांनी त्यांना शुक्रवारी अटक केली. त्यानंतर शिवाजीनगर सत्र न्यायालयात त्यांना हजर करण्यात आले त्यावेळी कडेकोट बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.

हगवणे यांची सून वैष्णवी शशांक हगवणे (वय २३, रा. मुक्ताई गार्डनजवळ, भुकूम) हिने आत्महत्या केल्याचे उघडकीस आले. याप्रकरणी तिचे वडील आनंद ऊर्फ अनिल बाळासाहेब कस्पटे (वय ५१, रा. वाकड) यांनी बावधन पाेलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार वैष्णवीचा पती शशांक, सासू लता, नणंद करिष्मा यांना १८ मे रोजी अटक करण्यात आली. न्यायालयाने त्यांना २६ मेपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. मात्र, वैष्णवीचे सासरे राजेंद्र तुकाराम हगवणे आणि दीर सुशील राजेंद्र हगवणे हे दोघे पसार होते.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

सात दिवसांपासून हगवणे पिता-पुत्र पसार होते. त्यांच्या शोधासाठी पोलिसांची पाच तपास पथके रवाना करण्यात आली होती. अखेर या दोघांना शुक्रवारी पहाटे अटक करण्यात आली. आरोपींनी केलेला गुन्हा गंभीर स्वरूपाचा आहे, त्यांना सात दिवस पोलीस कोठडीत ठेवण्याची विनंती सरकारी वकील योगेश कदम यांनी केली. आरोपींकडून अ‍ॅड. शिवम निंबाळकर यांनी बाजू मांडली. भारतीय जनता पक्ष महिला आघाडीकडून न्यायालयाच्या बाहेर आंदोलन करण्यात आले.