Vaishnavi Hagawane Death Case : पुणे जिल्ह्यातील मुळशी तालुक्यातील वैष्णवी हगवणे हिने १६ मे रोजी राहत्या घरी गळफास घेत स्वत:चं जीवन संपवल्याची घटना नुकतीच समोर आली आहे. सासरच्या कुटुंबाकडून होत असलेल्या हुंड्याच्या जाचाला कंटाळून तिने स्वत:चं जीवन संपवल्याचा आरोप वैष्णवीच्या माहेरच्या कुटुंबाने केला आहे. या घटनेनंतर संपूर्ण महाराष्ट्रातून संतप्त प्रतिक्रिया उमटल्या आहेत. या प्रकरणात पोलिसांनी गुन्हा दाखल करत आरोपींना अटक केलं आहे.
दरम्यान, आज वैष्णवी कस्पटे-हगवणे हिचे वडील अनिल कस्पटे यांची राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी भेट घेतली. या वेळी अजित पवार यांच्याशी काय चर्चा झाली? अजित पवार यांनी काय शब्द दिला? या विषयीची माहिती अनिल कस्पटे यांनी माध्यमांशी संवाद साधताना सांगितलं आहे. तसेच वैष्णवीबरोबर नेमकं काय घडलं? याची अपबिती अजित पवार यांनी सांगितली असल्याचंही अनिल कस्पटे यांनी सांगितलं.
वैष्णवीच्या वडिलांनी काय म्हटलं?
राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी वैष्णवीचे वडील अनिल कस्पटे यांची भेट घेतली. या भेटीबाबत बोलताना अनिल कस्पटे म्हणाले की, “अजित पवार यांनी सकारात्मक चर्चा केली. त्यांनी सांगितलं की आमच्या कुटुंबाला न्याय मिळेल. न्याय व्यवस्थेवर आमचा विश्वास आहे. आम्ही अजित पवार यांच्याकडे हा खटला फास्टट्रॅकवर चालवण्याची मागणी केली आहे”, असं अनिल कस्पटे सांगितलं.
तसेच या प्रकरणात वकिलाबाबतीत काही बोलणं झालं नाही. मात्र, अजित पवार यांनी सांगितलं की बोलणं होईल. वैष्णवीबरोबर काय अपबिती झाली होती, तिच्याबरोबर काय घडलं? हे सर्व अजित पवार यांना आम्ही सांगितलं आहे. अजित पवार यांनी आम्हाला न्याय मिळून देण्याची ग्वाही दिली असून आमचा त्यांच्यावर विश्वास आहे. तसेच पोलीस देखील योग्य तपास करत असून आम्ही तपासावर समाधानी आहोत”, असं अनिल कस्पटे म्हटलं आहे.
नेमकं घटला काय घडली?
१६ मे २०२५ रोजी वैष्णवी शशांक हगवणे या २३ वर्षीय विवाहितेने गळफास घेऊन स्वत:चं जीवन संपवलं. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते राजेंद्र हगवणे यांची वैष्णवी सून होती.वैष्णवीच्या मृत्यूनंतर मोठी खळबळ उडाली. दरम्यान, वैष्णवीच्या माहेरच्या नातेवाईकांनी आरोप केला की, सासरच्या मंडळींनी हुंड्यासाठी तिचा मानसिक आणि शारीरिक छळ केला. लग्नाच्या वेळी ५१ तोळे सोने, एक फॉर्च्युनर कार आणि इतर महागड्या वस्तू दिल्या गेल्या होत्या. पण नंतरही वैष्णवीकडून आणखी पैशांची मागणी करण्यात आली आणि तिला घरातूनही बाहेर काढण्यात आलं होतं. वारंवार होणारा छळ सहन न झाल्याने तिने स्वत:चं जीवन संपवलं.
हगवणे पिता-पुत्राला २८ मेपर्यंत पोलीस कोठडी
वैष्णवी हगवणे हिच्या मृत्यू प्रकरणात राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षाचे माजी तालुकाध्यक्ष राजेंद्र हगवणे आणि चिरंजीव सुशील हगवणे यांना न्यायालयाने पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. हगवणे पिता-पुत्र पसार झाले होते. पण पिंपरी-चिंचवड पोलिसांनी त्यांना शुक्रवारी अटक केली.