पुणे : मळलेले, झिंगलेले, उदासवाण्या चेहऱ्यांचे जग नाकारत गीत, संगीत, शब्द, लय आणि भाषिक सरमिसळीतूून आकाराला आलेल्या ‘रॅप’च्या दुनियेत ‘व्हॉट्सअप मा गँग, वेलकम टू हूड’मुळे येरवड्यातील कंजारभाट झोपडपट्टीतला ‘वरूण कुमार’ पुण्याचा ‘डूड’ , ‘यंग डीएसए’ म्हणून लोकप्रिय झाला आहे. जगण्यातले वास्तव त्याचे शब्द बेफिकीरीने व्यक्त करतात. समाजमाध्यमांवर कोट्यवधी तरूणांना भुरळ पाडणाऱ्या पुण्याच्या या तरुणाची रंजक कहाणी प्रेरणादायी ठरत आहे.
सतारीचे सूर छेडणारे त्याचे संगीत नव्या समाजिक मूल्यांना वाट करून देते, तर आमच्याही जगण्यातली चीड, उद्वेग आणि संताप त्याच्या गाण्यातून व्यक्त होतो आहे, अशा प्रतिक्रिया अभ्यासक, चाहत्यांकडून व्यक्त केल्या जात आहेत.
‘व्हॉट्सअप मा गँग, वेलकम टू हूड’ या गाण्याचे रॅप संगीताच्या क्षेत्रात प्रसिद्धीच्या शिखरावर असलेला वरुण कुमार याच्याशी संवाद साधला असता तो म्हणाला, ‘कंजारभाट वस्तीतल्या जन्माने गरिबी, दारिद्र्यासोबतच संघर्षाचेही दान दिले. तिथल्या जगण्यातले शब्द कानावर पडत होते. काळजावर आघात करत होते. प्रत्येक शब्द नव्या चालीने, नव्या लयीने व्यक्त होण्यासाठी धडपडत होतो. वस्तीतल्या पोरांसोबत वाढताना, खेळताना, मस्ती करताना गाण्याला कधी आकार येत गेला कळालेच नाही. तिथल्या दारिद्र्याच्या वातावरणाने आलेले अनुभव, त्यातून तयार झालेल्या जगण्याच्या भावनेला रॅप संगीताचा मार्ग सापडला. घरच्या परिस्थितीने कॉर्पोरेट नोकरी धरायला लागली. ‘बीपीओ’मध्ये काम सुरू केले. संगीताची, रॅपची ओढ स्वस्थ बसू देत नव्हती म्हणून ती नोकरी सोडली. कुटुंबाचा पाठिंबा मिळाल्याने पुन्हा संगीत प्रवासाला सुरूवात केली.
‘लहानपणापासून रॅपची आवड होती, तिकडेच ओढा होता. पुण्यातील रॅपच्या अंडरग्राउंड सायफर सेशनमध्ये रॅप संगीताचे धडे गिरवलता आले. सायफर सेशन्स म्हणजे हिप-हॉप कलाकारांची अनौपचारिक सत्रे असतात. ज्यात एकमेकांना आपल्या बीट्स, रॅप ऐकवता येतात. तिथे आलेल्या मित्रांकडून अनेक गोष्टी शिकायला मिळाल्या, महत्वाचे म्हणजे आपणही रॅप करू शकतो हा विश्वास मिळाला. त्यांच्या सल्ल्यांमुळे रॅपचा फ्लो सुधारला, नव्या शैली वापरण्याचे कौशल्य शिकता आले,’ असे वरूण कुमार सांगतो.
वरुण कुमारचा सांगीतिक प्रवास
‘यंग डीएसए’ या टोपन नावाने २०२१ साली ‘यंग सितार’ हा पहिला रॅप, त्यानंतर २०२३ मध्ये ‘संगीत’ आले. मात्र ‘येडा यंग’ या गीताने वरूण कुमारला खरी ओळख मिळवून दिली. त्याच्या हे गाणे समाजमाध्यमांद्वारे लोखो तरूणांपर्यंत पोहोचले. त्यातल्या ओळी कित्येक व्हॉट्सअप स्टेटस आणि इंस्टाग्राम स्टोरीजवर झळकले. त्यातले सितारचे संगीत आणि बीट्सची रिदम लाखो युवांना भुरळ पाडत आहे. या यशानंतर त्याने ‘माफ कर’ या नवीन रॅपची निर्मिती केल्याची माहिती ‘यंग डीएसए’ टीमकडून देण्यात आली.
रॅप संगीत हे जगण्यातल्या वास्तवाला वाट मोकळी करून देण्यासाठी वरूण सारख्या नव्या कलाकारांनी निवडलेली भाषिक अभिव्यक्ती आहे. त्यात भाषेच्या शुद्ध-अशुद्धतेचा हट्ट नाही. तिथे नव्या पीढीने स्वीकारलेली मूल्ये, अधिक मोकळेपणाने आलेले व्यक्तिगत अनुभव कोणत्याही नियमांशिवाय बोलके होतात. त्याचे संगीत नव्या समाजिक मूल्यांचे आणि भाषिक-सामाजिक सरमिसळींचे प्रतिक आहे. – सुमीत चांदमारे, आर्ट अँड अस्थॅटिक्सचे अभ्यासक