बाळासाहेब जवळकर
पिंपरी-चिंचवड शहरात एके काळी काँग्रेसचे वर्चस्व होते. महापालिकेवर काँग्रेसचाच ताबा होता. मात्र, राष्ट्रवादी काँग्रेसची स्थापना झाल्यानंतर काँग्रेस पक्ष टप्प्याटप्याने रसातळाला गेला. राष्ट्रवादीची ताकद वाढत असतानाच काँग्रेस दुबळी होत गेल्याचे वेळोवेळी दिसून आले. पक्षाचे अस्तित्व टिकवण्यासाठी काँग्रेसचा आटापिटा सुरू असल्याचे चित्र विधानसभा निवडणुकीच्या निमित्ताने पुन्हा समोर आले आहे.
माजी शिक्षणमंत्री प्रा. रामकृष्ण मोरे असेपर्यंत शहरात काँग्रेसचा दबदबा होता. त्यांच्या निधनानंतर मात्र काँग्रेस पोरकी झाली. त्यानंतर, हळूहळू काँग्रेसचे पतन होत गेले. काँग्रेसचे बहुतांश कार्यकर्ते राष्ट्रवादीत दाखल झाले. आज शहराचे नेते म्हणून ज्यांच्याकडे पाहिले जाते, ते सर्वजण पूर्वाश्रमीचे काँग्रेसचे आहेत. ज्या महापालिकेत काँग्रेसने अनेक वर्षे सत्ता राबवली, त्या पिंपरी पालिकेत २०१२ च्या निवडणुकीत काँग्रेसचे कसेबसे २० नगरसेवक निवडून आले. त्यानंतर २०१७ मध्ये काँग्रेसला खातेही उघडता आले नाही.
लोकसभा निवडणुकीत शहराचा समावेश मावळ आणि शिरूर लोकसभेत होतो. गेल्या अनेक वर्षांपासून दोन्हीही मतदार संघ राष्ट्रवादी काँग्रेसच्या वाटणीला आहेत. त्यामुळे लोकसभा निवडणुकीच्या काळात काँग्रेसचे पंजा चिन्ह शहरभरात कुठेही नसते. गेल्या लोकसभा निवडणुकीत पार्थ पवार आणि डॉ. अमोल कोल्हे यांच्यामुळे राष्ट्रवादीची मतांची टक्केवारी वाढली. काँग्रेसला ताकद वाढवण्याची तशी संधी मिळालेली नाही.
विधानसभा निवडणुकीसाठी काँग्रेस-राष्ट्रवादीत आघाडी झाल्यास जागावाटपात शहरातील तीनही विधानसभा मतदार संघ राष्ट्रवादीकडे जातात. मात्र, त्यातील भोसरी आणि चिंचवड या दोन मतदार संघांत राष्ट्रवादीने स्वत:चे उमेदवार रिंगणात उतरवले नाहीत. विलास लांडे आणि राहुल कलाटे या अपक्षांना पुरस्कृत करण्याची खेळी राष्ट्रवादीने केली. हे करताना काँग्रेसला विश्वासात घेतले नाही, असा आक्षेप घेत शहराध्यक्ष सचिन साठे यांनी बराच कांगावा केला. अखेर, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात आणि अजित पवार यांच्यातील चर्चेनंतर त्या विषयावर पडदा पडला. आता २०२२ च्या महापालिका निवडणुकांचे वेध काँग्रेसला लागले आहेत. मात्र, शहरात काँग्रेसची स्थिती फारशी सुधारलेली नसल्याचे स्पष्टपणे दिसून येते.
लोकसभा निवडणुकीत एक मतदार संघ तसेच विधानसभेसाठी तीनपैकी एक मतदार संघ काँग्रेसला मिळाला नाही. महापालिका निवडणुकीत राष्ट्रवादी आणि काँग्रेस यांच्यात आघाडी नाही, त्याचा फटका दोन्हीही काँग्रेसला बसला. राष्ट्रवादीने सकारात्मक भूमिका घेऊन दोन पावले मागे येण्याची गरज होती. अशा प्रकारे डावलण्यात येत असल्याने काँग्रेसचा मतदार नाराज होतो, याचा विचार राष्ट्रवादीच्या नेत्यांनी करायला हवा. नाहितर भविष्यात स्वबळावर वाटचाल करण्याशिवाय दुसरा पर्याय आमच्यापुढे नाही.
– सचिन साठे, शहराध्यक्ष, पिंपरी काँग्रेस