पिंपरी : शिरूर लोकसभा मतदारसंघातून शिवसेनेचे माजी खासदार शिवाजीराव आढळराव-पाटील यांना राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये घेऊन अधिकृत उमेदवारी दिल्याने नाराज झालेले भोसरीचे माजी आमदार विलास लांडे हे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात जाणार असल्याची चर्चा आहे. त्यातच अनेकांना शरद पवार गटात आणण्यासाठी प्रयत्न करणारे शिरुरचे खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनीही सूचक विधान केले आहे.

विलास लांडे यांनी २००९ मध्ये लोकसभेची निवडणूक लढविली होती. २०१९ मध्येही त्यांनी जोरदार तयारी केली. परंतु, ऐनवेळी शिवसेनेतून आलेल्या डॉ. अमोल कोल्हे यांना राष्ट्रवादीची उमेदवारी मिळाल्याने त्यांची संधी हुकली होती. राष्ट्रवादीची दोन शकले झाल्यानंतर त्यांनी अजित पवार यांच्यासोबत राहणे पसंत केले. महायुतीत शिरुर मतदारसंघ राष्ट्रवादीला मिळणार असल्याचे निश्चित झाल्याने लांडे यांनी पुन्हा लोकसभेची उमेदवारी मागितली. मला लोकसभेची उमेदवारी देत नसाल तर आयात उमेदवार देऊ नका, असे म्हणत आढळराव यांच्या उमेदवारीला विरोध केला होता. पण, त्यांचा विरोध नाकारुन आढळराव-पाटील यांना राष्ट्रवादीत घेऊन उमेदवारी जाहीर केली आहे.

हेही वाचा…राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्याच्या मुलावर हल्ला; दांडेकर पूल परिसरातील घटना, सहाजणांना अटक

आढळराव-पाटील यांची उमेदवारी जाहीर झाल्यापासून लांडे शांत आहेत. कोणतेही भाष्य करताना दिसत नाहीत. त्यामुळे लांडे हे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात प्रवेश करणार असल्याची चर्चा आहे. याबाबत भोसरी मतदारसंघात प्रचारासाठी आलेले खासदार डॉ. अमोल कोल्हे यांना विचारले असता ते म्हणाले, की श्री छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांवर चालणारा मी मावळा आहे. महाराजांची शिकवण आहे की मोहीम फत्ते झाल्यानंतर निकाल दिसला पाहिजे, मोहिमेची वाच्यता नको, असे म्हणत त्यांनी लांडे हे संपर्कात असल्याचे स्पष्ट संकेत दिले आहेत. त्यामुळे लांडे हे शरद पवार यांच्या पक्षात जातात का याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.