पुणे : राज्यातील सहकारी आणि खासगी साखर कारखान्यातील कामगारांच्या वेतनामध्ये दहा टक्के वाढ करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. साखर कारखाना मालक प्रतिनिधी, साखर कारखाना कामगार संघटना प्रतिनिधी आणि राज्य सरकार प्रतिनिधी यांच्या त्रिपक्षीय समितीच्या बुधवारी झालेल्या अंतिम बैठकीत हा निर्णय जाहीर करण्यात आला. त्यानुसार राज्यातील दीड लाख कामगारांना या वेतनवाढीचा फायदा मिळणार असून कामगारांचे प्रत्येकी वेतन २ हजार ६०० ते २ हजार ८०० रुपयांनी वाढणार आहे. दरम्यान, या वेतनवाढीमुळे साखर उद्योगावर ४१९ कोटींचा आर्थिक बोजा पडणार आहे.

राज्यातील साखर कारखाना कामगारांची वेतनवाढ आणि सेवाशर्तीच्या अनुषंगाने राज्य शासनाने त्रिपक्षीय समितीची स्थापना केली होती. या समितीच पाचवी आणि अंतिम बैठक राज्य सहकारी साखर कारखाना संघाचे अध्यक्ष आणि त्रिपक्षीय समितीचे अध्यक्ष पी. आर. पाटील यांच्या अध्यक्षतेखाली बुधवारी साखर संकुल येथे झाली. त्यामध्ये वेतनवाढीचा निर्णय घेण्यात आला. त्यानंतर त्याबाबतची माहिती पी. आर. पाटील यांनी पत्रकार परिषदेत दिली. समितीचे सचिव रविवाज इळवे, माजी आमदार प्रकाश सोळंके, साखर संघाचे माजी अध्यक्ष जयप्रकाश दांडेगावकर, सदस्य दिलीपराव देशमुख, प्रकाश आवाडे, साखर संघाचे व्यवस्थापकीय संचालक संजय खताळ, कामगार प्रतिनिधी मंडळाचे अध्यक्ष तात्यासाहेब काळे, कार्याध्यक्ष राऊ पाटील, कामगार महासंघाचे अध्यक्ष पी. के. मुंडे, सरचिटणीस आनंदराव वायकर यांच्या उपस्थितीत वेतनवाढीचा करार करण्यात आला.

राज्यातील साखर कामगारांना वेतनवाढ आणि अन्य मागण्यांसाठीच्या यापूर्वीच्या कराराची मुदत ३१ मार्च २०२४ ला संपली होती. नवीन करारासाठी साखर कामगारांनी आंदोलन केल्याने राज्य सरकारने त्रिपक्षीय समिती स्थापन केली होती.‘कामगारांना चाळीस टक्के वेतनवाढ द्यावी, असा प्रस्ताव कामगार संघटनांनी दिला होता. त्यावर कारखान्यांच्या वतीने चार टक्के वाढीचा प्रस्ताव देण्यात आला. मात्र, कारखाना प्रतिनिधी ७ टक्क्यांवर तर कामगार संघटना १८ टक्के वेतनवाढीवर ठाम राहिल्या. त्रिपक्षीय समितीमध्ये तोडगा निघत नसल्याने याप्रश्नी माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांचा लवाद स्थापन करण्याचा निर्णय एकमताने घेतला. पवार यांच्या सूचनेनुसार दहा टक्के वेतनवाढीचा निर्णय घेण्यात आला आहे,’ असे पी. आर. पाटील यांनी स्पष्ट केले.

वेतन करारातील तरतुदी

– दहा टक्के वेतनवाढ १ एप्रिल २०२४ ते ३१ मार्च २०२९ पर्यंत लागू

– वेतनवाढीचा दीड लाख कामगारांना लाभ

– अकुशल ते निरीक्षक अशा १२ वेतनश्रेणीत कामगारांना २,६२३ ते २,७७३ रुपये वेतनवाढ

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

– धुलाई भत्ता, घरभाडे भत्ता, वैद्यकीय भत्ता, महागाई भत्ता या वाढीचा समावेश