पुणे : पुणेकरांना दैनंदिन जीवनात भेडसावणाऱ्या नागरी समस्या सोडविण्यासाठी ‘#वेकअप पुणेकर’ ही लोकचळवळ सोमवारपासून (५ फेब्रुवारी) सुरू होत आहे. या अभियानात समस्यांवरील उत्तरेही पुणेकरांकडूनच जाणून घेऊन ती संबंधित विभागाकडे मांडून त्यावर उपाययोजना करण्यात येणार आहेत. याचबरोबर पुण्यातील वाहतूक कोंडी फोडण्यासाठी ‘#अडकलाय पुणेकर’ मोहीमही राबविण्यात येणार आहे.

‘#वेकअप पुणेकर’चे संयोजक माजी आमदार मोहन जोशी यांनी रविवारी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. यावेळी प्रवीणकुमार बिराजदार, प्रथमेश आबनावे, रोहन सुरवसे पाटील उपस्थित होते.

जोशी म्हणाले की, गेल्या दहा वर्षांत पुण्याचा विस्तार झाला. लोकसंख्याही मोठ्या प्रमाणात वाढली. त्याबरोबरच वाहतूक, पाणीपुरवठा, आरोग्य, स्वच्छता, हवा प्रदूषण याबाबतचे प्रश्नही निर्माण झाले. या प्रश्नांवर उपाययोजना काय असाव्यात, याची उत्तरे पुणेकरांकडून जाणून घेण्यात येतील. त्यातून पुणेकरांमध्ये जागृती निर्माण होईल आणि जनमताचा रेटा निर्माण झाला की समस्या नेमकेपणाने सोडविणे अधिक सोपे जाईल, या उद्देशाने ‘#वेकअप पुणेकर’ ही लोकचळवळ उभी करीत आहोत. यात स्वयंसेवी संस्था, जागरूक नागरिक, विविध विषयांचे तज्ज्ञ, सामाजिक कार्यकर्ते सहभागी असतील.

हेही वाचा >>>पुणे : आवक वाढल्याने बहुतांश फळभाज्यांच्या दरात घट

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

पुण्यात दुचाकी, चारचाकी वाहनांची संख्या वाढत आहे. शहराच्या सर्व भागातील वाहतुकीची कोंडी होणारी ठिकाणे, सिग्नल या ठिकाणी ‘#अडकलाय पुणेकर’ मोहीम राबविली जाईल. या मोहिमेतील स्वयंसेवक वाहनचालकांकडून प्रश्नावलीचा अर्ज भरून घेतील. या प्रश्नावलीत समस्यांवरील उत्तरेही अपेक्षित आहेत. ही मोहीम १५ दिवस राबविल्यानंतर प्रश्नावलीच्या आधारे माहिती संकलित केली जाईल आणि पुणेकरांनी सुचविलेल्या उपाययोजनांची छाननी करून ती राबविण्यासाठी ‘वेकअप पुणेकर’ मार्फत कसोशीने प्रयत्न करण्यात येतील, असे जोशी यांनी सांगितले.