|| आनंद सराफ

वारजे परिसर ही पुण्याचीच प्रतिकृती वाटते. मुबलक पाणी, तुलनात्मक स्वस्त घरे, हमरस्त्यांचे सान्निध्य, मध्यमवर्गीयांच्या सोसायटय़ा, उपेक्षितांच्या वस्त्या, हॉस्पिटल, शिक्षणसंस्था, गायब शेतजमिनी, विहिरी, काँक्रिटची जंगले, मंदिरे पार आणि तालिमींचा नवा चेहरा, बाहेरील विद्यार्थ्यांची वाढती संख्या, छोटय़ा-मोठय़ा हॉटेल्स टपऱ्यांची गर्दी, वाढती अतिक्रमणे, कागदोपत्री शिल्लक राहिलेले टेकडय़ांचे नियम, सर्वपक्षीय लोकप्रतिनिधींचे कार्य, त्यातून उद्भवणारे विकासाचे अधिक उणेपण.! जगा आणि जगू द्या तत्त्वावर जगन्नाथाचा रथ वाटचाल करतो, तसेच इथे पण आहे.

पुण्याच्या पश्चिमेची वाढ विचारात घेता स्वातंत्र्यपूर्व काळात नदीच्या अलीकडेच शहर मर्यादित होते. त्या पलीकडे वाडय़ा-वस्त्या स्वरूपात गावे होती. पुणे नगरपालिका अस्तित्वात आल्यावर आसपासची गावे टप्प्याटप्प्याने शहरात सामावली जाऊ लागली. पानशेत पुरानंतर पुण्याचा चौफेर विकास होऊ लागला तरी पश्चिमेला थेट डोंगररांगांपर्यंत शेतजिमनी, ओढे आणि विहिरी मुबलक प्रमाणात उपलब्ध होत्या. ऐंशीच्या दशकात कोथरूडचा झपाटय़ाने विकास सुरू झाला. त्यानंतर पौड, कर्वेनगर आणि वारजे असे क्षेत्र विस्तारत गेले.

कर्वे रस्त्याने आपण थेट सरळ पुढे गेलो की कर्वेनगरच्या सीमेवरच आंबेडकर चौक आहे. येथूनच वारजे हद्द सुरू होते. ती थेट गणपती माथा, पावश्या गणपती, डुक्कर खिंड, चांदणी चौक, वडगाव पूल अशा परिसरात वारजे गाव आता विस्तारले आहे. पूर्वी पन्नास-साठ उंबरा असलेल्या या गावाची वस्ती आता लाखापुढे गेली आहे. वारजे गावठाण आता चार-पाच जुन्या घरांचा अपवाद वगळता हळूहळू बदलते आहे. जीर्णोद्धार आणि दुरुस्ती करताना मंदिरांचे स्वरूप पालटते आहे. तालमीतील लाल मातीचे हौद जपताना मॅट आणि जिमचा पसारा वाढला आहे. पूर्वी पंचक्रोशीतील जत्रा गाजवणारे पैलवान आता राज्य आणि राष्ट्रीय पातळीवर पोचले आहेत. मंदिराच्या कळसापेक्षा कोणाचेही घर उंच असू नये, हा नियम आता मागे पडला आहे. समृद्ध गोठे आणि बैलगाडय़ांची जागा आता अद्ययावत डेअरी आणि आलिशान वाहने घेत आहेत हे आणि असे काही वारजे गावातही दिसत आहे. पारावर भरणाऱ्या शाळा संपून इंग्रजी माध्यमांच्या शाळेत झिंगल बेलचा गजर घुमतो आहे.

वारजे १९९७ मध्ये पालिकेत समाविष्ट झाले. बापूजी बुवा हे ग्रामदैवत, पावश्या गणपती, भैरवनाथ, विठ्ठल, महालक्ष्मी, मारुती ही इतर मंदिरे आहेत. गावात अजूनही बारमाही उत्सवांची परंपरा आहे. काकड आरती, गोकुळ अष्टमी, चैत्री पौर्णिमेनंतरची जत्रा, कुस्त्यांचे जंगी आखाडे, रोख इनाम, झांज पथकांचे खेळ, छबिना असे सर्व काही अजूनही चालू असल्याची माहिती मिळाली. बैलपोळ्याला पूर्वी मोठी मिरवणूक निघून देवस्थानांचे दर्शन घेतले जात असे. आता मात्र गोठे संपल्याने ही प्रथा इतिहासजमा होण्याची चिन्हे आहेत. या सर्व उत्सवांमध्ये गावातील मूळची घराणी, पोळ, चौधरी, बराटे, बोडके असे सर्व जण सहभागी होत असत. सर्व गावकऱ्यांचे शेती हेच महत्त्वाचे उत्पन्नाचे साधन होते. घरटी गोठा असल्याने दूध दुभतेही मुबलक होते. ज्वारी, बाजरी, हरभरा, भुईमूग ही मुख्य पिके होती. यशवंत सहकारी साखर कारखाना सुरू झाल्यावर नदीकाठाने ऊस लागवड सुरू झाली आणि गावात गुऱ्हाळेपण दिसू लागली. सुमारे शंभर वर्षांपूर्वी येथील शेतकरी आपला माल, पुण्याची मंडई आणि डेक्कन परिसरात विकून येताना गावातून किराणा माल आणीत असत.

वारजे गावाच्या विधायक कार्यातील नव्या पिढीचा विचार करता सचिन दांगट, दत्ता झंजे, सचिन बराटे, संजय भोर, नीलकंठ शेळके, संदीप यादव, ज्ञानेश्वर वांजळे, सचिन दोडके इ. नावे समजली. कुस्ती शौकिनांचे गाव म्हणून ख्यातनाम असलेल्या या गावाने अमोल बराटेच्या रूपाने हिंद केसरी दिला आहे. परिसरात कोटय़वधी रुपयांची विकासकामे झाली आहेत. लोकवस्तीचा पाहता आता मूळ गावकरी जेमतेम ५ टक्के आहेत. गावकऱ्यांनी शेतजमिनी विकल्या तरी काळय़ा आईशी नाते कायम आहे. वारकरी परंपरेचा वारसा, पिढय़ान् पिढय़ा जपला जातोय. आदरातिथ्याची, पाहुणचाराची खानदानी पद्धत आजही टिकून आहे. हाऊसिंग सोसाटय़ांमध्ये निर्मिती, वाराणसी, स्वेदगंगा, आपटे, सुरभी, राजयोग, पीएमटी, ब्रह्मचैतन्य, गीतांजली, तपोधाम, विश्वविद्या, दत्तदिगंबर सिद्धकला यांची नावे समजली. गावातील बुजुर्गाशी चर्चा करताना अनेकांनी गावकीच्या रम्य आठवणी सांगितल्या. उरसाची मिटिंग, नागपंचमीचे झोके, सूरपारंब्याचा खेळ, हनुमान जयंतीला होणारे अचाट शक्तीचे प्रयोग, उत्सवाचे वेळी घराघरातून गोळा केला जाणारा शिधा असे खूप काही समजले. सुख-सोयी वाढल्या. पण गावाचे गावपण विस्मृतीत जाऊ नये, हाच सूर या सर्वाचा होता. गावाची माहिती देण्यासाठी रामभाऊ बराटे, दिलीप बराटे या ज्येष्ठांप्रमाणे धनराज माने, केदार बराटे, पूर्णल पोळ यांचे सहकार्य लाभले.

संदर्भ साहित्य-  हरवलेले पुणे

(अविनाश सोवनी) आणि नगर नियोजन (अनिरुद्ध पावसकर)