पिंपरी: मराठा समाजाला आरक्षण मिळावे या मागणीसाठी मराठा समाज पुन्हा एकदा आक्रमक होणार असल्याची चिन्हे आहेत. मराठा आरक्षण समन्वय समितीचे अध्यक्ष सुभाष जावळे पाटील यांनी तसा इशाराच दिला आहे. मराठा समाजाच्या मागण्या पूर्ण न केल्यास जिल्ह्या- जिल्ह्यात पालकमंत्र्यांच्या निवसासमोर जागरण गोंधळ घालणार असल्याचे त्यांनी म्हटलं आहे. तसेच, १ जून ला मुख्यमंत्र्यांच्या दालनासमोर उपोषण करणार असल्याचा इशारा त्यांनी दिला आहे. ते पिंपरी- चिंचवडमध्ये आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते. आज आकुर्डी येथे मराठा आरक्षण एल्गार परिषद पार पडली. यावेळी सुधाकर माने, धनाजी येळकर यांच्यासह विविध जिल्ह्यातील समन्वयक उपस्थित होते.

सुभाष जावळे म्हणाले, संघर्षातून आणि त्यागातून मराठा समाजाला मिळालेले आरक्षण सर्वोच्च न्यालायने फेटाळून लावले. आरक्षण न मिळाल्याने मराठा समाजात प्रचंड असंतोष निर्माण झाला आहे. आज एल्गार परिषद झाली. यात अनेक महत्वाचे निर्णय झाले आहेत. मराठा समाजाला ओबीसींच आरक्षण नको आम्हाला स्वतंत्र आरक्षण हवं आहे. राज्यसरकार ने यावर विचार करावा, वेळ पडल्यास घटना बदलावी. त्यांना कुठलीच अडचण येणार नाही. केंद्रात आणि राज्यात त्यांचे सरकार आहे. ते पुढे म्हणाले की, संभाजी महाराज यांची जयंती होताच जिल्ह्या- जिल्ह्यातील पालकमंत्र्यांच्या घरासमोर जागरण गोंधळ घालणार आहोत. तरीही सरकारला सद्बुद्धी नाही मिळाली तर मात्र कुठल्याही मंत्र्यांना आम्ही रस्त्यावर, मतदारसंघात फिरू देणार नाहीत. त्यांना आम्ही काळे झेंडे दाखवणार. तसेच, १ जून ला आम्ही मुख्यमंत्र्यांच्या दालनासमोर उपोषणाला बसणार आहोत असा इशारा त्यांनी दिला आहे.