पुणे : भारतीय नौदलाकडे ‘आयएनएस उदयगिरी’ ही आधुनिक ‘स्टेल्थ फ्रिगेट’ (युद्धनौका) नुकतीच सुपूर्द करण्यात आली. या माध्यमातून भारतीय नौदलाच्या शक्तीला मजबुती देण्यासाठी किर्लोस्कर ब्रदर्स लिमिटेड (केबीएल) या पुण्यातील कंपनीने योगदान दिले आहे. त्यांनी युद्धनौकेसाठी विशेष प्रकारचे ‘कॅन्ड मोटर पंप’ पुरवले आहेत. या अत्याधुनिक युद्धनौकेच्या उभारणीत केबीएलच्या स्वदेशी तंत्रज्ञानाचा वाटा आहे.

‘आयएनएस उदयगिरी’ ही सात नव्या ‘स्टेल्थ फ्रिगेट्स’पैकी दुसरी नौका आहे. पारंपरिक तसेच असममित धोके (असिमेट्रिक थ्रेट्स) ओळखून त्यांना सामोरे जाण्याची क्षमता या फ्रिगेटमध्ये आहे. खोल समुद्रात मोहीम पार पाडणाऱ्या या युद्धनौकेसाठी ‘किर्लोस्कर’ने २२ आणि ३० किलोवॅट क्षमतेचे कॅन्ड मोटर पंप विकसित केले आहेत. हे पंप पूर्णपणे बंदिस्त, गळतीविरहित, सुरक्षित आणि आवाजरहित आहेत. त्यामुळे युद्धनौकेच्या कार्यक्षमतेत भर घालणारे ठरले आहेत.

याबाबत कंपनीने म्हटले आहे, की या पंपांचा उपयोग जहाजावरील विविध द्रव व्यवस्थापन प्रक्रियांसाठी होतो. ‘मेक इन इंडिया’ मोहिमेच्या पार्श्वभूमीवर देशाच्या संरक्षण उत्पादनात स्वयंपूर्णतेकडे टाकलेले हे एक महत्त्वाचे पाऊल आहे. ‘केबीएल’ने यापूर्वीही विविध संरक्षण प्रकल्पांमध्ये यशस्वीरीत्या काम केले असून, नौदलासाठीची ही नवी पूर्तता त्यांची तांत्रिक ताकद दर्शवते. ‘आयएनएस उदयगिरी’ची यशस्वी उभारणी आणि त्यात ‘केबीएल’चा सहभाग, देशाच्या संरक्षण स्वावलंबनाच्या दिशेने टाकलेले ठोस पाऊल मानले जात आहे. नौदलाच्या आधुनिकीकरणातील या टप्प्यामुळे भारताच्या संरक्षण क्षेत्रातील वाढते कौशल्य अधोरेखित झाले आहे.

उदयगिरी युद्धनौकेची माहिती

माझगाव डॉक शिपबिल्डर्स लिमिटेड (एमडीएसएल) येथे बांधलेली प्रोजेक्ट १७ ए श्रेणीतील स्टेल्थ युद्धनौका प्रकारातील दुसरी नौका उदयगिरी आहे. तिचे जलावतरण १ जुलैला झाले. स्ध्या सेवेत सक्रिय असलेल्या शिवालिक वर्ग (प्रोजेक्ट १७) युद्धनौकांचाच एक भाग आहे. माझगाव डॉक लिमिटेड, मुंबई आणि गार्डन रिच शिप बिल्डर्स आणि इंजिनीअर्स(जीआरएसई), कोलकाता येथे निर्मिती होत असलेल्या सात पी १७ ए युद्धनौकांपैकी उदयगिरी ही दुसरी नौका आहे. या युद्धनौका ‘नील जल’ वातावरणातील परिचालनास सुयोग्य असून, भारताच्या सागरी हितसंबंध क्षेत्रातील पारंपरिक आणि अपारंपरिक धोक्यांना तोंड देण्यास सक्षम आहेत. उदयगिरी हा त्याच्या पूर्वीच्या ‘आयएनएस उदयगिरी’चा आधुनिक अवतार आहे. ते ३१ वर्षांच्या सेवेनंतर २४ ऑगस्ट २००७ रोजी निवृत्त झाले होते.

वैशिष्ट्ये

– ‘आयएनएस उदयगिरी’ ही सात नव्या ‘स्टेल्थ फ्रिगेट्स’पैकी दुसरी नौका

– पारंपरिक तसेच असममित धोके (असिमेट्रिक थ्रेट्स) ओळखून त्यांना सामोरे जाण्याची क्षमता

– ‘किर्लोस्कर’कडून २२ आणि ३० किलोवॅट क्षमतेचे कॅन्ड मोटर पंप विकसित

– हे पंप पूर्णपणे बंदिस्त, गळतीविरहित, सुरक्षित आणि आवाजरहित