लोकसत्ता प्रतिनिधी
पिंपरी: तिसऱ्या फेरीत समावेश झाल्यानंतरही पिंपरी-चिंचवड स्मार्ट सिटीचे प्रकल्प अग्रस्थानी राहिले आहेत. शहर सध्या २० व्या क्रमांकावर आहे. स्मार्ट सिटीच्या २५ प्रकल्पांपैकी १६ प्रकल्प पूर्ण झाले आहेत. उर्वरित नऊ प्रकल्पांचे ८० टक्के काम झाले आहे. ई-सर्व्हेलन्स हा प्रकल्प अत्यंत नावीन्यपूर्ण असून त्याद्वारे रस्त्यांवरील वाहनांवर नजर ठेवण्यात येणार असल्याचे मुख्य कार्यकारी अधिकारी शेखर सिंह यांनी सांगितले.
स्मार्ट सिटी प्रकल्पांतर्गत शहराच्या विकास कामांचे अनुषंगाने शहर सल्लागार समितीची बैठक झाली. खासदार श्रीरंग बारणे, जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख, सह मुख्य कार्यकारी अधिकारी किरणराज यादव, मुख्य माहिती आणि तंत्रज्ञान अधिकारी निळकंठ पोमण उपस्थित होते.
आणखी वाचा-पिंपरी: श्वान पाळताय? परवाना घ्या, नाहीतर…
जीआयएस प्रकल्पाद्वारे शहरातील उंच इमारती, रस्त्यांचे मोजमाप, बांधकाम यांची माहिती संकलित करून यावर नियंत्रण ठेवण्यास मदत होणार आहे. म्युनिसिपल ई-क्लासरुम प्रकल्प महापालिकेच्या १२३ शाळांमध्ये राबविला आहे. मराठी, हिंदी, इंग्रजी, उर्दू भाषांचे धडे दिले जात आहे. वर्ग खोल्यांमध्ये स्मार्ट टीव्ही तसेच विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसाठी सीसीटीव्ही बसविण्यात आले आहेत. कृत्रिम बुद्धिमत्तेचा उपयोग करून विद्यार्थी आणि शिक्षकांवर नजर ठेवली जाणार आहे. शाळांवर नियंत्रण ठेवण्यासाठी इज्युकेशन सारथी सुरू करण्याचे नियोजन आहे. शहरातील ६० पैकी ४७ व्हीएमडी कार्यरत आहेत. ९५ टक्के सिटी नेटवर्कचे काम पूर्ण झाले आहे. शहरातील दहापैकी आठ ठिकाणी स्मार्ट पार्किंगचे काम पूर्ण झाले असून लवकरच हा प्रकल्प पूर्ण होईल. स्मार्ट पर्यावरण, स्मार्ट वॉटर, स्मार्ट सेव्हरेज, घनकचरा व्यवस्थापन प्रकल्प देखील प्रगतिपथावर असल्याचे शेखर सिंह यांनी सांगितले.
आणखी वाचा-किरकोळ चुकांसाठी सहकारी बँकांना बसतोय लाखोंचा भुर्दंड
सीसीटीव्ही यंत्रणा पूर्ण क्षमतेने कार्यान्वित करावी
महापालिका शाळेतील विद्यार्थ्यांना आवश्यक सुविधा उपलब्ध करून देणे गरजेचे आहे. शाळांमधील स्वच्छता, शौचालये, विद्यार्थ्यांच्या समस्यांकडे लक्ष द्यावे. दिल्ली, मुंबई प्रमाणे महापालिका शाळेतील विद्यार्थ्यांचा शिक्षणाचा दर्जा उंचवावा. शहरातील जास्तीत-जास्त मुलांनी महापालिका शाळांमध्ये प्रवेश घ्यावा, यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करावेत. शहरातील नागरिकांच्या सुरक्षेसाठी सीसीटीव्ही यंत्रणा पूर्ण क्षमतेने कार्यान्वित करावी, अशी सूचना खासदार श्रीरंग बारणे यांनी केली.