५२ हजार नागरिक बाधित; भोर, पुरंदर आणि आंबेगाव अशा तीन तालुक्यांमध्ये पाणीपुरवठा

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

जिल्ह्य़ातील भोर, पुरंदर, आंबेगाव तालुक्यांमध्ये सात टँकरने पाणीपुरवठा केला जात आहे, तर पुणे विभागातील सांगली, सातारा जिल्ह्य़ांमध्येही टँकरची मागणी वाढत आहे. विभागामध्ये १५ मे अखेर १०३ वाडय़ा, ४१ गावांमधील ५२ हजार ६६३ नागरिक आणि १० हजार ४२४ जनावरांना शासकीय बावीस आणि पंधरा अशा एकूण ३७ टँकरने पाणीपुरवठा करण्यात येत असून पावसाळ्यापर्यंत टँकरची मागणी वाढणार आहे.

जिल्ह्य़ातील भोर, पुरंदर आणि आंबेगाव अशा तीन तालुक्यांमध्ये सतरा वाडय़ा, सात गावांमधील १० हजार १७६ बाधित नागरिकांना आठ शासकीय टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्यात येत आहे. सांगली जिल्ह्य़ातील खानापूर तालुक्यामध्ये एक वाडी, पाच गावांमधील सहा हजार ७८२ बाधित नागरिकांना तीन टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्यात येत आहे. सातारा जिल्ह्य़ातील खटाव, माण, कोरेगाव, पाटण, महाबळेश्वर, खंडाळा आणि जावळी तालुक्यांमधील ८३ वाडय़ा, २९ गावांमधून ३५ हजार ३४ नागरिक आणि १० हजार ४२४ जनावरे बाधित झाली आहेत. या ठिकाणी अकरा शासकीय, तर पंधरा खासगी अशा एकूण २६ टँकरने पाणीपुरवठा केला जात आहे.

सद्य:स्थितीत विभागातील सोलापूर आणि कोल्हापूर जिल्ह्य़ात एकाही टँकरची मागणी नसल्याचे त्याठिकाणी पाणीटंचाईसदृश परिस्थिती नसल्याचे निदर्शनास आले आहे. परंतु, कोल्हापूर जिल्ह्य़ात ६७१ नागरिक बाधित असून दोन विहिरींचे अधिग्रहण करण्यात आले आहे. त्यामुळे कोल्हापूर जिल्ह्य़ात टँकरने पाणीपुरवठा केला जात नसल्याचे विभागीय आयुक्तालयाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.

विभागातील पुणे, सातारा, सांगली आणि कोल्हापूर जिल्ह्य़ात मिळून २६ विहिरींचे अधिग्रहण करण्यात आले असून या माध्यमातूनही पाणीपुरवठा केला जात आहे. राज्यातील धरणांमध्ये चाळीस टक्के पाणीसाठा शिल्लक असल्याचे राज्याच्या जलसंपदा विभागाकडून सांगण्यात आले आहे. त्यामुळे पाणी वापर आणि वितरकांमध्ये नियोजन ढासळल्यास पाणीटंचाईला सामोरे जावे लागण्याची शक्यता नाकारता येत नसल्याचेही विभागाने स्पष्ट केले आहे.

तीन तालुक्यांमध्ये आठ टँकर

पुणे जिल्ह्य़ात दोन आठवडय़ांपूर्वी पुरंदरमधील चार हजार ८१९ नागरिकांना टँकरने पाणीपुरवठा करण्यात येत होता. त्यामध्ये भोर आणि आंबेगावमधील अनुक्रमे एक हजार २३२ आणि ४ हजार १२५ अशा पाच हजार ३५७ नागरिकांची भर पडली आहे. या तीनही तालुक्यांमध्ये आठ टँकरने पाणीपुरवठा केला जात आहे. दरम्यान, जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी मागणी येणाऱ्या प्रत्येक तालुका, गावाला पाणीपुरवठा करण्याचे आदेश दिले आहेत.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Water tanker demand in pune district
First published on: 16-05-2018 at 04:01 IST