पुण्याचा कचराप्रश्न मार्गी लावण्याच्या निमित्ताने भाजप आणि शिवसेना यांच्यातील मतभेद चव्हाट्यावर आले आहेत. पिंपरी सांड्स येथे कोणत्याही परिस्थिती कचरा प्रकल्प होऊ देणार नाही, अशी ठाम भूमिका शिवसनेच्या खासदारांनी बोलून दाखवली. महापालिकेपासून ते केंद्र सरकारपर्यंत या प्रकल्पासाठी प्रयत्न केले तरी नियोजित प्रकल्प होऊ देणार नाही, असा निर्धार खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांनी केला आहे. पुणे महापलिकेच्या आढावा बैठकीनंतर ते बोलत होते.
केंद्रात आणि राज्यात सरकारसोबत असून शिवसेना सरकारला विरोध का करते, असा प्रश्न त्यांना विचारण्यात आला होता. याप्रश्नावर ते म्हणाले की, आम्ही सत्तेत आहोत की, नाही हा मोठा प्रश्न आहे. पिंपरी सांड्स येथील जागेसाठी माझ्यासह तेथील ग्रामस्थांचा कायम विरोध राहणार असून, पुणे महापालिकेने शहरात प्रकल्प राबवण्याची गरज आहे.
तसेच याच मतदारसंघात हडपसर भाग देखील येत असून या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर अनधिकृत बांधकामे करण्यात आली आहेत. त्यावर प्रशासन लक्ष देत नाही. त्यावर महापालिकेने लक्ष देऊन कारवाई केली पाहिजे, अशी मागणी त्यांनी केली. राज्य आणि केंद्र सरकारमार्फत मंजूर करून आणलेल्या प्रकल्पाचे काम महापालिका प्रशासन संथगतीने होत असल्याबाबत नाराजी व्यक्त केली. तसेच हडपसर मतदार संघात येवलेवाडी भागातील नागरिकांनी मतदान केले नाही म्हणून या भागातील पाणी पुरवठा बंद करण्यात येतो, असा आरोप त्यांनी योगेश टिळेकर यांचे नाव न घेता केला. ते म्हणाले की, हे योग्य नसून तुम्हाला जनतेने बहुमत दिले असल्याने चांगले काम केले गेले पाहिजे, अशा शब्दांत त्यांनी भाजप आमदारावर निशाणा साधला. शिवाजीराव आढळराव पाटील यांच्या अध्यक्षतेखाली आज पुणे महापालिका आयुक्त कुणाल कुमार आणि आधिकारी वर्गासमावेत बैठक पार पडली. यावेळी शिवसेना गटनेते संजय भोसले, नगरसेवक नाना भानगिरे, प्राची आल्हाट आदी नगरसेवक उपस्थित होते.
पिंपरीतील सांडास प्रकल्पाला मंजूरी
पिंपरीतील नियोजित कचराप्रकल्पावर शिवसेना खासदारांनी नाराजी व्यक्त केली असली तरी मुख्यमंत्री कार्यालयाकडून या प्रकल्पाला मंजूरी मिळाली आहे. गेल्या काही वर्षांपासून उरुळी देवाची कचरा डेपोला पर्यायी जागा उपलब्ध करुन देण्यासाठी जिल्हाधिकारी प्रशासनाची कसोटी लागली होती. यासंदर्भात पिंपरी सांडस येथे कचऱ्यावर प्रक्रिया करुन सेंद्रिय कचरा शेतकऱ्यांना शेतीसाठी दिला जाण्याचा प्रस्ताव ठेवण्यात आला होता. प्रशासनाने पिंपरी सांडस येथील जागेचा प्रस्ताव मुख्यमंत्री फडणवीस यांच्याकडे पाठवला होता. या प्रस्तावाला मुख्यमंत्र्यांनी मंजूरी दिली आहे. मुख्यमंत्री कार्यालयाच्या अधिकृत ट्विटर अकाऊंटवरुन याबाबत माहिती देण्यात आली आहे. १९.१९ हेक्टर जमीनीवर हा प्रकल्प उभारण्यासाठी मंजूरी देण्यात आल्याचा उल्लेख ट्विटमध्ये करण्यात आला आहे.
CM approves handing over of 19.90hectare forest land at Mauja Pimpri Saandas to Pune Municipal Corp for scientific treatment on solid waste.
— CMO Maharashtra (@CMOMaharashtra) May 31, 2017