पुणे : शनिवारवाड्यामध्ये नमाज पठणे केल्याच्या चित्रीकरणानंतर झालेल्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर समाज माध्यमातून प्रसारित झालेल्या धमकीच्या चित्रीकरणामुळे दरवर्षी पाडव्याच्या दिवशी (बुधवार २२ ऑक्टोबर) सारसबाग येथे होणारा ‘गोवर्धन पहाट दिवाळी’ कार्यक्रम रद्द करण्यात आला आहे. गेल्या २८ वर्षांपासून पुणेकरांसाठी विनामूल्य सादर होणारा दिवाळी पहाट कार्यक्रम नाईलाजास्तव रद्द करावा लागत असल्याचे या कार्यक्रमाचे संयोजक युवराज शहा आणि जितेंद्र भुरूक यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे कळविले आहे.

याविषयी युवराज शहा म्हणाले, ‘सारसबागेतील दिवाळी पहाट कार्यक्रमाला आक्षेप घेणारे एक चित्रीकरण समाज माध्यमातून प्रसारित होत आहे. वास्तविक गेल्या २७ वर्षांत कुठलीही अप्रिय घटना घडलेली नाही. उलट तिकीट विक्री करून हे कार्यक्रम धंदेवाईक पद्धतीने चालू असताना जनसामान्यांची विनामूल्य पहाट दिवाळी म्हणून सारसबागेतील कार्यक्रमाला उपस्थित राहून हजारो हजारो पुणेकर मनमुराद आनंद घेत आले आहेत.

पुण्यातील सर्वात लोकप्रिय आणिभव्य पहाट दिवाळी म्हणून ती प्रस्थापित झाली आहे यासंदर्भात परवानगीचे सर्व सनदशीर सोपस्कार पूर्ण केले असून आणि कार्यक्रमची पूर्ण जय्यत तयारी केली असताना या पहाट दिवाळी  कार्यक्रमाशी काडीचाही संबंध नसतानाही तेथे यापूर्वी घडलेल्या घटनांचे निमीत्त करून आक्षेप  घेतले जात आहेत. तेथे जर कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला तर पोलिसांनी जबाबदार धरले जाईल असा जाहीर इशाराही दिला जात आहे. वास्तविक घरची दिवाळी सोडून अहोरात्र मेहनत करत असताना पोलिसांना वेठीस धरणे आम्हाला मान्य नाही. तसेच आमची पहाट दिवाळी विनामूल्य असून सर्व साधनशूचिता आणि मर्यादा पाळूनच कार्यक्रमांची आखणी  केली जात असते.’

ताणतणावांनी ग्रासलेल्या जनसामान्यांच्या जीवनात दिपावलीनिमित्त काही आनंदाचे क्षण  शिंपडण्याचा उपक्रम आम्ही सलग २८ वर्षे करत आलो आहोत. परंतु, या वर्षी तिथे समाजकंटकामार्फत काही अप्रिय घटना घडवून शांतताभंग होऊ नये आणि आजवरच्या आनंदी सांगीतिक परंपरेला गालबोट लागू नये म्हणून आम्ही माघार घेत आहोत. काही उपद्रवी प्रवृतींमुळे हजारो रसिकांना ही पर्वणी सोडावी लागते याची आम्हाला खंत आहे. पण, काही अनुचित प्रकार घडल्यास त्याचे खापर विनाकारण सयोजंकांवर फोडले जावू नये म्हणून आम्ही स्वत:हून हा कार्यक्रम रद्द करीत आहोत. आपला रसभंग होऊ नये म्हणून रसिकांनी त्याची नोंद घ्यावी. – युवराज शहा, संयोजक, गोवर्धन दिवाळी पहाट