पुणे : ‘शहरातील जुने वाडे आणि इमारती पाडताना पर्यावरणाची हानी टाळण्याबरोबरच सुरक्षिततेसाठी काय काळजी घ्यावी, याची नियमावली महापालिकेने तयार केली आहे. इमारत पाडताना धूळ उडून पर्यावरणाला धोका निर्माण होऊ नये, यासाठी बांधकामाच्या ठिकाणी पाणी मारणे, स्प्रिंकलर यंत्रणा कार्यान्वित करण्याबरोबरच पोलीस स्थानक, अग्नीशमन दलासह आजूबाजूच्या सोसायट्यांना लेखी स्वरुपात माहिती देणे आवश्यक आहे,’ असे नियमावलीत स्पष्ट करण्यात आले आहे. महापालिका आयुक्त नवल किशोर राम यांनी या नियमावलीला मान्यता दिली असून, त्याची अंमलबजावणी आता सुरू केली जाणार आहे.

पुणे शहराच्या मध्यवर्ती पेठांच्या भागात अनेक जुने वाडे आहेत. तसेच, उपनगरांमध्ये असलेल्या इमारती जुन्या झाल्याने त्या पाडून तेथे टोलेजंग इमारती उभ्या राहत आहेत. हे वाडे आणि इमारती पाडण्यासाठी स्वतंत्र नियमावली महापालिकेने तयार केली नव्हती. या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे राज्य सरचिटणीस हेमंत संभूस यांनी महापालिका आयुक्त नवल किशोर राम यांनी काही महिन्यांपूर्वी भेट घेतली होती. नियमावली करण्याची मागणी केली होती.

शहरात जुन्या इमारती पाडताना धूळ, आवाज आणि वाहनांच्या वाहतुकीमुळे नागरिकांना त्रास होतो. हे काम अनेकदा रात्री केले जाते. तसेच, सुरक्षिततेसाठी आवश्यक उपाययोजना केल्या जात नाही. पाडकामासाठी प्रशिक्षित मनुष्यबळ वापरले जात नाही. नियमावली नसल्याचे कारण देऊन महापालिका तसेच पोलीस प्रशासनही नागरिकांच्या तक्रारींवर कारवाई करीत नसल्याचे चित्र होते. याला आळा घालण्यासाठी स्वतंत्र नियमावली करण्याची सूचना आयुक्तांनी बांधकाम विभागाला केली होती. बांधकाम विभागाने आता ही नियमावली तयार केली आहे. त्याला महापालिका आयुक्तांनी मंजुरीदेखील दिली आहे.

काय आहे नियमावलीत?

– जे बांधकाम पाडले जाणार आहे, तेथे संबधित विकासकाने पूर्ण वेळ सुरक्षारक्षक नेमावा.

– बांधकाम पाडताना पर्यावरणाला हानी पोहोचणार नाही, याची आवश्यक काळजी घेतल्यानंतरच काम सुरू करावे.

– बांधकाम पाडताना धूळ उडून प्रदूषण होऊ नये, यासाठी बांधकामावर पाणी मारावे किंवा तेथे स्प्रिंकलर यंत्रणा सुरू करावी.

– ज्या इमारती पाडायच्या आहेत, त्याच्या आजूबाजूच्या इमारतींना धोका निर्माण होणार असेल, तर तेथील नागरिकांना इतर ठिकाणी हलवावे.

– इमारत पाडण्याचे काम करताना तेथे २५ फूट उंचीचे पत्रे लावावेत.

– शेजारच्या सोसायट्यांना लेखी माहिती द्यावी. पोलिसांसह अग्नीशमन दलालाही कळवावे.

– इमारत पाडल्यानंतर तयार झालेला राडारोडा सुरक्षितस्थळी वाहून नेताना काळजी घ्यावी. राडारोडा वाहून नेताना त्यावर हिरव्या रंगाचे कापड टाकणे बंधनकारक आहे.

– पाडकामाचे फोटो महापालिकेकडे सादर करावेत.

– तांत्रिकदृष्ट्या योग्य व सुरक्षेच्या दृष्टीने पाडकाम पूर्ण झाल्याचा दाखला स्ट्रक्चरल इंजिनिअरने सादर करावा.

मनसेचे राज्य सरचिटणीस हेमंत संभूस म्हणाले, जुन्या इमारती पाडताना आवश्यक ती सुरक्षिततेची काळजी घेतली जात नव्हती. राजकीय मंडळी, स्थानिक गुंड हस्तक्षेप करून हे काम करत होते. ठराविक लोक हे काम करत असल्याने यामध्ये ‘माफियाराज’ तयार झाले होते. महापालिकेच्या नियमावलीमुळे त्याला आळा बसेल. नियमावलीची अंमलबजावणी होते की नाही, यावर आयुक्तांनी लक्ष ठेवावे.