पुणे : समाविष्ट ३४ गावांतील मिळतकर शास्तीकराचा (दंड) प्रश्न पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या धर्तीवर सोडविला जाईल. तोपर्यंत शास्तीकराची आकारणी करण्यात येऊ नये, अशी सूचना महापालिकेला करण्यात आली आहे. यासंदर्भातील शासन निर्णय लवकरच घेतला जाईल, असे राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितले. तर, वारजे येथील पोलीस ठाण्याचा प्रश्न सोडविण्यासाठीची आरक्षित जागा तातडीने देण्याची सूचना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महापालिका आयुक्त विक्रम कुमार यांना केली.

वारजे येथील ३७५ खाटांच्या मल्टिस्पेशालिटी रुग्णालयाचे भूमीपूजन उपमुख्यमंत्री अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते झाले. त्यावेळी त्यांनी ही ग्वाही दिली. खासदार सुप्रिया सुळे, राज्याचे उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील, आमदार भीमराव तापकीर, आयुक्त, प्रशासक विक्रम कुमार यांच्यासह भाजप-राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी नगरसेवक उपस्थित होते.

हेही वाचा – अजित पवार यांचा सूचक इशारा; म्हणाले, “दोन्ही दादांनी नगरसेवक निवडून आणले, हे विसरू नका…”

आमदार भीमराव तापकीर यांनी समाविष्ट गावातील मिळकतकर आणि पोलीस ठाण्याच्या जागेच्या प्रश्नासंदर्भात पवार आणि फडणवीस यांचे लक्ष वेधले. त्यावेळी त्यांनी ही ग्वाही दिली.

अजित पवार म्हणाले की, शहरातील आरोग्याच्या गंभीर प्रश्नासंदर्भात वैद्यकीय सुसज्जता हवी, हे करोना संकट काळात अधोरेखित झाले. त्यातूनच वारज्यात सुसज्ज रुग्णालय उभारणीचा निर्णय पुढे आला. या रुग्णालयातील ३७५ खाटांपैकी १० टक्के खाटा गरजूंना विनामूल्य दिल्या जाणार आहेत. तर सहा टक्के खाटां शासकीय दराने उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत. बाणेर येथेही ७५० खाटांचे अत्याधुनिक रुग्णालय उभारणीचे कामही सुरू आहे.

समाविष्ट ३४ गावांतील मिळकतकरासंर्भात काही दिवसांपूर्वी बैठक झाली. पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या धर्तीवर समाविष्ट गावासंदर्भात निर्णय घेतला जाईल. त्यामुळे लोकांना त्रास देऊ नका, मिळकतकराची थकबाकी वसूल करू नका, अशी सूचना महापालिका आयुक्तांना करण्यात आली आहे. त्यामुळे निवडणुकीच्या काळात कोणी काही सांगितले, तर त्याच्यावर विश्वास ठेवू नका. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, मंत्री चंद्रकांत पाटील यांच्यासमवेत याबाबत लवकरच बैठक घेण्यात येईल. लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता लागली तर ती संपल्यानंतर त्याबाबतचा शासकीय निर्णय तातडीने घेतला जाईल, असे पवार यांनी स्पष्ट केले.

हेही वाचा – पुणे : शहरात कारवाईची अफवा पसरवणाऱ्या १२०० जणांवर गुन्हा

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

या रुग्णालयाच्या माध्यमातून सुसज्ज वैद्यकीय सेवा उपलब्ध होणार आहे. त्यासाठी जर्मनी आणि नेदरलॅण्ड या राष्ट्रांनी मदत केली आहे. देशातील असा हा पहिला प्रयोग पुण्यात होत आहे. पुणे, पिंपरी-चिंचवड महापालिका, ग्रामीण भाग पुण्याचे ग्रोथ इंजिन आहे. त्यामुळे शहराच्या प्रश्नांकडे गांभीर्याने लक्ष दिले जात आहे. त्यातूनच अनेक प्रश्न मार्गी लावण्यात येत आहेत. वारजेतील पोलीस ठाण्याच्या जागेसंदर्भातील प्रश्नही तातडीने सोडविण्यात येईल. ही जागा पोलीस ठाण्यासाठी आरक्षित आहे. त्यामुळे त्यावर महापालिकेने तातडीने कार्यवाही कराव, अशी सूचना फडणवीस यांनी केली.