पुणे: राज्य मंडळाने दहावीचा निकाल जाहीर केल्यानंतर आता घरोघरी पुढील शैक्षणिक अभ्यासक्रम, प्रवेश प्रक्रियेचे वेध लागले आहेत. दहावीनंतर अकरावी, पदविका, आयटीआय असे पर्याय विद्यार्थ्यांना उपलब्ध होतात. दहावीचा निकाल जाहीर झाल्यानंतर प्रवेश प्रक्रिया सुरू होणार असल्याने विद्यार्थी, पालकांना प्रवेश प्रक्रियेची उत्सुकता निर्माण झाली आहे.
अकरावी
माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण संचालनालयाने अकरावी प्रवेश प्रक्रियेचे वेळापत्रक जाहीर केले आहे. त्यानुसार शाळा, कनिष्ठ महाविद्यालयांना नोंदणीसाठी १५ मेपर्यंतची मुदत देण्यात आली आहे. तर, विद्यार्थ्यांच्या नोंदणीची प्रक्रिया १९ मेपासून सुरू करण्यात येणार आहे. विद्यार्थी नोंदणी पूर्ण झाल्यावर संस्थांतर्गत, व्यवस्थापन, अल्पसंख्याक या राखीव कोट्यातील प्रवेश प्रक्रिया राबवण्यात येईल. त्यानंतर प्रवेशाच्या चार फेऱ्या राबवल्या जाणार आहेत. कनिष्ठ महाविद्यालये ११ ऑगस्टला सुरू होतील. यंदा अकरावीची प्रवेश प्रक्रिया १५ ऑगस्टपूर्वी पूर्ण करण्याचा माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण संचालनालयाचा प्रयत्न आहे. शैक्षणिक वर्ष २०२४-२५ मध्ये राबवण्यात आलेल्या अकरावीच्या प्रवेश प्रक्रियेत पुणे आणि पिंपरी-चिंचवड परिसरातील ३४३ कनिष्ठ महाविद्यालयांमध्ये १ लाख २० हजार ६४५ जागा उपलब्ध होत्या. प्रवेश प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर त्यापैकी सुमारे ३० टक्के जागा रिक्त राहिल्याचे दिसून आले होते. आता शैक्षणिक वर्ष २०२५-२६ च्या प्रवेश प्रक्रियेत जागांमध्ये वाढ होण्याची शक्यता आहे. या प्रवेश प्रक्रियेत चार नियमित फेऱ्या घेतल्या जाणार आहेत.
पदविका
गेल्या काही वर्षांत विद्यार्थ्यांची पदविका अभ्यासक्रमालाही पसंती वाढत आहे. पदविका अभ्यासक्रमात स्थापत्य, इलेक्ट्रिक, मेकॅनिकल, संगणक, इलेक्ट्रॉनिक अँड कम्युनिकेशन या शाखांअंतर्गत विविध पर्याय उपलब्ध झाले आहेत. काही विद्यार्थी पदविका अभ्यासक्रम पूर्ण करून स्वतःचा व्यवसाय सुरू करतात, उद्योग क्षेत्रात नोकरी करतात किंवा पुढे पदवी अभ्यासक्रमालाही प्रवेश घेतात. तंत्रशिक्षण संचालनालयाचे सहसंचालक डॉ. दत्तात्रय जाधव यांनी दिलेल्या माहितीनुसार, पदविका अभ्यासक्रमासाठी शैक्षणिक वर्ष २०२४-२५मध्ये पुणे विभागात १२० शिक्षण संस्थांमध्ये ३६ हजार ९९३ जागा प्रवेशासाठी उपलब्ध होत्या. आता शैक्षणिक वर्ष २०२५-२६ मध्ये या जागांमध्ये काही प्रमाणात वाढ होण्याची शक्यता आहे. पदविका अभ्यासक्रमाच्या प्रवेश प्रक्रियेचे वेळापत्रक स्वतंत्रपणे जाहीर करण्यात येणार आहे.
आयटीआय
व्यावसायिक कौशल्य, रोजगारक्षमता अशा वैशिष्ट्यांमुळे अनेक विद्यार्थ्यांचा आयटीआय अभ्यासक्रमांकडे ओढा असतो. आयटीआयमध्ये अभियांत्रिकी, बिगर अभियांत्रिकी प्रकारचे विविध अभ्यासक्रम राबवण्यात येतात. त्यातून विद्यार्थ्यांसाठी रोजगारसंधीही निर्माण होतात. व्यवसाय शिक्षण आणि प्रशिक्षण संचालनालयाच्या पुणे प्रादेशिक कार्यालयाचे सहायक संचालक किशोर उबाळे यांनी दिलेल्या माहितीनुसार, शैक्षणिक वर्ष २०२४-२५ मध्ये पुणे विभागात १९४ आयटीआयच्या विविध शाखांमध्ये २९ हजार ४५२ जागा उपलब्ध होत्या. त्यात ६१ शासकीय आयटीआयमध्ये १७ हजार ७२, तर १३३ खासगी आयटीआयमध्ये १२ हजार ३८० जागांचा समावेश होता. आता शैक्षणिक वर्ष २०२५-२६ च्या प्रवेश प्रक्रियेसाठी जागांमध्ये वाढ होणार आहे. तसेच, विद्यार्थ्यांना १५ मे पासून अर्ज भरता येणार आहे.
विद्यार्थी, पालकांनी दहावीनंतरच्या अभ्यासक्रमांची निवड विचारपूर्वक केली पाहिजे. आयटीआयचे अभ्यासक्रम कौशल्याधारित असतात. त्यामुळे पारंपरिक शिक्षणात रस नसलेल्या विद्यार्थ्यांनी या अभ्यासक्रमांकडे वळावे. कृत्रिम बुद्धिमत्तेच्या उदयानंतर कौशल्य शिक्षणाचे महत्त्व वाढत आहे. त्या दृष्टीने आयटीआयचे अभ्यासक्रम अतिशय उपयुक्त आहेत. स्वतःचा व्यवसाय करू इच्छिणाऱ्या, स्वतःच्या पायावर लवकर उभे राहू इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांनी पदविका अभ्यासक्रमांचा विचार करावा. मात्र, पदवी अभ्यासक्रमाला जायचे असल्यास पुढील प्रवेश प्रक्रिया, उपलब्ध जागांचा विचार पदविका अभ्यासक्रमाला प्रवेश घेतानाच करणे गरजेचे आहे. अकरावीला प्रवेश घेताना विज्ञान शाखेमुळेच अनेक संधी उपलब्ध होतात हा विचार विद्यार्थी, पालकांनी करू नये. बारावीनंतर विधी, हॉटेल मॅनेजमेंट, डिझाइन, व्यवस्थापन, फाईन आर्ट्स असे अनेक पर्याय कला, वाणिज्य शाखांच्या विद्यार्थ्यांनाही मिळतात. त्यामुळे विद्यार्थ्यांनी आपली आवड आणि नावड लक्षात घेऊन अकरावीला शाखा निवड करावी. – विवेक वेलणकर, ज्येष्ठ करिअर समुपदेशक
प्रवेशासाठी आवश्यक कागदपत्रे
– दहावी /समकक्ष परीक्षेचे गुणपत्रक
– इयत्ता दहावी शाळा सोडल्याचा दाखला मूळ प्रत
– विद्यार्थ्यांचा जातीचा दाखला
– नॉन क्रिमीलेअर प्रमाणपत्र
– ईडब्ल्यूएस पात्रता प्रमाणपत्र
– दिव्यांग प्रमाणपत्र
– जातवैधता प्रमाणपत्र
– उत्पन्नाचा दाखला
– आधार कार्ड