पुणे : महापालिकेच्या आगामी निवडणुकीसाठी राज्य निवडणूक आयोगाने तयार केलेली यादी मतदानासाठी वापरली जाणार आहे. ही मतदारयादी आयोगाने महापालिकेला दिली असून, त्यामधून १ जुलै २०२५ नंतर नोंदणी झालेली नावे वगळण्यात आली आहे. नावे वगळून आयोगाने मतदारयादी दिल्याने प्रभागनिहाय मतदारयादी तयार करण्याचे महापालिकेचे काम सोपे झाले आहे.

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी जिल्हा प्रशासनाकडून मतदारयादी न घेता निवडणूक आयोगाने दिलेली मतदारयादी वापरण्याचे आदेश निवडणूक आयोगाने दिले आहेत. महापालिकेच्या आगामी निवडणुकीसाठी १ जुलै २०२५ ची मतदारयादी अंतिम मानली जाणार आहे. त्यामुळे १ जुलैनंतर मतदार नाव नोंदणी केलेल्या व्यक्तींना महापालिकेच्या निवडणुकीत मतदानाचा हक्क बजाविता येणार नाही, हे स्पष्ट झाले आहे.

महापालिका निवडणुकीसाठी निवडणूक आयोगाने महापालिकेला मतदारांची यादी पाठविली आहे. ही यादी पाठविताना आयोगाने १ जुलैनंतरची नावे वगळून ही यादी महापालिकेला दिली आहे, असे महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त ओमप्रकाश दिवटे यांनी सांगितले.

आयोगाने पाठविलेल्या यादीनुसार प्रभागनिहाय यादी तयार करण्याचे काम सुरू करण्यात आले आहे. तसेच, निवडणुकीच्या कामासाठी कर्मचारी, अधिकाऱ्यांना प्रशिक्षण देण्यास सुरुवात करण्यात आली आहे. यासाठीचे नियोजन तयार करण्यात आले असून, त्यानुसार टप्प्याटप्प्याने प्रशिक्षण दिले जात असल्याचे दिवटे यांनी सांगितले.

यापूर्वीच्या निवडणुकीत महापालिका जिल्हाधिकारी कार्यालयाकडून मतदारांची यादी घेऊन ती प्रभाग निहाय, मतदान केंद्र निहाय या यादीची फोड केली जात होती. मात्र, यावेळी निवडणूक आयोगाने स्थानिक पातळीवरून मतदारयादी घेऊ नये, आयोगाकडून देण्यात आलेली मतदार यादी ग्राह्य धरावी असे आदेश दिलेले आहेत. त्यानुसार निवडणूक आयोगाने महापालिकेला मतदार यादी पाठवलेली आहे.

अशी होणार निवडणूक

आगामी महापालिका निवडणुकीसाठी ३२ गावांसह प्रभाग रचना तयार करण्यात आली आहे. यामध्ये ४१ प्रभागांमधून १६५ नगरसेवक निवडून दिले जाणार आहेत. यामध्ये प्रभाग क्रमांक ३८ बालाजीनगर-कात्रज-आंबेगाव हा पाच सदस्यांचा प्रभाग सर्वात मोठा असून, येथील लोकसंख्या १ लाख २३ हजार इतकी आहे. नागरिकांच्या सोईसाठी प्रशासनाने मतदान केंद्रांची संख्या देखील वाढविण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे ही संख्या सुमारे ५ हजार इतकी असणार आहे. मतदान केंद्रासाठी योग्य जागा निवडणे, तेथे अत्यावश्यक सुविधा पुरविणे यासाठी प्रशासनाकडून जागा पाहणी तसेच इतर कामे सुरू करण्यात आली आहे.