पुणे : पुण्यात भाजपचे केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ, राज्याचे उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील हे प्रमुख नेते असतानाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे पुणे दौरे वाढत चालले आहेत. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जवळ येऊ लागल्या असताना मुख्यमंत्री फडणवीस हे पुण्यात सातत्याने येत असून, पदाधिकाऱ्यांशी संवाद साधत आहेत.
मुंबईनंतर पुणे आणि पिंपरी महापालिका पुन्हा काबीज करण्यासाठी स्थानिक नेत्यांकडून करण्यात येणाऱ्या तयारीच्या आढावा घेण्याबरोबरच उपमुख्यमंत्री अजित पवार यांची हुकूमत असलेल्या पुणे जिल्हा परिषदेवर कब्जा मिळविण्यासाठी महायुतीतील मित्रपक्षांबरोबरच महाविकास आघाडीतील किती स्थानिक नेते गळाला लागतील, याचा अंदाज मुख्यमंत्री फडणवीस हे घेत असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे.
मुख्यमंत्री फडणवीस यांनी मुंबईनंतर पुण्याकडे विशेष लक्ष दिले आहे. त्यामुळे दर महिन्याला त्यांच्या पुणे भेटी ठरलेल्या आहेत. या वर्षाच्या सुरुवातीपासून फडणवीस यांचे पुणे दौरे हे वाढत चालले आहेत. पक्षाचा किंवा एखाद्या संस्थेचा कार्यक्रम, सरकारी कार्यक्रम आणि विकासकामांचा आढावा घेण्याच्या निमित्ताने ते पुण्यात येत आहेत. पुण्यात आल्यानंतर रात्रीच्या मुक्कामात ते प्रमुख पदाधिकाऱ्यांशी चर्चा करून पक्षाच्या सद्य:स्थितीबरोबरच आगामी निवडणुकांसाठी पक्षवाढीसाठी करायच्या व्यूहरचनेचा आढावा घेत असल्याचे भाजपच्या गोटातून सांगण्यात आले.
पुणे आणि पिंपरी-चिंचवड महापालिका या भाजपच्या ताब्यात आहेत. त्यावर पुन्हा सत्ता मिळविण्याबरोबरच उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे प्राबल्य असलेली पुणे जिल्हा परिषद आगामी काळात ताब्यात घेण्यासाठी कोणते स्थानिक नेते गळाला लावता येतील, याचाही अंदाज मुख्यमंत्री फडणीवीस हे स्थानिक नेत्यांकडून घेत असतात. त्यासाठी कार्यक्रमांच्या निमित्ताने ते पुण्यात येत असून, प्रत्यक्ष आढावा घेत असल्याने त्यांचे पुणे दौरे हे वाढत चालले असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे.
प्रत्येक भेटीत स्थानिक नेत्यांबरोबर बैठक
मुख्यंमत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावर्षी जानेवारी महिन्यात झालेल्या विश्व मराठी संमेलनाच्या उद्घाटनाच्या निमित्ताने पुण्यात उपस्थिती लावली. त्यानंतर फेब्रुवारी महिन्यात पुणे पोलिसांचा ‘तरंग २०२५’ हा कार्यक्रम झाला. त्यासाठी मुख्यमंत्री फडणवीस हे हजर होते. एप्रिल महिन्यात महसूल विभागाची कार्यशाळा घेण्यात आली. त्यानिमित्ताने दोन दिवस पुण्यात तळ ठोकून महसूल विभागाच्या आढाव्याबरोबर पक्षाच्या तयारीचाही अंदाज घेतला. त्या महिन्यात केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचा पुण्यात कार्यक्रम होता. त्या कार्यक्रमाच्या तयारीसाठी स्वत: त्यांनी लक्ष घातले. या प्रमुख कार्यक्रमांबरोबरच प्रत्येक पुणे भेटीत ते कार्यक्रम झाल्यावर रात्री मुक्कामात पुण्यातील स्थानिक नेत्यांबरोबरच बैठक घेऊन सातत्याने आढावा घेत असल्याचे भाजपच्या नेत्यांकडून सांगण्यात आले.
सरासरी आठवड्यातून एकदा पुण्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जवळ आल्याने मुख्यमंत्री फडणवीस यांचे पुणे दौरे हे आणखी वाढले आहेत. गेल्या महिन्यात तर आठवड्यातून सरासरी एकदा पुण्यात तळ ठोकून असल्याचे दिसून येते. एक ऑगस्ट रोजी साहित्यरत्न, लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांच्या साहित्यखंडांचे प्रकाशन, तसेच लोकमान्य टिळक स्मारक ट्रस्टच्या वतीने देण्यात येणाऱ्या‘लोकमान्य टिळक पुरस्कार’ कार्यक्रमाला ते उपस्थित होते. तसेच पुणे महानगर प्रदेश ग्रोथहबचे उद्घाटन त्यांच्या हस्ते झाले. पुणे शहर पोलीस आयुक्तालयाअंतर्गत विविध प्रकल्पांचे उद्घाटनही त्यांनी केले. त्यानंतर महाराष्ट्र ज्ञान महामंडळाच्या(एमकेसीएल) रौप्य महोत्सवी दिनानिमित्त कार्यक्रमाला त्यांनी उपस्थिती लावली. गणेश खिंड रस्त्यावरील दुमजली उड्डाणपूल आणि सिंहगड रस्त्यावरील उड्डाणपुलाच्या उद्घाटनाच्या निमित्ताने धावती भेट देत त्यांनी पुण्याच्या स्थितीचा आढावा घेतला.
या महिन्यात गेल्या आठवड्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियानाअंतर्गत आयोजित सेवा पंधरवडा राज्यस्तरीय शुभारंभ त्यांच्या उपस्थित झाला. तसेच ‘नाम फाऊंडेशन’च्या कार्यक्रमाला हजर राहून त्यांनी पुणेकरांशी संवाद साधला.