पुणे : लांबलेला मोसमी पाऊस, सिंचनासाठीच्या पाण्याचा तुटवडा आणि वाढलेल्या तापमानामुळे राज्यातील फळभाज्या आणि पालेभाज्यांच्या लागवडीत मोठी घट झाली आहे. खरिपातील सरासरी लागवडीच्या वीस टक्केही लागवड झालेली नाही. त्यामुळे जुलै, ऑगस्ट महिन्यांत भाज्यांचा तुटवडा निर्माण होऊन दर कडाडण्याची शक्यता आहे.

कृषी विज्ञान केंद्र, बारामती येथील भाजीपाला गुणवत्ता केंद्राचे प्रमुख डॉ. यशवंत जगदाळे म्हणाले, की राज्यात वर्षभरात सुमारे ११ लाख ५२ हजार हेक्टरवर भाजीपाल्याची लागवड होते. त्यांपैकी खरिपात म्हणजे जून महिन्यात ५० टक्के, रब्बी हंगामात ३० टक्के आणि उन्हाळी हंगामात २० टक्के क्षेत्र असते. पण, यंदा मोसमी पाऊस लांबला आहे. सिंचनाची सोय असलेल्या ठिकाणीही पाण्याचा तुटवडा जाणवत असल्यामुळे शेतकऱ्यांनी लागवड करणे टाळले आहे. केवळ नद्यांच्या काठावर काही प्रमाणात भाजीपाल्यांच्या लागवडी होत आहेत. झालेल्या लागवडीही उन्हामुळे अडचणीत आल्या आहेत. वाढत्या उन्हामुळे लहान रोपे पिवळी पडून जळून जात आहेत. मोसमी पाऊस सुरू होऊन, तापमानात घट झाल्याशिवाय लागवड करणे योग्य ठरणार नाही.

रोपवाटिकांमध्ये रोपे पडून

फळभाज्या आणि पालेभाज्यांच्या लागवडीसाठी शेतकरी रोपवाटिकांमधील दर्जेदार रोपांची लागवड करतात. यंदा पश्चिम महाराष्ट्रातील बहुतेक रोपवाटिकांमध्ये रोपे पडून आहेत. आगाऊ नोंदणी केलेले शेतकरीही रोपे घेणे टाळत आहेत. पुणे जिल्ह्यातील नारायणगाव परिसर टोमॅटो, भेंडी, बटाटासह अन्य भाजीपाल्यांसाठी प्रसिद्ध आहे. सांगली, कोल्हापूर जिल्ह्यांतील नदीकाठांवर मोठ्या प्रमाणावर भाजीपाला लागवड होते. या परिसरातही हीच स्थिती आहे.

तज्ज्ञांनीही दिला भाज्या टंचाईचा इशारा

मोसमी पाऊस लांबल्यामुळे भाजीपाला लागवडीवर परिणाम झाला आहे. रोपवाटिकांमध्ये रोपे पडून आहेत. शेतकऱ्यांनी केलेल्या लागवडी उन्हाच्या चटक्यामुळे जळून गेल्या आहेत. राज्यातील सध्याचे हवामान भाजीपाला लागवडीस पोषक नाही, त्याचा परिणाम पुढील दोन महिन्यांतील भाजीपाल्यांच्या उपलब्धतेवर होऊ शकतो, अशी माहिती कृषी विज्ञान केंद्र, बारामती येथील भाजीपाला गुणवत्ता केंद्राचे प्रमुख डॉ. यशवंत जगदाळे यांनी दिली आहे.