पुणे : पोलीस असल्याच्या बतावणीने चोरट्यांनी ज्येष्ठ महिलेकडील सहा लाख २४ हजार रुपयांचे सोन्याचे दागिने लांबविल्याची घटना वारजे भागात घडली. याबाबत एका ज्येष्ठ महिलेने वारजे पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार महिला वारजे भागात राहायला आहेत. त्या मंगळवारी (१० जून) सायंकाळी साडेपाचच्या सुमारास वारजे भागातून निघाल्या होत्या. वटपौर्णिमा असल्याने त्यांनी दागिने परिधान केले होते. अविस्मरा हाॅलजवळ दोन चोरट्यांनी त्यांना अडवले आणि पोलीस असल्याची बतावणी केली. ‘या भागात एका व्यक्तीचा खून झाला आहे. तुम्ही अंगावरील दागिने काढून ठेवा’, अशी बतावणी चोरट्यांनी त्यांच्याकडे केली. चोरट्यांनी महिलेकडील सहा लाख २४ हजारांचे दागिने काढून घेतले. महिलेच्या पिशवीत दागिने ठेवण्याचा बहाणा केला. महिलेला बोलण्यात गुंतविले. लक्ष नसल्याची संधी साधून चोरटे दागिने लांबवून पसार झाले.
या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी भेट दिली. पोलिसांकडून पसार झालेल्या चोरट्यांचा शोध घेण्यात येत असून, पोलीस उपनिरीक्षक आनंदा चव्हाण तपास करत आहेत.