चारित्र्यावर सतत संशय घेणाऱ्या पतीचा काटा काढण्यासाठी पत्नीनेच मित्राला सुपारी देऊन पतीचा खून केल्याची धक्कादायक घटना पुण्यामध्ये उघडकीस आली आहे. पतीकडून सतत होणारा मानसिक त्रास आणि मारहाणीला कंटाळून  पत्नीने हे टोकाचे पाऊल उचलल्याची माहिती पोलिसांच्या प्रथमिक तपासामध्ये समोर आली आहे. सुपारीची रक्कम म्हणून १ लाख ३० हजार रुपयांची सुपारी दिली होती. दरम्यान, पोलिसांनी अवघ्या बारा तासामध्ये आरोपी पत्नीसह चार जणांना अटक करण्यात निगडी पोलिसांना यश आले आहे.

येशूदास मुरुगन (४५) असे खून झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. या प्रकरणात येशूदासची पत्नी उर्सुला (३९) हिच्याबरोबरच तिचा मित्र भाऊराव आरे (२४) याच्याबरोबरच त्याचे साथिदार रज्जाक शेख (१९) आणि लखन कापरे (२१) यांना पोलिसांनी अटक केली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दोन दिवसांपूर्वी निगडी पोलिस स्थानकाच्या हद्दीमध्ये येशूदास यांच्यावर धारधार शस्त्रांनी हल्ला करुन हत्या करण्यात आली होती. येशूदास यांच्या गळ्यावर, मानेवर आणि अंगावर धारदार शस्त्रांनी वार करून खून करण्यात आला. उर्सुलानेच या प्रकरणी  निगडी पोलिस स्थानकामध्ये तक्रार दाखल केली होती.

या प्रकरणाचा पोलिसांनी तपास सुरु केला असता उर्सुला ही एका शाळेच्या बसमध्ये काळजी वाहक म्हणून काम करत असून तिचे आणि बस चालक असणाऱ्या भाऊरावचे मैत्रीचे संबंध असल्याची माहिती पोलिसांनी मिळाली. त्यानुसार पोलिसांनी या बसचालकाला ताब्यात घेऊन त्याची कसून चौकशी करण्यात आली. चौकशीदरम्यान सुरुवातील उडवाउडवीची उत्तरे देणाऱ्या भाऊरावने पोलिसी खाक्या दाखवताच त्यांनी गुन्हा कबूल केला. खून झालेल्या येशूदासच्या पत्नीनेच खुनाची सुपारी दिल्याची माहिती भाऊराव या आरोपीने दिली. भाऊरावने हा खून करण्यासाठी दोन मित्रांने आपल्याला मदत केल्याचेही पोलिसांना सांगितले.

दरम्यान, येशूदास हा पत्नीवर सारखा संशय घ्यायचा. तो ही काही वर्षांपूर्वी बस चालक होता. पत्नी उर्सुला ज्या ठिकाणी काम करायची तिथे जाऊन येशूदास सर्व कर्मचाऱ्यांसमोर पत्नीवर संशय घेत तिला अश्लील भाषेत शिवीगाळ करायचा. तसेच घरी आल्यानंतरही येशूदास पत्नीला मारहाण करून त्रास देत असे. दोघांना ९ वर्षाचा मुलगा आणि १४  वर्षाची मुलगी आहे. येसूदास हा देहूरोडला एकटाच राहात होता. येशूदास उर्सुलाच्या आई वडीलांना तसेच स्वतःच्या मुलांना जीवे मारण्याची धमकी देत असे. अखेर सततच्या त्रासाला कंटाळून उर्सुलाने येशूदासची सुपारी दिली. स्कूलबसवर असलेल्या मित्र भाऊराव याला येशूदासचा खून करण्यासाठी १ लाख ३० हजार रुपयांची सुपारी दिली. या व्यवहारामधील सात हजार रुपये उर्सुलाहे भाऊरावला आधीच दिले दिले. येशूदासचा खून केल्यानंतर अडीच हजार आणि उर्वरित रक्कम घर विकून देण्याचा वादा तिने भाऊरावला केला होता. मात्र, ऐन वेळी सर्व आरोपींचा मुसक्या निगडी पोलिसांनी आवळल्या.

निगडी पोलिस स्थानकातील वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनील टोणपे, पोलीस निरीक्षक राजेंद्र निकाळजे, पोलीस उपनिरीक्षक ज्ञानेश्वर कोकाटे, शंकर बांगर, मच्छिन्द्र घनवट, पोलीस कर्मचारी कल्याण महानोर, प्रवीण मुळूक, विनोद होनमाने, सतीश ढोले, विलास केकाण यांच्या पथकाने ही कारवाई केली आहे.