पुणे : पाण्याची मोटार दुरुस्त करत असताना विजेचा धक्का लागून बिगारी कामगाराचा मृत्यू झाल्याची घटना घोरपडी येथे घडली. याप्रकरणी ठेकेदारासह घरमालकाविरुद्ध निष्काळजीपणा आणि हयगयीचे कृत्य केल्याप्रकरणी मुंढवा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. किरण मधुकर उघडे (वय ३२, रा. भीमनगर, मुंढवा) असे मृत्यू झालेल्या बिगारी कामगाराचे नाव आहे. याप्रकरणी रसूल शेख (वय ३५, रा. भीमनगर, मुंढवा) आणि कुणाल चंद्रकांत रंगदळ (वय ४५, रा. घोरपडी गाव) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत किरण याची पत्नी शीतल किरण उघडे (वय २३) यांनी मुंढवा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, किरण उघडे हे रसूल शेख या ठेकेदाराकडे बिगारीचे कामे करीत होता. त्याला इलेक्ट्रिकच्या कामाची काहीही माहिती नव्हती. हे ठाऊक असूनही शेख याने १७ मे रोजी किरण याला कुणाल रंगदळ याच्या घरी काही तरी काम असल्याचे सांगून पाठवले. रंगदळ याच्या घरी पाण्याची मोटार दुरुस्त करण्याचे काम होते. मोटारीच्या दुरुस्तीचे काम करीत असताना विजेचा धक्का लागल्याने किरण याचा मृत्यू झाला.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

घरमालक रंगदळ याने किरण याला इलेक्ट्रिकची कामे जमतात की नाही, याची शहानिशा केली नाही. तसेच कोणतीही खबरदारी न घेता, मेन स्विच बंद न करता किरण याला मोटार दुरुस्त करायला लावली. त्यामुळे मोटार दुरुस्त करीत असताना विजेचा धक्का बसून किरणचा मृत्यू झाल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. दरम्यान, पोलिसांनी ठेकेदार आणि घरमालकाविरुद्ध निष्काळजीपणा आणि हयगयीचे कृत्य केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. पोलीस उपनिरीक्षक मांजरे तपास करीत आहेत.