पुणे : मुंबई महानगर प्रदेश क्षेत्रामध्ये विकास केंद्र अर्थात ग्रोथ हब प्रकल्पाची अंमलबजावणी सुरू झाल्यानंतर आता पुणे महानगर प्रदेश क्षेत्र (पीएमआर) ग्रोथ हब म्हणून विकसित करण्याची राज्य शासनाची तयारी सुरू झाली आहे. पुण्यामध्ये आयटी कंपन्या, कारखाने, मेट्रो, रिंग रोड, औद्योगिक काॅरिडाॅर्स आणि जागतिक दर्जाच्या शैक्षणिक सुविधा असल्याने ‘पीएमआर’साठी यशदा ही शासकीय संस्था आर्थिक वाढीचे धोरण आणि नियोजन आराखडा तयार करणार आहे.

या संदर्भात यशदा येथे संबंधित सर्व यंत्रणांंची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली लवकरच बैठक होणार आहे. या आराखड्याची अंमलबजावणी महापालिका, पीएमआरडीए यांच्यासह अन्य शासकीय यंत्रणा करणार आहेत.

नीती आयोगाच्या मार्गदर्शक सूचनेनुसार मंत्रालयात आयोजित बैठकीत उपमुख्यमंत्री व अर्थमंत्री अजित पवार यांनी ही माहिती दिली. मुख्य सचिव राजेश कुमार, वित्त विभागाचे अपर मुख्य सचिव ओ. पी. गुप्ता, नियोजन विभागाचे अपर मुख्य सचिव डाॅ. राजगोपाल देवरा, सामान्य प्रशासन विभागाच्या अपर मुख्य सचिव व्ही. राधा, उपमुख्यमंत्र्यांचे सचिव डाॅ. राजेश देशमुख यांच्यासह दृरदृश्य प्रणालीद्वारे पुण्याचे विभागीय आयुक्त डाॅ. चंद्रकांत पुलकुंडवार, जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी, ‘पीएमआरडीए’चे महानगर आयुक्त डाॅ. योगेश म्हसे, ‘यशदा’च्या प्रभारी महांसाचल पवनीत कौर, निबंधक राजीव नंदकर या वेळी उपस्थित होते.

केंद्र सरकारने २०२४ च्या अर्थसंकल्पात १४ ग्रोथ हब शहरांच्या विकासाची घोषणा केली. पहिल्या टप्प्यात मुंबई महानगर प्रदेश क्षेत्र, सुरत (गुजरात), वायझॅग (आंध्र प्रदेश), वाराणसी (उत्तर प्रदेश) या चार शहरी क्षेत्रांत ही संकल्पना राबविण्यात येत आहे. यामध्ये मुंबई महानगर प्रदेश क्षेत्रामध्ये प्रकल्पाची अंमलबजावणी सुरू झाली आहे. त्यानंतर पुणे महानगर प्रदेश क्षेत्रात ग्रोथ हब प्रकल्प राबविण्यात येणार आहे.

‘शहराचे सकल उत्पन्न ४.२ लाख कोटी रुपये असून, २०३० पर्यंत १५ ते १८ लाख नोकऱ्या उपलब्ध होणार आहेत. यामध्ये किमान सहा लाख महिला कामगार असतील, असे नियोजन करण्यात येणार असल्याने देशात सर्वांत प्रथम आर्थिक विकास आराखडा स्वीकारणाऱ्या शहरात पुण्याचा समावेश असेल. त्यामुळे सर्व संबंधित यंत्रणांनी सध्या सुरू असलेल्या विविध प्रकल्पांतील कामाचे सातत्य ठेवावे,’ अशी सूचना अजित पवार यांनी केली.
चौकट

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

‘ग्रोथ हब’साठी पुणे नवप्रवर्तन केंद्र

‘माहिती तंत्रज्ञान, एआय, इलेक्ट्रिक वाहन, क्लीन टेक, सेमीकंडक्टर डिझाइन क्षेत्रांतील कंपन्या पुण्यात आहेत. तसेच, एमआयडीसी क्षेत्रांमध्ये (चाकण, तळेगाव, रांजणगाव) ऑटोमोटिव्ह, एअरोस्पेस, प्रीसिजन इंजिनीअरिंग आणि फार्मा क्लस्टरचा विस्तार होत आहे. मेट्रो आणि रिंग रोड कॉरिडॉरसह नवीन टाउनशिप असल्याने हरित आणि स्मार्ट नागरीकरणास पोषक वातावरण आहे. पुण्यात पर्यटनासाठी वाव असल्याने वारसा पर्यटन, कृषी पर्यटन, आध्यात्मिक सर्किट, ॲडव्हेंचर झोन्ससाठी प्रयत्न करण्यात येणार आहेत. याशिवाय कौशल्य प्रमाणपत्र, स्टार्टअप गुंतवणुकीसाठी व्यवसाय सुलभतेमध्ये सुधारणा करण्यात येणार असल्याने परदेशी गुंतवणुकीतही वाढ होणार आहे,’ असेही अजित पवार यांनी स्पष्ट केले.