पिंपरी : चिंचवड, बिजलीनगर येथे आठ दिवसांपूर्वी झालेल्या वादातून आणि प्रेमविवाह केल्याच्या रागातून एका तरुणाचा कोयत्याने वार करुन खून करण्यात आला. वैभव भागवत थोरात (वय २५, रा. नागसेननगर झोपडपट्टी, चिंचवड) असे खून झालेल्या मुलाचे नाव आहे. या प्रकरणात त्याच्या आईने चिंचवड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार तिघांना अटक करण्यात आली असून एका अल्पवयीन मुलाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादीच्या मुलाने आरोपीच्या बहिणीबरोबर प्रेमविवाह केला होता. या कारणामुळे आणि आठ दिवसांपूर्वी झालेल्या भांडणामुळे आरोपी चिडून होते. मंगळवारी दुपारी वैभववर आरोपींनी कोयत्याने हल्ला केला. त्यांनी त्याच्या डोक्यावर, दोन्ही हातांवर, नाकावर, तोंडावर आणि शरीरावर अनेक ठिकाणी वार करून त्याला ठार मारले. चिंचवड पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत.

आई, बहिणींकडून मानसिक छळ, एकाची आत्महत्या आई आणि बहिणींकडून होणाऱ्या मानसिक छळाला कंटाळून एकाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना तळेगाव दाभाडे येथे घडली.याप्रकरणी महिलेने दिलेल्या फिर्यादीनुसार तिघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपींनी फिर्यादीचे सासरे यांच्याकडून कर्नाटक येथील बंगला ‘गिफ्ट डिड’ करून घेतला. फिर्यादी यांचे सासरे शारीरिक व मानसिक दृष्ट्या सक्षम नसताना त्यांच्याकडून ‘गिफ्ट डिड’ करून तो बंगला विकला. त्यातून आलेले पैसे आरोपींनी फिर्यादीच्या पतीला न देता त्यांच्या विरोधात पोलिसात खोट्या तक्रारी दिल्या. त्यांना मानसिक आणि शारीरिक त्रास देऊन त्यांना आत्महत्या करण्यास प्रवृत्त केले. तळेगाव दाभाडे पोलीस तपास करत आहेत.

वाहनाच्या धडकेत महिला गंभीर जखमी

निघोजे गावाच्या हद्दीत बैलपोळ्याची मिरवणूक पाहण्यासाठी रस्त्यावर उभ्या असलेल्या एका वृद्ध महिलेला एका भरधाव मोटारीने धडक दिली. या अपघातात महिला गंभीर जखमी झाली आहे. ही घटना रविवारी (२१ सप्टेंबर) घडली.शाबीरा हुसेन पठाण (६१) असे जखमी महिलेचे नाव आहे. या प्रकरणी ४० वर्षीय व्यक्तीने दिलेल्या फिर्यादीनुसार मोटार चालकाविरोधात म्हाळुंगे एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांची बहीण शाबीरा पठाण या बैलपोळ्याची मिरवणूक पाहण्यासाठी घरासमोर रस्त्यावर उभ्या होत्या. त्यावेळी भरधाव वेगाने आलेल्या एका मोटारीने त्यांना धडक दिली. या अपघातात शाबीरा यांचा डावा पाय फ्रॅक्चर झाला असून कमरेला गंभीर दुखापत झाली आहे. चालक अपघातानंतर घटनास्थळावरून पळून गेला. म्हाळुंगे एमआयडीसी पोलीस तपास करत आहेत.

पिस्तूल बाळगल्या प्रकरणी एकाला अटक

एका व्यक्तीकडून देशी बनावटीचे पिस्तूल आणि एक जिवंत काडतूस जप्त करण्यात आले आहे. ही कारवाई सोमवारी (२२ सप्टेंबर) सायंकाळी आंबेठाण येथे खंडणी विरोधी पथकाने केली.पोलीस शिपाई संदिप गंगावणे यांनी म्हाळुंगे एमआयडीसी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. अविनाश कृष्णा विटेकर (१९, राजगुरूनगर, खेड) याला अटक करण्यात आली. एका विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी अविनाशने ५० हजार ५०० रुपये किमतीचे देशी बनावटीचे पिस्तूल आणि एक जिवंत काडतूस कोणत्याही कायदेशीर परवानगीशिवाय एकाकडून विकत घेतले. अविनाश हा पिस्तूल घेऊन आंबेठाण येथे येणार असल्याची माहिती मिळाली असता पोलिसांनी त्याला अटक केली. म्हाळुंगे एमआयडीसी पोलीस तपास करत आहेत.

तडीपार गुंडाची दहशत, दोघांना अटक

तडीपार केलेल्या आरोपीने पिस्तूल बाळगून लोकांमध्ये दहशत निर्माण केल्याची घटना चाकण पोलीस ठाण्याच्या हद्दीत रोहकल येथे घडली.ओंकार मनोज बिसणारे (२६, चाकण, खेड) आणि प्रणव संजय शिंदे (२१, चाकण, खेड) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. याबाबत पोलीस शिपाई सुनील भागवत यांनी चाकण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ओंकार बिसणारे याने पिस्तूल आणि दोन जिवंत काडतुसे खरेदी केली होती. त्याने हे शस्त्र हातात घेऊन “आम्ही इथले भाई आहोत” असे ओरडून परिसरात दहशत निर्माण केली. यामुळे लोक आणि महिला घाबरून पळून गेल्या, काही दुकानदारांनी आपली दुकाने बंद केली. ओंकार याला यापूर्वीच पुणे जिल्ह्यातून दोन वर्षांसाठी तडीपार करण्यात आले होते, परंतु त्याने या आदेशाचे उल्लंघन केले. चाकण पोलीस तपास करत आहेत.