पुणे : शहरातील झिकाचे रुग्ण दिवसेंदिवस वाढत असून, रुग्णसंख्या ५२ वर पोहोचली आहे. आतापर्यंत झिकाचा संसर्ग झालेल्या चार रुग्णांचा मृत्यू झाला आहे. सार्वजनिक आरोग्य विभागाची समिती या मृत्यूंचे परीक्षण करणार आहे. त्यातून त्यांच्या मृत्यूचे नेमके कारण स्पष्ट होणार आहे.

शहरात झिकाचे सर्वाधिक ११ रुग्ण एरंडवणे क्षेत्रीय कार्यालयाच्या परिसरात आढळले आहेत. त्या खालोखाल डहाणूकर कॉलनी क्षेत्रीय कार्यालयाच्या परिसरात १० रुग्ण आढळून आले आहेत. खराडी ६, पाषाण ५, मुंढवा, सुखसागरनगर प्रत्येकी ४, आंबेगाव बुद्रुक, घोले रस्ता प्रत्येकी ३, कळस २, धनकवडी, लोहगाव, ढोले-पाटील रस्ता, वानवडी प्रत्येकी १ अशी रुग्णसंख्या आहे. कोथरुडमधील गुजरात कॉलनी, खराडीतील शिवाजी चौक, सेनापती बापट रस्त्यावरील मंगलवाडी अशी तीन नवीन रुग्णांची नोंद शहरात गुरुवारी झाली.

हेही वाचा…पुणे: शिक्षिकेचा विनयभंग करणाऱ्या उपमुख्याध्यापकाला शिक्षा

कोथरूडमधील गुजरात कॉलनीतील ६८ वर्षीय रुग्णाचा मृत्यू झाला आहे. त्याचा झिका तपासणी अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. अवयव निकामी झाल्याने त्याचा मृत्यू झाला आहे. बाणेरमधील अथश्री सोसायटीतील एका ७८ वर्षीय रुग्णाचा मृत्यू झाला आहे. त्याचा मृत्यू हृदयविकाराने झाल्याचे प्रथमदर्शनी समोर आले आहे. एरंडवणेतील ७६ वर्षीय रुग्ण आणि खराडीतील ७२ वर्षीय रुग्ण अशा दोन रुग्णांचा मृत्यू झाला आहे. या रुग्णांना सहव्याधी असल्याने त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू होते. मृत्यू झाल्यानंतर त्यांचा झिका तपासणी अहवाल पॉझिटिव्ह आला, अशी माहिती महापालिकेचे सहायक आरोग्य अधिकारी डॉ. सूर्यकांत देवकर यांनी दिली.

हेही वाचा…मनोज जरांगे पाटील विधानसभा लढण्यावर ठाम; पुण्यात ११ ऑगस्टला रॅली होणार

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

झिकाचा संसर्ग झालेल्या चार रुग्णांचा आतापर्यंत मृत्यू झाला आहे. हे रुग्ण सहव्याधी असलेले होते. त्यांचे वैद्यकीय अहवाल राज्याच्या आरोग्य विभागाला पाठविण्यात येणार आहेत. त्यानंतर आरोग्य विभागाची मृत्यू परीक्षण समिती या रुग्णांच्या मृत्यूचे नेमके कारण स्पष्ट करेल.– डॉ. सूर्यकांत देवकर, सहायक आरोग्य अधिकारी, पुणे महापालिका