डॉ. मानसी पाटील

साहित्य

३ मोठे चमचे ऑलिव्ह ऑइल, ३५० ग्रॅ. फर्म टोफू, दीड चमचा  कांदापूड, दीड चमचा लसूणपूड, अर्धा चमचा हळद, १ मोठा चमचा लिंबाचा रस, १ वाटी कापलेला लाल कांदा, २ बारीक चिरलेल्या हिरव्या मिरच्या, अर्धा चमचा मीठ, ३ पाकळ्या बारीक कापलेला लसूण, २ वाटय़ा बारीक कापलेला टोमॅटो, दीड चमचा जिरे, अर्धा कप चिरलेली कोथिंबीर, ३०० ग्रॅ. भिजलेले काळे बीन्स, दीड कप शिजवलेले बटाटे, १ अव्होकॅडो सोलून चकत्या करून, १ चमचा हॉट सॉस.

कृती

एक कढई गॅसवर २ मिनिटे गरम करून घ्या, त्यात २ चमचे तेल घाला, त्यात टोफूचे बारीक तुकडे करून घाला, त्यानंतर मीठ, मिरपूड टाकून ढवळा. टोफूला सोनेरी रंग येईपर्यंत फिरवत राहा. (पाणी सुटल्यास पाणी आटेपर्यंत शिजवावे, हे १० मिनिटेपर्यंत करा.) त्यात कांदा, लसूणपूड, हळद, लिंबाचा रस आणि तेल घालून त्यात टोफू पसरावे आणि ५ मिनिटे शिजू द्यावे. तवा गरम करून घ्या. त्यात तेल टाका, त्यात कांदा, मिरची, मीठ, जिरे, टोमॅटो घालून लुसलुशीत शिजवा. नंतर कोथिंबीर, लिंबाचा रस, काळे बीन्स टाकून शिजवा. चवीनुसार मीठ घाला. सर्व्हिगसाठी उकडलेला बटाटा, बीन्स, त्यावर टोमॅटो असा थर रचावा व त्यावर अव्होकॅडो, कोथिंबीर व लिंबाचा रस टाकून हॉट सॉससह खाण्याचा आनंद घ्या.