हिवाळ्यात हवा गार असल्याने वरचेवर सर्दी किंवा खोकल्याचा त्रास प्रत्येक वयोगटातील व्यक्तींना होत असतो. अशा वेळेस किरकोळ आजार म्हणून आपण त्याकडे दुर्लक्ष करतो. अगदी फार त्रास होत असल्यास डॉक्टरांकडून कोणतेतरी साधे औषध, कफ सिरप घेऊन येतो. परंतु, अशा साध्या, किरकोळ सर्दी खोकल्यावर आपली आजी पटकन आपल्याला गूळ हळदीची किंवा आल्याची गोळी देते. ही गोळी चघळत राहिल्याने घशाला आराम मिळतो आणि खोकल्यापासूनदेखील सुटका होण्यास मदत होते. आता अशी आल्याची गोळी घरी कशी बनवायची, याची अतिशय साधी सोपी रेसिपी इन्स्टाग्राम या सोशल मीडियावरील @nehadeepakshah या हँडलरने शेअर केलेली आहे. खोकल्यासाठी उपयुक्त असणारी ही गोळी बनवण्यासाठी केवळ दोन पदार्थांची गरज असून या गोळ्या १५ ते २० मिनिटांमध्ये तयार होतात.

सर्दी खोकल्यावर घरगुती उपाय म्हणून आल्याच्या या गोळ्या कशा बनवायच्या आणि त्याची रेसिपी काय आहे ते पाहा.

आल्याच्या गोळ्यांची रेसिपी

साहित्य

१ कप गूळ
१/४ कप आल्याचा रस

हेही वाचा : Recipe : अंड्याचा वापर न करता बनवा स्ट्रॉबेरी मफिन्स; काय आहे प्रमाण आणि रेसिपी पाहा

कृती

सर्वप्रथम आले व्यवस्थित धुवून घेऊन त्याची साले सोलून घ्या. नंतर आल्याच्या बारीक फोडी करून मिक्सरमधून वाटून त्याचा रस तयार करा. तयार रस एका ग्लासमध्ये काढून घ्या.

आता गॅसवर एक पातेलं किंवा पॅन मध्यम आचेवर ठेवून त्यामध्ये गूळ घालून घ्या. गूळ विरघळल्यानंतर त्यामध्ये तयार आल्याचा रस घाला. आता हे सर्व मिश्रण व्यवस्थित मिसळून घेऊन मंद आचेवर शिजवून घ्या.

गोळ्या बनवण्यासाठी हे मिश्रण तयार आहे की नाही हे ओळखण्यासाठी एका बाउलमध्ये पाणी घेऊन त्यात शिजत असलेल्या आले आणि गुळाच्या मिश्रणाचे काही थेंब टाकून पाहा. पाण्यातील मिश्रणाचे थेंब गार झाल्यानंतर हाताने तोडल्यास तुटत असतील तर हे मिश्रण तयार आहे असे समजावे.

आता आले व गुळाच्या मिश्रणाखालील गॅस बंद करून, तयार मिश्रण सिलिकॉनच्या मोल्डमध्ये ओतून घ्यावे.
सिलिकॉन मोल्ड उपलब्ध नसल्यास, कोणत्याही भांड्यात बटर पेपर ठेऊन त्यावर हे मिश्रण पसरून घ्यावे.

आता १५ ते २० मिनिटांनंतर हे मिश्रण थंड झाल्यानंतर मोल्डमधून काढून घ्या किंवा बटर पेपरवरील मिश्रण सुरीच्या मदतीने चौकोनी आकारात कापून घ्या.
आता आल्याच्या या गोळ्या एका ताटलीमध्ये काढून घेऊन त्या एकमेकींना चिकटू नये यासाठी त्यावर थोडा कॉर्न फ्लोअर भुरभुरवून घ्यावा.
या सर्व गोळ्या एका हवाबंद झाकणाच्या डब्यामध्ये भरून ठेवा.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

इन्स्टाग्रामवरील @nehadeepakshah या अकाउंटने शेअर केलेल्या या व्हिडीओला ८.९ मिलियन्स व्ह्यूज मिळाले आहेत.