एखादा सण असो वा समारंभ, पदार्थांमध्ये गोडाचा शिरा नाही असे कधीच होत नाही. काजू, बदाम किंवा बेदाणे घातलेला आणि साजूक तुपातील शिरा खाण्यास जितका चविष्ट आणि स्वादिष्ट लागतो; तेवढाच तो बनवायलादेखील सोपा आहे. मात्र शिरा बनवण्याचीसुद्धा वेगवेगळी पद्धत असते. काही त्यात सुकामेवा घालतात, तर काही केशर आणि वेलची पूड. तर अनेकदा आपण प्रसादासाठी, खासकरून सत्यनारायणाच्या पूजेसाठी केळी घालून शिरा बनवतो.
परंतु नेहमीचे पदार्थ सोडून जरा वेगळ्या चवीचा शिरा कसा बनवायचे ते आपण पाहू. इन्स्टाग्राम या सोशल मीडियावर @marathikitchen या अकाउंटने अननस घातलेला शिरा कसा बनवायचा त्याचे प्रमाण काय आहे त्याबद्दल एक रेसिपी व्हिडीओ शेअर केला आहे. त्यानुसार आणि रथसप्तमी निमित्त हा स्वादिष्ट आणि सोपा ‘अननसाचा शिरा’ कसा बनवायचा पाहा.
हेही वाचा : Recipe : उपवासाचा दिवशी बनवून बघ ही कुरकुरीत भजी; काय आहे रेसिपी पाहा…
अननसाच्या शिऱ्याची रेसिपी :
साहित्य
एक कप अननसाच्या फोडी
एक कप पाणी
अर्धा कप साखर
पाव कप साजूक तूप
अर्धा कप बारीक रवा
केशर
दूध
मीठ
कृती
- सर्वप्रथम एक पातेले घ्या. त्यामध्ये एक कप पाणी घ्या.
- पाणी थोडेसे तापल्यानंतर त्यामध्ये अर्धा कप साखर घालून पाणी ढवळत राहावे.
- आता साखरेच्या तयार होणाऱ्या पाकात बारीक चिरलेल्या अननसाच्या फोडी घालून घ्या.
- साखरेचा पाक सतत ढवळत राहा. पाक शिजल्यानंतर त्याखालील गॅस बंद करा.
हेही वाचा : संकष्टी चतुर्थी विशेष साबुदाण्याची खीर; उपवासाच्या दिवशी बनवा ही खास गोड रेसिपी…
- आता एका पॅनमध्ये किंवा कढईत पाव कप साजूक तूप घालावे.
- त्यामध्ये अर्धा कप बारीक रवा काही मिनिटांसाठी भाजून घ्यावा.
- रवा कढईतील सर्व तूप शोषून घेईपर्यंत सतत ढवळत राहा.
- सर्व तूप रव्याने शोषून घेतल्यानंतर त्यामध्ये तयार अननसाच्या फोडींचा पाक ओतून घ्यावा.
- पाक रव्यामध्ये घातल्यानंतर भराभर सर्व पदार्थ ढवळत राहा.
- अननसाच्या पाकात रव्याच्या गुठळ्या होणार नाहीत याची काळजी घ्या.
- आता शिऱ्याला अधिक चव येण्यासाठी त्यामध्ये चिमूटभर मीठ घालून घ्या.
- काही मिनिटे शिरा तसाच शिजू द्यावा. मात्र मध्येमध्ये तो ढवळत राहा.
- आता एका वाटीमध्ये थोड्याश्या दुधात केशराच्या १०-१२ काड्या घालून घ्या.
- शिरा छान शिजून त्याचा गोळा होऊ लागल्यानंतर, तयार केलेले केशराचे मिश्रण शिऱ्यात घालून घ्या.
- पुन्हा एकदा शिरा ढवळून घ्या आणि त्यावर काही मिनिटांसाठी झाकण ठेऊन द्या.
- शिऱ्याला एक वाफ आल्यानंतर, कढईखालील गॅस बंद करून टाका.
तुम्हाला आवडेल तसा हा शिरा गरम किंवा गार खाऊ शकता.
इन्स्टाग्राम या सोशल मीडियावर @marathikitchen या अकाउंटने या सुंदर अननसाच्या शिऱ्याचा रेसिपी व्हिडीओ शेअर केला आहे. आत्तापर्यंत या व्हिडीओला ३८३K इतके व्ह्यूज मिळाले आहेत.