उन्हाळा म्हटलं की बाजारात कैऱ्या, आंबे यायला लागतात. मग फळांच्या या राजाचे कोणते पदार्थ करु आणि कोणते नको असे आपल्याला होऊन जाते. मग घरोघरी कैरीचं पन्ह, कैरीची डाळ यांबरोबरच कैरीचं लोणचं आणि चटण्या केल्या जातात. यामध्ये तक्कू म्हणजेच कैरीचे ताजे लोणचे, कैरीचा गुळांबा, मेथांबा असे बरेच प्रकार केले जातात. मेथांबा म्हणजे मेथ्या घालून केले जाणारे लोणचे. कैरीची आंबट चव, त्यात गुळाचा गोडवा आणि मेथी, जिऱ्याची फोडणी यामुळे या मेथांब्याला अतिशय छान असा स्वाद येतो आणि जेवणाची रंगत वाढते. चला तर मग जेवणाला लज्जत आणणारा हा मेथांबा कसा करायचा हे पाहुयात.

साहित्य –

  • १. कैऱ्या – २ ते ३
  • २. तेल – २ चमचे
  • ३. मोहरी – अर्धा चमचा
  • ४. हिंग – पाव चमचा
  • ५. हळद – अर्धा चमचा
  • ६. तिखट – अर्धा चमचा
  • ७. मीठ – अर्धा चमचा
  • ८. गूळ – १ ते १.५ वाटी
  • ९.मेथ्या – १ चमचा

कृती –

  • १. कैरीची साले काढून त्याच्या बारीक फोडी करुन घ्यायच्या.
  • २. कढईमध्ये तेल घालून त्यामध्ये मोहरी तडतडली की हिंग हळद घालायचे
  • ३. या फोडणीत मेथ्या घालून त्या चांगल्या परतून घ्यायच्या, त्यात तिखट घालायचे.
  • ४. कैरीचे काप या फोडणीत घालून त्यावर मीठ घालून सगळे एकत्र हलवून घ्यायचे.
  • ५. पाव कप पाणी घालून हे सगळे झाकण ठेवून शिजवायचे, त्यामुळे मेथ्यांचा फ्लेवर उतरतो.
  • ६. ७ ते ८ मिनीटांनी झाकण काढल्यावर कैरी मऊ झालेली असेल. त्यामध्ये गूळ घालायचा आणि सगळे पुन्हा एकजीव करायचे.
  • ७. गुळ हळूहळू यामध्ये वितळतो आणि छान एकजीव होतो.
  • ८. पुन्हा ४ ते ५ मिनीटे झाकण ठेऊन एक वाफ येऊ द्यायची. त्यानंतर गॅस बंद करायचा.
  • ९. मेथ्या चवीला कडवट असल्या तरी त्य़ा आरोग्यासाठी अतिशय फायदेशीर असतात.
  • १०. हा आंबट-गोड थोडासा तिखट मेथांबा जेवणाची लज्जत वाढवतो यात वादच नाही.

हेही वाचा – आमरस, लोणचं खाऊन कंटाळला असाल तर आंब्याचे रायते खाऊन पाहा, जाणून घ्या सोपी रेसिपी

उन्हाळ्यात नक्की ट्राय करा कैरीपासून तयार होणारा अतिशय चटपटीत असा मेथांबा. आणि कसा होतो हे आम्हाला नक्की कळवा.