उन्हाळा म्हटलं की सगळ्यांना वेध लागतात ते वाळवणाचे. उन्हाळ्यात आपल्या सगळ्यांच्याच घरात वाळवण घातली जातात. उन्हाळ्यांत वाळवण घालण्यासाठी घरातील प्रत्येक व्यक्ती तयारीला लागलेलं असायचं. उन्हाचे चटके बसू नयेत किंवा वाळवणाला चांगलं ऊन मिळावं म्हणून हे सगळे पदार्थ सकाळी लवकर उठून केले जातात. कारण ऊन वाढलं की पायाला चटके बसतात. मग वाळवणं घालायला त्रास होतो. शिवाय उशिरा वाळवण घातलं की मग त्यांना ऊनही कमी लागतं. असा सगळा घाट घालून वाळवण केली जातात.

जेवणाच्या पानात तळलेली सांडगी मिरची जेवणातली लज्जत आणखीन वाढवते ,तेच काय नुसता ताक भात आणि जोडीला ही मिरची बास मस्त मेजवानी होते. या छोट्या छोट्या गोष्टींनीच जेवणाची रंगत वाढते आणि आपल्या खाद्यसंस्कृतीला खास बनवते. या उन्हाळ्यात तुम्ही सुद्धा या मिरच्या करून ठेवा आणि वर्षभर याचा आनंद घ्या.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

सांडगी मिरची साहित्य

  • १०-१२ पोपटी मिरच्या
  • १/४ कप धणे
  • १ टेबलस्पून जीरे
  • १/२ टीस्पून मेथीदाणे
  • १/४ टीस्पून हळद
  • १/८ टीस्पून हिंग
  • २ टीस्पून मीठ
  • १ टेबलस्पून लिंबू रस/ व्हिनेगर
  • १ टीस्पून तेल

सांडगी मिरची कृती

  • मिरच्या स्वच्छ धुवून कोरड्या करून घ्या आणि मग मधून चिर पाडून घ्या. तिखट चालत नसेल तर मिरचीच्या आतील बिया कडून घ्या. हाताची आग होवू नये म्हणून तुम्ही मिरची चिरताना handclouse घालू शकता.
  • आता मिरच्याना थोडेसे मीठ आणि लिंबाचा रस घालून मिक्स करून झाकण ठेवून साधारण ४,५ तास ठेवून द्या आणि मग सुटलेले पाणी काढून घ्या. असे केल्याने मिरचीचा तिखटपणा सुद्धा कमी होतो आणि मिरच्या थोड्याशा मऊ होतात म्हणजे त्या मसाला भरायला बऱ्या पडतात. आणि पाणी निघून गेल्याने वाळतात सुद्धा लवकर.
  • आता वर दिल्याप्रमाणे सगळे जिन्नस म्हणजे धणा जिर पावडर, मेथी पावडर, मीठ, हळद, हिंग सगळे नीट मिक्स करा व मग त्यात तेल आणि दही घाला आणि परत अगदी नीट मिक्स करुन मसाला भरून घ्या. मसाला जास्त असेल तर चव मस्त लागते आणि दाबून भरल्याने मसाला मिरची सुकली किंवा तळली तरी बाहेर येत नाही. तसेच दही घातल्याने मसाला जरा ओलसर होतो आणि चव सुद्धा छान येते.
  • आता मिरच्या भरून झाल्या की मग ह्या मिरच्या उन्हात ४ ते ५ दिवस कडकडीत वाळू द्या आणि मग काय मस्त बरणीत भरून ठेवा आणि तुम्हाला हवी तेव्हा तुमच्या जेवणाची लज्जत वाढवा.

हेही वाचा – Summer Special: ४-५ दिवसांमध्ये बनवा वर्षभर पुरतील इतक्या गव्हाच्या कुरडया; पटकन लिहून घ्या साहित्य आणि कृती
यावर्षी उन्हाळा तर कडकाच आहे मग तुम्हीही ही अशी सांडगी मिरची नक्की करून बघा आणि सांगा.