तुमच्यापैकी अनेकांना कोबीची भाजी खायला आवडत नसेल. अशा वेळी आई तुम्हाला आवडतील असे कोबीचे विविध पदार्थ करून बघत असते. त्यामुळे अनेक घरांत कोबीपासून कुरकुरीत मंचुरियन बनवले जात असतील. पण, प्रत्येक वेळी कोबीचे मंचुरियन खाऊन कंटाळा येतो. अशा वेळी तुम्ही कोबीपासून कुरकुरीत खमंग अशा वड्या बनवू शकता. आज संकष्टी चतुर्थी असल्याने तुम्ही नैवेद्यासाठी कोबीची खमंग वडी नक्की करून बघू शकता. चला तर, मग वेळ न घालवता सोपी अशी कोबीची खमंग वडी कशी बनवायची ते जाणून घेऊ…

साहित्य

अर्धा किलो चिरलेला कोबी
२ ते ३ चमचे आले, लसूण, मिरची पेस्ट
२ चमचे धणे पावडर
१ चमचा जिरे
२ चमचे पांढरे तीळ
२ चमचे ओवा
अर्धा वाटी तांदळाचे पीठ
१ वाटी बेसन पीठ
१ छोटा चमचा हिंग
२ चमचे लाल तिखट
अर्धा चमचा हळद
चवीनुसार मीठ

कृती

सर्वप्रथम एका भांड्यात स्वच्छ धुऊन बारीक चिरलेला कोबी घ्या. त्यानंतर त्यात बेसन पीठ, तांदळाचे पीठ, धणे पावडर, मीठ व आले, लसूण, मिरची यांची पेस्ट आणि त्यात वर दिलेले इतर सर्व साहित्य मिसळा. पाणी शक्यतो वापरू नका. कारण- कोबीमध्ये मीठ घातल्यानंतर त्याला पाणी सुटते. अशा प्रकारे सर्व मिश्रण एकजीव करून, चांगले मळून घ्या. त्यानंतर तयार मिश्रणाचे हाताला थोडे तेल लावून लहान लहान मुटके तयार करा. एका चाळणीला तेल लावून, त्यात हे मुटके ठेवा आणि १५ मिनिटे वाफवून घ्या. ते चांगल्या रीतीने वाफवल्यानंतर थोडे थंड होऊ द्या. मग अळूवडीसाठी ज्याप्रमाणे आपण बारीक वड्या कापतो त्याचप्रमाणे याच्याही बारीक वड्या कापून घ्या. आता कढईत तेल गरम करून, त्या तळून घ्या. अशा प्रकारे तयार झाल्या तुमच्या कोबीच्या खमंग कुरकुरीत वड्या. तुम्ही ह्या वड्या चटणीबरोबरही खाऊ शकता किंवा जेवणातही तोंडी लावण्यासाठी वापरू शकता.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

आपण ही रेसिपी @happy_home_with_swapnali या इन्स्टाग्राम अकाउंटवरुन जाणून घेतली आहे. तुम्हाला जर घरी ही रेसिपी ट्राय करुन पाहायची असेल तर त्यांच्या वरील व्हिडीओची मदत घेऊ शकता.