News Flash

जातीच्या आत्मकल्पनांचा वसाहतकालीन गुंता

इतिहाससंगतीतून स्व-समुदायाची अस्मिता उभी करणे हे आधुनिकतेचे लक्षण वसाहतकाळात प्रगट झाले.

|| उमेश बगाडे

ब्रिटिश वसाहतकाळाने दिलेल्या तथाकथित ‘नव्या संधीं’च्या काळात वर्ग म्हणून उन्नती साधताना आपापली जात उपयोगी पडते आहे; तसेच ही वर्गीय उन्नती आपण आपापल्या जातींच्या आत्मकल्पना बळकट करण्यासाठी वापरू शकतो आहोत, याचे जे भान सुमारे १०० वर्षांपूर्वी आले आणि त्यातून जो गुंता वाढला, त्याच्या खुणा आजही दिसतात. तो गुंता मुळात झालाच कसा?

एकोणिसाव्या शतकाच्या उत्तरार्धात आणि विसाव्या शतकाच्या पूर्वार्धात, वासाहतिक महाराष्ट्रातला नवशिक्षित हा कुटुंब व जातीच्या पारंपरिक सामाजिक परिवेशामध्ये उभा होता. तो परंपरेतून मिळालेले व वासाहतिक व्यवस्थेतून प्राप्त झालेले असे दोन्ही प्रकारचे बुद्धिजीवित्व सांभाळत होता. स्व-वर्गप्रतिमेची उभारणी स्वजाती-प्रतिमेच्या संदर्भात तो, स्वजाती-प्रतिमेची कल्पना वर्गप्रतिमेच्या साक्षीने करत होता. म्हणजेच, जातीच्या पायाने वर्गोन्नतीची संधी प्राप्त करताना आणि वर्गोन्नतीनंतर जात्युन्नतीसाठी झटताना तो स्वजाती-प्रतिमेची फेरमांडणी करत होता. जात-नातलगसंबंधातून तयार होणाऱ्या सामाजिक भूमीत वर्गीय सामाजिकतेचा चेहरा तो शोधत होता. इतर जाती, पोटजातीच्या संबंधात स्वजातीच्या इतिहासाची संगती लावून स्वजातीची एक नवी प्रतिमा तो घडवत होता. जाती, पोटजातीच्या अहंता बाळगत वर्ग अस्मितेची धारणा तो करीत होता.

इतिहाससंगतीतून स्व-समुदायाची अस्मिता उभी करणे हे आधुनिकतेचे लक्षण वसाहतकाळात प्रगट झाले. नवशिक्षित समूह आपल्या जाती, पोटजातीची अस्मिता इतिहासाचा धांडोळा घेत घडवू लागले. जात-अस्मितांच्या उभारणीची ही प्रक्रिया प्राय वासाहतिक म्हणजे पौर्वात्यवादी ज्ञानउभारणीवर आधारलेली होती. या प्रक्रियेचा उलगडा ‘कास्ट्स ऑफ माइंड’ या ग्रंथात निकोलस डर्क्‍स या आधुनिकोत्तरवादी अभ्यासकाने केला. त्यांनी वसाहतकाळातील जातीच्या ज्ञानमीमांसेतून आणि सत्ताव्यवहारातून जातीचे सामाजिक गतित्व कसे बदलले याचा ऊहापोह केला.

जातीची वसाहतोत्तरवादी ज्ञानमीमांसा

ब्रिटिशांनी भारतविद्या व मानवशास्त्रीय या दोन प्रकारच्या अध्ययन पद्धतीतून जातीची ज्ञानमीमांसा उभी केली. त्यांनी भारतविद्या म्हणजे प्राचीन संस्कृत ग्रंथांच्या अध्ययनातून आणि मानवशास्त्रीय म्हणजे सर्वेक्षण, जनगणना, अभ्यास पाहणी अशा माध्यमांतून जातीविषयक ज्ञान उभे केले. वसाहतवादी व्यवस्थेने उभारलेल्या या जातीविषयक ज्ञानमीमांसेला अधोरेखित करत डर्क्‍स यांनी जातीला ‘वसाहतवादी मनाची रचना’ ठरवले. त्यांच्या म्हणण्याचा अर्थ ब्रिटिशपूर्व काळात जाती नव्हत्या असा नव्हे; तर वसाहतवादी व्यवस्थेने जातीच्या आकलनासाठी पायाभूत केलेल्या चिन्हसंहितेमुळे जातीकल्पनांची एक निराळीच रचना जन्माला आली असा आहे.

पौर्वात्यवादाच्या मुशीत घडलेल्या ज्ञानमीमांसेमुळे जातीच्या सत्ता-संबंधाची नवी चिन्हव्यवस्था प्रचलित झाली असे डर्क्‍स यांनी प्रतिपादले. आपले मत मांडण्यासाठी मिशेल फुको यांच्या खंड (rupture) या कल्पनेचाही त्यांनी अवलंब केला. ‘ज्या अनुभवपूर्व संकल्पनांच्या व्यूहाच्या (ensemble) आधारे विश्वातील कोणत्याही बाबींचे ज्ञान केले जाते त्यांना प्रमाणके (episteme) म्हणतात असे सांगून प्रमाणकांचा एक अंमल पूर्णत संपून दुसऱ्या प्रमाणकांचा अंमल सुरू होण्याला फुको यांनी खंड असे कल्पिले आहे. वासाहतिक राजवटीने ज्ञानमीमांसेसाठी वापरलेल्या नव्या प्रमाणकांच्या पार्श्वभूमीवर डर्क्‍स यांनी त्या काळाला खंड कल्पिले. ‘जातिसंस्थेचे ज्ञान घडवणाऱ्या ब्रिटिशपूर्व संकल्पनांचा अंमल खंडित होऊन वासाहतिक ज्ञानमीमांसेवर आधारलेला जातीकल्पनांचा अंमल सुरू झाला,’ असे त्यांनी प्रतिपादले.

पण, वसाहतकाळातील जाती-ज्ञानमीमांसेत डर्क्‍स सांगतात असा खंड घडलेला दिसत नाही. जातीला जाणण्याची जी नवी प्रमाणशास्त्रीय दृष्टी या काळात आली ती वसाहतपूर्व ब्राह्मण बुद्धिजीवींच्या जातीविषयक प्रमाणशास्त्रीय धारणांना आत्मगत करत आली होती. त्याशिवाय मिथकज्ञानाच्या आधारे जातीचे आत्मरूप घडवण्याची वसाहतपूर्व प्रक्रिया जनमानसात जारी राहिली होती. वसाहतपूर्व जातीकल्पनांचा असा सातत्यक्रम लक्षात घेता जातीच्या ज्ञानमीमांसेत खंड पडला हे गृहीतक स्वीकारता येत नाही.

‘खंडा’चे सिद्धांतन जरी बाजूला ठेवले तरी जातीला समजून घेण्याची दृष्टी वासाहतिक ज्ञानव्यवहारामुळे बदलली हे नक्की. सातत्य आणि बदल या तणावात जातीकल्पनांचे विश्व  या काळात बदलत राहिले. ब्रिटिशपूर्व काळात सामाजिक, आर्थिक व सांस्कृतिक सत्तासंबंधांनी एकवटलेल्या जातीउतरंडीचे निर्धारण प्राय: धर्मसंस्था करीत होती. प्रसंगी धर्मसंस्थेच्या सल्ल्याने राज्यसंस्था जातीउतरंडीच्या निर्धारणामध्ये हस्तक्षेप करीत असे. ब्रिटिश काळात धर्मसत्तेची मातबरी कायम राहिली तरी जातीउतरंडीच्या निर्धारणातील लवादाची भूमिका ब्रिटिश सत्तेला प्राप्त झाली. जातीउतरंडीतील स्थाननिश्चितीसाठीचा आधार म्हणून ब्राह्मणी धर्मग्रंथ व सामाजिक परंपरा यांना वसाहतवादी सत्तेने स्वीकारले. जातीउतरंडीतील दर्जाबाबतचे भारतीय लोकांचे दावे त्यामुळे ब्रिटिश न्यायालयात व सरकारदरबारी दाखल केले जाऊ लागले. जातीविषयक ज्ञानमीमांसेच्या भूमीतच ब्रिटिश शासनप्रणालीने आपला सत्ता-व्यवहार उभा केला असल्याने जातीच्या सत्तासंबंधांचे व राजकारणाचे नवे रूप आकार घेऊ लागले. वसाहतवादी ज्ञानमीमांसेच्या चौकटीत जातींच्या अस्तित्वकल्पना व जातीउतरंडीतील स्थान ठरवणाऱ्या चळवळी आकार घेऊ लागल्या.

भारतातील वसाहतोत्तरवाद्यांना डर्क्‍स यांची जातीज्ञानाची मीमांसा विशेषत्वाने भावली. वासाहतिक देशांचे सद्य:कालीन पेच व अरिष्टे वसाहतवादी ज्ञानव्यवहाराच्या वारशाची देणे असल्याच्या धारणेतून भारतातील सद्य:कालीन जातीच्या अरिष्टासाठी त्यांनी वसाहतवादी ज्ञानव्यवस्थेला जबाबदार धरले. ‘वासाहतिक ज्ञानव्यवहारामुळे भेदाची व्यवस्था म्हणून आडव्या रूपात नांदत असलेल्या वसाहतपूर्व जातीला उतरंडीचे दमनकारी रूप प्राप्त झाले’ असल्याचे मत ते मांडू लागले. अर्थातच, त्यांचे हे मतप्रदर्शन वास्तवाला धरून नाही.

वसाहतवादी सत्तेमुळे व ज्ञानमीमांसेमुळे जातीच्या वर्तनव्यवहाराला नवे आयाम मिळाले असले तरी त्या आधारावर ‘वसाहतोत्तर जातिव्यवस्था ही वसाहतकालीन ज्ञानव्यवस्थेची निखळ उपज आहे’ हे प्रमेय मान्य करता येत नाही. कुटुंब, पोटजात आणि जात यांचे पुनरुत्पादन करणारी सामाजिक-सांस्कृतिक व्यवस्था म्हणून जात-पितृसत्तेचे सातत्य वसाहतकाळातही जारी राहिले. श्रमिकांच्या विभागणीची व्यवस्था, श्रेणीबद्ध विषमता व शोषण या तत्त्वाआधारे उत्पादन व वितरण करणारी आर्थिक-सामाजिक व्यवस्था आणि शुद्धी-अशुद्धी, श्रेष्ठता-कनिष्ठता, स्वामित्व-दास्यत्व यांच्या उतरंडीत दर्जा प्रदान करणारी सांस्कृतिक व्यवस्था म्हणून जातीचे सातत्य वसाहतकाळातही कायम राहिले.

वर्गजातीची गतिशीलता

जातीचे हे सातत्य केवळ वासाहतिक ज्ञानव्यवस्थेने बदलण्यासारखे नव्हते. भांडवली स्थित्यंतरामुळे व वर्गव्यवस्थेमुळे मुख्यत त्यात बदल झाले आणि वासाहतिक ज्ञानव्यवस्थेने त्याला साथ दिली इतकेच. या काळात भांडवली उत्पादनपद्धती आली. त्यातून सामाजिक दर्जा ते करारसंबंध असा बदल होऊ लागला. व्यक्तीच्या श्रमाला करारसंबंधांच्या रचनेत उभे करण्यातून वर्गसंबंधांचे विश्व आकार घेऊ लागले. पण, हे उगवते वर्गसंबंध भांडवली उद्यमशीलतेतील जातीच्या पायावरच स्थिरावू लागले. थोडक्यात, ‘जात’ हाच पाया या काळात राहिला. पारशी, मुस्लीम, हिंदू, जैन अशा धर्मीयांतील व्यापारी जातींतून भांडवलदार वर्ग आला. गटांतर्गत विवाहाच्या र्निबधाआधारे श्रमिकांना (स्त्री-पुरुषांना) उत्पादन व विनिमय व्यवहारात उतरवणारी जातिसंस्था आता वर्गसंबंधांना आधारभूत होऊ लागली. उद्योगांच्या वा श्रमाच्या क्षेत्रामध्ये जातीच्या पायावर श्रमिकांची भरती होऊ लागली होती. उदाहरणार्थ- गोदी कामगारांमध्ये प्राय: कुणबी जातीतून भरती करण्यात आली, मात्र तेथील अशुद्ध व अस्वच्छ मानलेल्या वस्तूंची हमाली करण्यासाठी मात्र अस्पृश्य कामगारांची भरती करण्यात आली.

वसाहतवादी राजवटीत भारताला युरोपीय बाजारपेठेच्या पुरवठादाराचे स्वरूप प्राप्त झाले. भारतातील शेतमाल आंतरराष्ट्रीय भांडवलशाहीच्या कक्षेत आला. त्यातून वरकड अपहरणाची एक साम्राज्यवादी प्रक्रिया गतिमान झाली. जाती-वर्गसंबंधांनी घडलेल्या साम्राज्यवादी वरकड अपहरणाच्या पोटात पुन्हा, जातीच्या विषम विनिमय संबंधांचा ढाचा काम करतच राहिला. जात व वर्गव्यवस्थेची ही संमिश्र व्यवस्था गुंतागुंतीची होती. याच व्यवस्थेमध्ये वर्गीय गतिशीलतेने जातीला तर जातीय गतिशीलतेने वर्गाला प्रभावित करण्यास सुरुवात केली. आणि त्यातून जातीच्या संघर्षांने नवे रूप धारण केले.

वर्गस्थित्यंतरामुळे जातीचा संघर्ष अधिक बहुपेडी व तीव्र झाला. पेशवाईत कारकुनीच्या क्षेत्रात परस्परांशी संघर्ष करणाऱ्या जाती वसाहतकाळात वर्गोन्नतीच्या स्पर्धेत परस्परांशी अधिक तीव्रपणे झुंजू लागल्या. मध्यमवर्गाच्या तळावर त्यामुळे जातीच्या आत्मकल्पनांचे निरनिराळे रंग शोधले जाऊ लागले. वर्गोन्नतीसाठी एकमेकांशी झुंजणाऱ्या ब्राह्मण पोटजातींनी स्वत:च्या जातीविशिष्ट अस्मितांचे रंग शोधलेच; पण वेदोक्ताच्या विशेषाधिकाराला पायाभूत करून पोटजातींना एकवटणारी ब्राह्मण वर्ण-जातीची एक कल्पनाही ब्राह्मणेतर जातींच्या विरोधात पोसली गेली. त्याच वेळी, ‘गुणकर्माधारित वर्णव्यवस्थे’चे प्रारूप वर्गीयतेच्या साधम्र्यात उभे करून ब्राह्मणत्वाची समावेशक जातीकल्पनाही पुरस्कारली. पूर्वापारपणे बुद्धिजीवी जात म्हणून ब्राह्मण जातीच्या स्पर्धेत असलेल्या कायस्थांनी वेदोक्ताचा दावा करणारी क्षत्रियत्वाच्या प्रारूपातील जातीकल्पना मांडली; तर मुंबईत वर्गोन्नत झालेल्या दैवज्ञ सोनारांनी पेशवेकाळात केलेला ब्राह्मण जातीदर्जाचा व वेदोक्ताचा दावा पुन्हा एकदा केला. कर्मकांडी शुचिता सांगणारा वेदोक्ताचा अधिकार जातीश्रेष्ठत्वाचा आधार मानून मध्यमवर्गातील जातीसंघर्ष उभा राहिला. त्यातूनच मध्यमवर्गाच्या तळावर जातीच्या आत्मकल्पनांची नवी मांदियाळी उभी राहू लागली.

लेखक ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठा’त इतिहासाचे प्राध्यापक आहेत. ईमेल :ubagade@gmail.com

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 18, 2020 12:01 am

Web Title: british colonization from history british studied indian science and anthropology in two ways akp 94
Next Stories
1 बुद्धिजीवित्वाचे सातत्य
2 शिक्षित, ज्ञाननिष्ठ की सनातनी, कर्मकांडी?
3 द्वंद्वातला आत्मशोध..
Just Now!
X