04 July 2020

News Flash

चीन आणि पं. नेहरूंचा भाबडेपणा

‘तणावामागचे सत्य’ हा अग्रलेख व त्यात व्यक्त केलेले अतिभाबडे शेजार प्रेम हे पं. नेहरूंविषयीचे विचार योग्यच वाटतात. चीन स्वतंत्र झाल्यावर संयुक्त राष्ट्र संघात सभासद म्हणून

| February 6, 2013 12:13 pm

‘तणावामागचे सत्य’ हा अग्रलेख व त्यात व्यक्त केलेले अतिभाबडे शेजार प्रेम हे पं. नेहरूंविषयीचे विचार योग्यच वाटतात. चीन स्वतंत्र झाल्यावर संयुक्त राष्ट्र संघात सभासद म्हणून घेण्यास अमेरिकेचा व इतर काही राष्ट्रांचा विरोध होता. पण पं. नेहरूंनी जंग जंग पछाडले व प्रत्येक वेळेस चीनला सदस्यत्व देण्यात यावे, याकरिता आकांडतांडव केले. पण त्या वेळेस चीन अंतस्थ भारताविषयी वेगळ्या तऱ्हेने विचार करीत होता. १९५१-५२ च्या सुमारास सैनिक श्रेष्ठींनी चीन याबद्दल विशेषत: सरहद्दीविषयी वाद निर्माण करील, असा इशाराही दिला होता पण पं. नेहरूंनी त्याकडे लक्ष दिले नाही. त्याच सुमारास थिमय्यांनी (लष्करप्रमुख) आपले सैन्य सुसज्ज असावे, असे सांगितले असता पं. नेहरूंनी आमचे सैन्य दुसऱ्या कुठल्याही राष्ट्रावर हल्ला करणार नाही. तेव्हा त्याची गरज नाही, असे सांगितले. चीनबरोबर पंचशील करार करून आम्ही एकमेकांच्या धोरणांस विरोध करणार नाही. (Non inter ference) असे त्यात कलम ठेवले होते, पण त्याचे चीनने नंतर तिबेटवरून व नंतर मॅकमोहन लाइन वरून भारताशी भांडण उकरून काढले व ६२ साली भारताच्या पाठीत खंजीर खुपसून भारतावर हल्ला केला व आपले सैन्य भारताच्या हद्दीत घुसवले व आपले सैन्य शस्त्रास्त्रांच्या बाबतीत कमी पडल्यामुळे भारताचा दारुण पराभव झाला. याला केवळ भारताचे व पं. नेहरूंचे बोटचेपे धोरण कारणीभूत होते. भारतावर हल्ला केल्यानंतर इजिप्त व इंडोनेशिया या भारताच्या दोस्त राष्ट्रांनी भारताला पाठिंबा न देता चीनने भारतावर आक्रमण केले नाही, असे सांगून इजिप्तने आपला प्रतिनिधी अंती साव्री व इंडोनेशियाने आपला प्रतिनिधी डॉ. सुब्रांद्रियांना भारतात पाठवले. हे दोघे कम्युनिस्ट होते. त्यांनी तर भारताच्या विरुद्ध रिपोर्ट देऊन सांगितले की चीनने आपली हद्द ओलांडून भारतावर आक्रमण केले नाही. सर्वात आश्चर्याची गोष्ट म्हणजे इजिप्तने अंती साव्री व इंडोनेशियाने डॉ. सुबांद्रियाला नंतर फाशी दिले. पाकिस्तान तर नेहमीच कुरापत काढत आहे. १/३ काश्मीर तर पं. नेहरूंच्या व नॅशनल काँग्रेसच्या बोटचेपे धोरणामुळे पाकिस्तानच्या कब्जात आहे व दोन्ही युद्धात (६५ व ७१) आपण पाकिस्तानने बळकावलेला हाजीपीर व पूंछ दे दोन भाग आपण युद्ध जिंकूनही गमाविले आहेत.
वसंत गद्रे, गोरेगाव (पू.)

‘राहुल यांचे चिंतन’
‘पैसा गेला तरी कुठे?’ हा अग्रलेख वाचला. (२८ जाने.) आज देशासमोर म्हणजे मध्यमवर्गीयांसमोर, नोकरवर्गासमोर, हातावर पोट असणाऱ्या अतिगरीब कष्टकऱ्यांसमोर, सामान्य नागरिकांसमोर वित्त, जीवित आणि शील यांच्या संरक्षणाबरोबरच आपले आणि आपल्या कुटुंबाचे दोन वेळचे पोट कसे भरायचे याची चिंता आणि भ्रांत आहे, कसे जगायचे हा प्रश्न आहे. दहशतवादाचे तर सोडाच, पण आज आर्थिक विवंचनेत प्रत्येकजण अडकला आहे. देशासमोर एक आर्थिक आव्हान उभे राहिले आहे. या आव्हानांचा सामना करण्यास जनतेने तयार राहा, असे आवाहन सरकारतर्फे करण्यात येत आहे. तुमची धोरणे चुकली किंवा चांगली असूनही राबवता आली नाहीत यात दोष जनतेचा? कोटीच्या कोटी घोटाळे करून जनतेचा पैसा लुटला जातोय यावर कोणाचेही नियंत्रण नाही. तरीही त्याग जनतेनेच करावा. काँग्रेसचे नवनिर्वाचित उपाध्यक्ष राहुल गांधी यांच्याकडे भारतीय जनता फार आशेने पाहत होती, पण त्यांनी पहिल्याच भाषणात घोर निराशा केली. नुसती भावनिक भाषणे करून लोकांची पोटे भरत नाहीत. त्यांच्या आगमनामुळे फक्त काँग्रेसच्या कार्यकर्त्यांत जल्लोष झाला असला तरी सर्वसामान्य जनतेच्या पातळीवर त्याच्या काही चांगल्या प्रतिक्रिया उमटल्या नाहीत. कारण त्यांच्या चिंतनात कौटुंबिक चिंतनाव्यतिरिक्त काहीही नव्हते.
अनिरुद्ध बर्वे, कल्याण.

पैसा गेला कुठे?
‘पैसा गेला तरी कुठे? (२८ जानेवारी) हा अग्रलेख वाचला. अग्रलेखातील शेवटच्या परिच्छेदातील प्रश्न जे इस्रायली नागरिकांना पडतात तेच आपल्या देशातील मध्यमवर्गाला पडतात. देशात होणारे विविध घोटाळे पाहिले की त्याचे उत्तरही सापडते.  भारत देश स्वतंत्र झाला तेव्हा आपली लोकसंख्या होती ३६ कोटी (अंदाजे) आणि आज स्वातंत्र्यप्राप्तीला ६० वर्षे पूर्ण झाल्यावर आपण आहोत ११० कोटींपर्यंत. एवढी वर्षे केंद्र व राज्य शासनाच्या आरोग्य, कुटुंब कल्याण खात्यांमार्फत खर्च झालेला कोटय़वधींचा खर्च गेला कुठे? नक्की किती पैसे खर्च झाले असतील? त्याची फलनिष्पत्ती काय?  देशातील विविध समस्यांचे अक्राळविक्राळ स्वरूप पाहून शांतपणे विचार केल्यास १०% प्रश्नांचे मूळ आपल्या अवाढव्य लोकसंख्येत आहे हे सहज समजते. कुठलाही राजकीय पक्ष मात्र याविषयी गंभीर नाही. जन्माला आलेले प्रत्येक बालक हे जसे भावी ग्राहक असते तसेच ते भावी मतदार आहे असाच त्यांचा विचार आहे. हा मतदार जेवढा गांजलेला, त्रस्त, गोंधळलेला, अर्धशिक्षित राहील तेवढा हिताचा. किमान जागृत प्रसारमाध्यमांनी तरी हा पैसा कुठे गेला आहे याचा शोध घ्यावा.
संदीप श्री. दातार, बदलापूर (पश्चिम)

‘ज्योतिष’ हे ‘वेदांग’
मकरसंक्रांतीबाबत श्री. हेमंत मोने यांनी केलेली विधाने ‘अशास्त्रीय’ ठरवणारे श्री. चंद्रमोहन वैद्य यांचे (३ फेब्रु.) पत्र वाचले. श्री. वैद्य यांचा खगोलविज्ञानाचा कितीही अभ्यास असला तरी ‘ज्योतिष’ विषयाचा अभ्यास किती आहे? ते ‘ज्योतिष’शास्त्राचा उल्लेख बुवाबाजीसारखा कशाच्या आधारे करतात? महर्षी वसिष्ठ, व्यास, अत्री, च्यवन, कश्यप हे ‘ज्योतिष’शास्त्राचे प्रवर्तक आहेत. महर्षी म्हणजे कोणी बुवा नव्हेत व लोकांचा भ्रम म्हणजे शास्त्रवचन नव्हे. ‘सूर्य, ग्रह, तारे पृथ्वीभोवती फिरत आहेत’ हे विधान त्यांनी कोणत्या ‘ज्योतिष’विषयक ग्रंथात वाचले? ‘पृथ्वी गोल नसून चपटी आहे, सूर्य पृथ्वीभोवती फिरतो’ हे ‘महान’ शोध(?) पाश्चात्त्यांनी लावले आहेत. ‘पृथ्वी गोल आहे, ती सूर्याभोवती फिरते, पृथ्वीचा अक्ष सुमारे २३ अंशांनी कललेला असतो’ हे सर्व ‘ज्योतिष’शास्त्राला हजारो वष्रे ज्ञात आहे. ‘ज्योतिष’ हे ‘वेदांग’ असून ते ग्रहादी तेजोगोलासंबंधी गणिताचे व कालमापनाचे शास्त्र आहे, हे लो. टिळकांसारख्या अव्वल गणितज्ञाला मान्य होते.
केदार अरुण केळकर, दहिसर (प.)

पाकिस्तानला ५५ कोटी देण्यासाठी गांधीजींचे उपोषण नव्हतेच!
म. गांधींबद्दलचे (काही) गैरसमज दूर करणारा कै. ठाकुरदास बंग यांच्या पुस्तकातील मजकूर दि. ३० जानेवारीच्या ‘लोकसत्ता’मध्ये प्रकाशित केला हे समयोचित झाले. तरीही त्यातील रु. ५५ कोटी पाकिस्तानला देण्याबाबतचा मजकूर गैरसमज निर्माण करणारा आहे.
हिंदुस्थानची फाळणी करताना सर्व सरकारी मालमत्तेचीही वाटणी केली गेली. त्यात पाकिस्तानच्या वाटय़ाला रु. ७५ कोटी द्यावयाचे ठरले. पैकी रु. २० कोटी आधीच दिले गेले होते व रु. ५५ कोटी द्यायचे राहिले होते. तेवढय़ात पाकिस्तानने काश्मीरमध्ये आक्रमण केले. तेव्हा रु. ५५ कोटी पाकिस्तानला देऊ नयेत व पाकिस्तानची अडवणूक करावी, असा काँग्रेसमधील काही नेत्यांचा विचार होता. गांधी कलकत्त्याहून पंजाबला जात असता (कारण बंगाल व पंजाब या प्रांताची फाळणी झाल्यामुळे दंगे व निर्वासित यांचे प्रश्न तेथेच गंभीर बनले होते) दिल्लीला थांबले. तेथे मुसलमानांविरुद्ध दंगे सुरू झाले. ते दंगे थांबून शांतता प्रस्थापित करण्यासाठी गांधींनी दि. १३ जानेवारी १९४८ पासून उपोषण सुरू केले. लॉर्ड माऊंटबॅटन, कै. राजाजी, कै. चिंतामणराव देशमुख (रिझर्व बँकेचे तत्कालीन गव्हर्नर) पैसे देण्याच्या बाजूचे होते. गांधींना विचारले असता, त्यांनीही ‘पैसे द्यावेत’ असे आपले मत दिले. दि. १५ जानेवारी १९४८ रोजी पाकिस्तानच्या वाटय़ाचे पैसे त्यास द्यावेत. असा निर्णय झाला. गांधींचे उपोषण चालूच राहिले. दि. १७ जानेवारीला ‘उपोषण थांबले नाही तर गांधींच्या जिवाला धोका आहे,’ असे डॉक्टरांनी जाहीर केले. दि. १८ जानेवारीला हिंदू आणि मुस्लिम नेत्यांनी एकत्र येऊन आम्ही शांती प्रस्थापित करू व पाळू, असे लेखी निवेदन तयार करून त्यावर सहय़ा केल्या. मग गांधींनी उपोषण मागे घेतले. पाकिस्तानला रु. ५५ कोटी देण्यासाठी गांधींनी उपोषण सुरू केले नव्हते व ते देण्याचा निर्णय झाल्यावर स्थगित केले नव्हते. गांधींच्या मारेकऱ्यांच्या सहविचारी मंडळींनी तसा प्रचार त्या वेळी केला व अजूनही तसा होत असतो.
वस्तुस्थिती अशी आहे की, गांधींना मारण्याचे प्रयत्न पुण्यातील हिंदुत्ववादी मंडळींकडून अनेकदा झालेले होते. जून १९३४ मध्ये पुण्यात बॉम्बहल्ला, जुलै १९४४ मध्ये पाचगणीला सुरा घेऊन जाणे, सप्टेंबर १९४४ ला सेवाग्राम येथे तोच प्रयोग, जून १९४६ मध्ये नेरळ-कर्जतच्या दरम्यान त्यांच्या गाडीला अपघात घडवण्याचा प्रयत्न, २० जानेवारी १९४८ प्रार्थनास्थळाजवळ बॉम्बस्फोट हे आधीचे अयशस्वी झालेले प्रयत्न. ३० जानेवारी ४८ ला खुनाचा प्रयत्न यशस्वी झाला.
गांधींच्या हट्टाग्रहामुळे पाकिस्तानला रु. ५५ कोटी द्यावे लागले व म्हणून त्यांचा खून करण्यात आला हा गैरसमज आहे.
अरविंद द. पोतनीस, नाशिक

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 6, 2013 12:13 pm

Web Title: chaina and innocent p nehru
Next Stories
1 भूगर्भातील तरंगाचे निदान झटपट प्रसिद्धीसाठी
2 हाय वेवरील अपघातांसाठी मानवी चुकाच जबाबदार
3 दहा रुपयांच्या पटीतच किमती ठेवा.. हवीत कशाला नाणी?
Just Now!
X