उच्छादाचे प्रमाण आणि विखारीपण कमीजास्त असेल, पण तरीही हा पक्ष झाकावा आणि तो काढावा अशीच स्थिती. सर्वपक्षीय वितण्डक आणि जल्पकांनी समाजमाध्यमांतून उच्छाद मांडला आहे. सुसंवादाची प्रेरणा शाबूत ठेवण्याचे आव्हान अशा वेळी मोठे आहे..
देशात नरेंद्र मोदी यांचे सरकार आल्यानंतर अव्वल भारतीय उदारमतवादी परंपरा, विरोधी विचारधारा आणि उच्चार व आविष्कारस्वातंत्र्य यांचे काय होणार, असा साधा प्रश्न जरी आता कोणी उपस्थित केला, तरी कोटय़वधी मोदीभक्तांचे मस्तक गरम होईल, कानातून वाफा निघतील, पोटातील आम्ल खवळेल आणि हात सळसळू लागतील. देशातील साधारणत: १८ कोटी लोक इंटरनेट वापरतात. त्यातील बहुतांश लोक समाजमाध्यमांचा वापर करतात आणि त्यावर मोदीभक्तांचे केवढे वर्चस्व आहे, हे गेल्या निवडणुकीत लख्ख दिसले. ही समाजमाध्यमांतील मोदीप्रेमी मंडळी अर्थातच त्या प्रश्नकर्त्यांवर तुटून पडतील. वृत्तपत्रांच्या वेबआवृत्त्यांतून त्याच्यावर टीकेच्या लाठय़ा चालविल्या जातील. व्हॉट्सअ‍ॅपमधून त्याच्यावरचे विखारी विनोद एकमेकांना पाठविले जातील. फेसबुकच्या भिंतीवर त्याच्या नावाने मतपिचकाऱ्या टाकल्या जातील. आजवरचा अनुभव तसाच आहे आणि मोदींचे अच्छे राज्य आले म्हणून त्यात काही बदल होईल, असे मानण्याचेही काही कारण नाही. एकंदर वातावरण भलतेच उन्मादी आहे. मौज अशी, की स्वत: मोदी मात्र केव्हाच उन्मादाच्या पलीकडे गेले आहेत.
मोदी यांची निकालानंतरची सर्व वक्तव्ये पाहिली तर हेच दिसते. प्रचारातील वांगी प्रचारातच असतात. आता निवडणूक संपल्यानंतर त्यांचे भरीत घालत बसायचे नसते, याची परिपक्व जाणीव त्यांना असावी. त्यामुळेच त्यांची नंतरची सर्व भाषणे म्हणजे भाषिक सद्भावनायात्रा अशा स्वरूपाचीच दिसतात. पण त्यांच्या अतिरेकी चाहत्यांचे आणि अनुयायांचे काय? डॉ. उडुपी राजगोपालाचारी अनंतमूर्ती यांच्यासारख्या ज्येष्ठ-श्रेष्ठ साहित्यिकाला दूरध्वनीवरून धमक्या देणे, पाकिस्तानचेच तिकीट काढून देण्याचा प्रस्ताव देणे अशा प्रकारचा वावदूकपणा या मंडळींनी चालविला आहे. तो का, तर अनंतमूर्ती यांनी मोदी यांना विरोध केला. मोदींचे सरकार आल्यास, आपणास या देशात राहावेसे वाटणार नाही असे ते म्हणाले. हे योग्य की अयोग्य हा वेगळ्या चर्चेचा मुद्दा. ही टीका ज्यांना अयोग्य वाटते त्यांना तिला ठोस उत्तर देण्याचा अधिकार आहेच. पण टीकेला उत्तर देणे आणि मुस्कटदाबी करणे यात अंतर असते. याचाच विसर अनेकांना पडला. अनंतमूर्ती हे याचे एकमेव उदाहरण नाही. सातत्याने असे प्रकार घडताना दिसत आहेत. किंबहुना त्यामुळे सलमान रश्दी यांच्यासारख्या जागतिक कीर्तीच्या साहित्यिकाने व्यक्त केलेली भीती खरी तर नाही ना, असा प्रश्न पडतो. मोदी यांच्या चाहत्यांची दांडगाई भोगावी लागू नये म्हणून लोक स्वत:च स्वत:वर सेन्सॉरशिप लादून घेत असल्याचे दिसते, असे रश्दी यांचे निरीक्षण आहे. त्यांचा रोख उघडच समाजमाध्यमांतून मोदीभक्तांनी मांडलेल्या उच्छादाकडे आहे. पण हे केवळ मोदीभक्तांचेच पाप आहे का? सगळ्याच पक्षांचे कार्यकर्ते निदान या एका बाबतीत तरी एकाच माळेचे मणी आहेत. मोदी यांच्या अनुयायांनी राहुल गांधी यांना पप्पू म्हटल्यानंतर, काँग्रेस कार्यकर्ते काही गांधीगिरी करीत नव्हते. ते मोदी यांना फेकू म्हणून हिणवतच होते. उच्छादाचे प्रमाण आणि विखारीपण कमीजास्त असेल, पण तरीही हा पक्ष झाकावा आणि तो काढावा अशीच स्थिती. बरे, दोष केवळ कार्यकर्त्यांना तरी कसा द्यायचा? ते काही आभाळातून पडलेले नसतात. ते आपल्यातीलच असतात. किंबहुना राजकीय कार्यकर्त्यांपेक्षा नेत्यांचे सर्वसामान्य अनुयायी आणि चाहते हेच समाजमाध्यमांतील शिमग्यात आघाडीवर असतात. अलीकडे समाजमाध्यमांत अशा ट्रोल्सचे – वादीवेताळांचे पेवच फुटले आहे. हे कशाने झाले?
वस्तुत: भारतीय परंपरेला वाद नवा नाही. उपनिषद काळापासून आपण वादच घालतो आहोत. फार काय, आपल्याकडे न्याय नावाचे दर्शन आहे आणि वादपद्धत हा त्यातील एक विषय आहे. पण हा वाद कसा, तर त्यातून तत्त्वाचा बोध झाला पाहिजे. कारण वाद याचा अर्थच मुळी एखाद्या विषयातील तत्त्व कळावे या हेतूने सुरू केलेली चर्चा असा आहे. आज व्यवहारात वाद या शब्दाला नकारात्म अर्थ असला, तरी खरी धारणा हीच. त्यामुळे जल्प आणि वितण्ड हे वादप्रकार आपल्याकडे दुय्यम मानले गेले. केवळ शब्दाला शब्द वाढविणे, दांडगाई करून चर्चाच बंद पाडणे आणि मग वादात आपलाच जय झाला म्हणून शेखी मिरवणे म्हणजे वितण्ड. तर जल्प म्हणजे आपण कोणताही पुरावा द्यायचा नाही. दुसरा कोठे चूक करतो यावर बारीक लक्ष ठेवायचे आणि ती चूक सापडली रे सापडली की तिचेच भांडवल करून समोरच्याचा पराभव झाला असे म्हणून पुन्हा दांडगाईने चर्चा बंद पाडायची. आज नेमक्या याच वितण्डक आणि जल्पकांनी समाजमाध्यमांतून उच्छाद मांडला आहे. सुसंवादाची प्रेरणाच जणू संपुष्टात येऊ लागली आहे. हे केवळ भारतातीलच चित्र आहे, अशातला भाग नाही. जगात सर्वत्र समाजमाध्यमांतून हेच दिसते. आणि त्याचे एक कारण समाजमाध्यमांचे स्वरूप आणि व्यवस्था हेही आहे. या माध्यमांनी माणसा-माणसांत भाषणसेतू बांधला हे खरे. पण तो आभासीच. अनेकदा तर मायावी. फेसबुकवरच्या मित्र या कल्पनेसारखे. क्षणापूर्वी ओळख-पाळख नसणारी व्यक्तीही तेथे निमिषात आपली मित्र बनते. या अशा माध्यमांना गप्पांचे कट्टे वगैरे म्हटले जाते. त्यातही तसा अर्थ नाही. कट्टय़ांपेक्षा यांना फलाट म्हणावे. फलाटावर अनोळखी व्यक्तीशीही गप्पा रंगू शकतात. ओळख, किमान समानशील ही कट्टय़ांसाठीची अर्हता असते. एकमेकांचा परिचयही नसणाऱ्या व्यक्तींच्या झुंडी तयार करणे हे या समाजमाध्यमांमुळे शक्य झाले आहे. या झुंडी हव्या तशा पळवता येतात, वळवता येतात. पुन्हा सगळ्याच जमावांचे जे वैशिष्टय़ तेही येथे जपले जाते. ते म्हणजे अनामिकता. आपल्याला पाहणारे, ओळखणारे कोणीही नाही, म्हटल्यावर समाजातल्या सज्जनाचाही वानर होण्यास कितीसा वेळ लागतो? आपल्या घराच्या भिंतीआड अनामिकतेचा वा अनोळखीपणाचा बुरखा ओढून संगणकासमोर बसलो, की मग हव्या तशा वानरचेष्टा करण्यास आपण मोकळे. मनात भावनांची हळवी गळवे ठसठसत असतातच. एरवी चारचौघांत ती बोलून दाखविता येतातच असे नाही. समाजाचे भय असते. मूर्खता, अज्ञान उघड होण्याची भीती असते. पण अनामिकतेच्या अंधारात सगळे काही करता येते. आपल्या विरोधातील विचार दिसला की त्याची खिल्ली उडवा, विरोधी मत दिसले की त्यावर तुटून पडा, प्रसंगी शिव्या घाला, असे हे चाललेले असते. राजकीय नेते ही अशा जल्पकांची नेहमीची ‘गिऱ्हाइके’. पण केवळ राजकारणीच नव्हे, तर सगळ्यांनाच याचा कधी ना कधी फटका बसला आहे. अण्णा हजारे यांची दुसऱ्या की तिसऱ्या स्वातंत्र्याची लढाई, नुकतीच झालेली निवडणूक या काळात हे प्रामुख्याने दिसले. मार्क्‍सने भले विरोधविकासवाद सांगितला असेल. पण आज कोणाला विरोध नकोच आहे. याल तर आमच्यासह, नाही तर पायच कापून टाकू, ही समाजमाध्यमी पिढीची भाषा बनलेली आहे. हे सारे चिंताजनक आहे. बहुवैचारिकता हे खरेतर समाजाचे बळ. ते संपवून एकसाची आणि एकसुरी समाज बनविण्याची घाई तर आपणांस लागली नाही ना अशी शंका यावी असे हे वातावरण आहे.
समोरच्याचा मुद्दा मान्य नसला, तरी तो मांडण्याचे स्वातंत्र्य त्याला आहे. त्याचा हवा तर आपण सभ्यपणे प्रतिवाद करू. मात्र त्याच्या व्यक्त होण्याच्या हक्कांवर कोणी गदा आणत असेल, तर ते सहन करणार नाही. त्याला कडाडून विरोध करू, हा व्हॉल्टेअरी उदारमतवाद जोवर समाजाचा स्थायिभाव होत नाही, तोवर हा जल्पकी उच्छाद कायमच राहणार. भारतीय समाजाला अच्छे दिन दिसावेत याकरिता हे आव्हान सर्वाना पेलावेच लागणार आहे.